पहिल्या भेटीत जमली गट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - रितिका श्रोत्री आणि प्रणाली भालेराव
अभिनेत्री रितिका श्रोत्रीने ‘बॉईज’, ‘स्लॅमबुक’ यांसारखे मराठी चित्रपट केले आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. आता तिचा ‘टकाटक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रणाली भालेरावनं मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. ‘टकाटक’च्या निमित्तानं ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. रितिका आणि प्रणाली यांची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं या दोघी पहिल्यांदाच भेटल्या. याआधी त्यांची ओळखही नव्हती. त्यातही रितिकाला चित्रपट, अभिनयाबाबत ज्ञान आहे, पण प्रणालीला या साऱ्याच गोष्टी नवीन होत्या. पहिल्याच भेटीमध्ये या दोघींची गट्टी जमली. रितिका म्हणते, ‘‘आम्ही ‘टकाटक’चं चित्रीकरण गोव्यामध्ये करत होतो. तिथंच आमची पहिली भेट झाली. प्रणालीसाठी अगदी सगळंच नवीन होतं, पण भेटताच क्षणी आमच्या दोघींची बडबड सुरू झाली. आम्ही पहिल्यांदाच भेटलो आहोत, असं मला अजिबात वाटलं नाही. प्रणालीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने ती थोडी घाबरलेली होती. पण संपूर्ण टीमनं आणि आमच्या गप्पांमधून मी तिचा मूड थोडा बदलण्याचा प्रयत्न केला. तिनंही तिचे काम अगदी प्रामाणिकपणे केलं.’’ 

प्रणाली एक मॉडेल आहे. त्यामुळं हेल्थविषयी किंवा फॅशनबाबत अनेक टिप्स ती रितिकाला देत असते, तसंच प्रणालीनं रितिकाला सेटवर काम करताना पाहिले तेव्हा ती आश्‍चर्यचकित झाली. प्रणाली सांगते, ‘‘रितिकानं याआधी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा अभिनय पाहून मी थक्कच झाले. ती अगदी कमी वयात फार कमालीचं काम करते. मी याआधी कधी अभिनय किंवा कॅमेऱ्याचा सामना केला नव्हता, पण रितिकाला काम करताना पाहून मी भारावून गेले.’’

प्रणाली या चित्रपटात रितिकाच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. रितिका म्हणते, ‘‘खरंतर ही भूमिका करताना आमच्या दोघींची ऑफस्क्रीन मैत्री माझ्या कामी आली. प्रणाली मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. आम्ही चित्रीकरणादरम्यान फावल्या वेळात बऱ्याच गप्पा मारल्या. आमच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. बहुधा म्हणूनच आम्ही ऑनस्क्रीनही चांगलं काम करू शकलो.’’ 

दोघीही एकमेकींचं तोंड भरून कौतुक करत असतात. प्रणाली सांगते, ‘‘रितिका सहकलाकार म्हणून एकदम बेस्ट आहे. तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. पहिल्याच भेटीमध्ये आणि अगदी कमी दिवसांत तिनं मला आपलंसं करून घेतलं! आमच्यामध्ये घट्ट मैत्री झाली याचे श्रेय रितिकाला जाते. ती वयानं लहान असली, तरी फार समंजस आहे.’’ तर रितिकाला प्रणालीचा आत्मविश्‍वास आणि तिची काम करण्याची जिद्द याचं कौतुक वाटते. मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘टकाटक’ चित्रपटामध्ये या दोघींना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांची केमिस्ट्रीही उत्तमरीत्या जुळून आली आहे. या पुढंही प्रणाली-रितिकाला एकत्र काम करण्याची इच्छा आहे. 
(शब्दांकन - काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Ritika and Pranali maitrin supplement sakal pune today