नवीन पिढीकडून शिकत आहे

nina kulkarni
nina kulkarni

सेलिब्रिटी टॉक - नीना  कुळकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री
मी सध्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करत आहे. त्यात मी स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका साकारत आहे. स्वप्नील माझ्या धाकट्या मुलाची भूमिका साकारत आहे. स्वप्नील आणि मी जवळजवळ चौदा वर्षांनी एकत्र काम करत आहोत. याआधी आम्ही दोघांनी ‘अधुरी एक कहानी’ या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेतसुद्धा मी त्याच्या आईची भूमिका साकारली होती आणि आताही मी त्याच्या आईचीच भूमिका साकारत आहे. त्यामुळे आधीपासूनच आमच्या दोघांमध्ये कम्फर्ट झोन होताच. त्याच्यासोबत काम करतानाचा माझा अनुभव खूपच छान होता.

अभिनेता म्हणून तो हुशार आहेच; पण माणूस म्हणूनही तो खूपच छान आहे. मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखत आहे, त्याचा स्वभाव फार आवडतो. आतापर्यंत मी खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पिढी जशी बदलत गेली तशी मी ही बदलत गेली. आपण नेहमीच जुन्यातच अडकून राहू शकत नाही. नव्या पिढीसोबतही काम करताना मला छान वाटते. मी कायमच नवीन लोकांसोबत काम करत आली आहे. यापुढे ही करतच राहणार. सध्या मालिका हे तर नवीन पिढीचेच माध्यम झाले आहे.

त्यामुळे तिथे आम्हाला नवीन पिढीसोबतच जमवून घ्यावे लागते. हिंदी आणि मराठी दोन्ही माध्यमातील नव्या पिढीसोबत मी काम केले आहे.

त्यामुळे वयाने लहान असणाऱ्या पिढीला काही येत नाही असे अजिबात नसते. उलट नव्या पिढीला टेक्‍निकल ज्ञान हे आपल्यापेक्षा जास्त असते.

त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायलाही मिळते. काही गोष्टी आपण मोठे म्हणून सोडून द्यायच्या असतात, तर काही गोष्टी आपल्याकडून ते शिकत असतात. अनुकरणाने प्रत्येक माणूस शिकत असतो. सध्या मी एका चित्रपटासाठी काम करत आहे. त्या चित्रपटात तर सगळेच जण नव्या पिढीचे आहेत. फक्त मी मोठी वाटते, पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मला काही वेगळं वाटतच नाही. त्यांच्यामध्ये पटकन मिसळून गेली. नव्या पिढीचा अभिनय ही वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीचा अभिनय करायला शिकत आहे. मला महिला दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा बराच अनुभव आहे. पण मला अभिनयाचे पहिले बाळकडू मिळाले ते डॉ. विजया मेहता यांच्याकडून. त्या माझ्या गुरू आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांमध्ये मी काम केले आहे. पुढे जाऊन मी सई परांजपे यांच्यासोबत एक मालिका केली. ‘मोगरा फुलला’ची दिग्दर्शिका श्रावणी देवधर ही माझी खूप जुनी मैत्रीण आहे. आम्ही याआधी कधी एकत्र काम केले नाही, पण आमची मैत्री फार जुनी आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी तिने मला एक फोन केला आणि मी चित्रपटाची कथाही न विचारता या भूमिकेसाठी होकार दिला. कदाचित तिला त्या भूमिकेसाठी मी परफेक्‍ट वाटली असावी, म्हणूनच तिने या भूमिकेसाठी मला निवडले.

मला आजही माझ्या प्रत्येक भूमिकेसाठी आधी सारखीच तयारी करावी लागते. सर्वांत आधी त्या भूमिकेचे व्यवस्थित वाचन करते. या चित्रपटातील भूमिकेचेही मी वाचन केले. कारण या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी मी ‘पाँडिचेरी’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवले होते. त्यामुळे नेहमी मी भूमिकेचे वाचन करण्यासाठी जितका वेळ घेते तितका वेळ मला या भूमिकेसाठी मिळाला नाही. पण प्रत्येक सीन करण्याआधी मी त्या सीनचे व्यवस्थित वाचन करत होती आणि श्रावणीसारखी दिग्दर्शक, स्वप्नीलसारखा सहकलाकार आणि इतर सहकलाकार यांच्या सहकार्यामुळे मी सगळं व्यवस्थित करू शकले. 
(शब्दांकन - स्नेहल सांबरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com