स्वतःच्या चुका सुधारल्यास अधिक प्रगल्भ होतो

Samruddhi-Pore
Samruddhi-Pore

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे
वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा तुम्हाला ज्ञान असेल. तुमचे व्हिजन क्‍लिअर असेल. तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला माहीत असेल. मी माझ्या प्रत्येक चित्रपटाची कहाणी, संवाद आणि पटकथा स्वतः लिहिते. प्रत्येक चित्रपट करताना नवीन-नवीन प्रयोग करून अजून-अजून शिकत असते. तुम्ही तुमच्या चुका सुधारून अधिक प्रगल्भ होत जाता. त्यानंतर एक भला मोठा विषय घेऊन मी आले. डॉ. प्रकाश आमटे यांच्या व्यक्तिचरित्रावरचा चित्रपट मी बनवला. साऱ्या जगात त्या चित्रपटाची वाहवा झाली. तेव्हा कधीही काम न केलेल्या आदिवासी लोकांकडून अभिनय करून घेण्याचं आव्हान होतं. खरं सांगू थोडं फार शिकून आलेले असतात ते फार घातक होऊन बसतं, असा अनेकदा अनुभव येतो.

पटकथेची गरज म्हणून काही वेळा समोरच्या व्यक्ती जशा असतात, तशाच आपल्याला हव्या असतात. त्या व्यक्ती अभिनय करायला लागल्या की सगळेच फसते. आदिवासी बिचारे काहीच करायचे नाही. कॅमेरात आपण खूप चांगले दिसावे अशी त्यांची धडपड नसते. त्यामुळे ते अधिक नैसर्गिक अभिनय करताना भासतात. त्यांची भाषा (माडीया) वेगळी होती. आव्हानं बरीच होती, मात्र माझे पती आणि माझी टीमसोबत असल्यामुळे थोडं सोपं होत. पण एक स्त्री लीडर म्हणून वेगळ्याच आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ते तंत्र मला हळूहळू सापडत गेलं. मार्ग काढत-काढत मी पण शिकत गेले आणि शेवटी एक विशालकाय सुंदर विषय एका चित्रभाषेत बांधला गेला.

आता परदेशात पहिला मराठी चित्रपट करण्याचं आव्हान उचललं आहे. दोन वर्षांपासून मी लॉस एंजेलिसला जाऊन-येऊन विविध आघाड्या सांभाळतेय. 
हेमलकसा ते लॉस एंजेलिसचा प्रवास फार गमतीशीर आहे. हॉलिवूडची टीम आणि माझी हेमलकसाची टीम आकाश-जमिनीचा फरक आहे. तिथं प्रत्येक क्षणाचा हिशेब आहे. इथे सूर्याकडे बघत जरा वेळ उभा राहा म्हणून सांगितलं तर शॉट संपल्यावरसुद्धा तो आदिवासी दिवसभर तसाच उभा राहिला.

कालच्या प्रसंगाची कंटिन्यूटी म्हणून तुला यावे लागेल तर आज माझा मूड नाही. मला पैसे पण नकोत आणि मला फेमस पण व्हायचं नाही म्हणून कलाकार यायचाच नाही. मग मी स्वतः जाऊन त्यांची मनधरणी करायची.

आता लॉस इंजेलिसला मोठ्या डॉक्‍टर/इंजिनिअरना फक्त दोन ओळीचं का होईना सिनेमात काम करायचंय. सगळीच धम्माल आहे आणि वेगवेगळे अनुभव आहेत. या सगळ्या खट्ट्या-मिठ्ठ्या आठवणींना घेऊन मी परत येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत मी जाऊन येते शोधायला की ‘सुख म्हणजे नक्की काय असतं.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com