आपण प्रगती करून काय मिळवतोय?

समृद्धी पोरे 
सोमवार, 3 जून 2019

"सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक  - समृद्धी पोरे 
आदिवासी भागातला अनुभव वेगळाच होता. चित्रपटासाठी मॉबच्या सिनला चार-पाच गावांतून आदिवासी आणावे लागले. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर सगळ्यांना छान जेवण वाढण्यात आलं. टेबल-खुर्चीवर बसायला ते तयार नव्हते, शेवटी खाली पंगत वाढायला घेतली. सगळे अन्न वाढायची वाट बघू लागले. एक-एक पदार्थ वाढला जात होता, ते असे बघत होते जणू कधी अन्नच बघितलं नव्हतं. कुणीच खात नव्हतं. सगळं ताट भरलं कुणीच जेवत नव्हतं. शेवटी मला सगळे सांगायला आले, की काम करणारा एकही आदिवासी जेवत नाहीये. काही लहान मुलांनी खाल्ल्यासारखं केलं पण टाकून दिलं. चिकन मसाला, मटण मसाला, पालक पनीर, पुलाव, ताक, भजी, पापड हे सगळं त्यांनी कधीच बघितलं नसल्यामुळे त्यांना त्याची चव नाहीये. ते असलं अन्न खात नाहीत. मला त्यांच्या म्होरक्‍याने  सांगितलं होतं, की काय खर्च करू नका. मातीच्या मडक्‍यात भाताची पेज आणि असल्यास त्यातच मास टाकून शिजवायचं. बाकी कुठलेच मसाले न टाकता बनवा. मीच शहाणपणा केला, की नको छान सगळं हॉटेलातल्या सारखं बनवा. सगळे जे खातील तेच जेवण आदिवासींना पण द्या. माझा हेतू चांगला होता. पण ते उपाशीच राहतील हे मला माहीत नव्हतं. मी त्यातल्या एक-दोघांना भरवायचा प्रयत्न केला. पण निष्फळ! शेवटी त्यांना हवं होतं तसं मडक्‍यातलं मटण-भात वेळेवर बनवला. सगळे पोटभर जेवले. पुढचे काम आनंदात पार पडलं. 

त्यांच्या कॅमेरासमोरच्या नैसर्गिक वावरापुढे चांगले कलाकार घाबरत होते. मला दिसत होतं, चित्र काय उमटतंय... प्रेक्षकांना या भागात न येताही इथे फेरफटका मारल्याचा आनंद मिळणार आहे. रात्र झाली, त्यांचे दुसऱ्याही दिवशी काम होतं. त्यांची एका मोठ्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. काळोख पडायच्या आतच ते जेवतात आणि काळोख पडल्याबरोबर ते झोपतात. साडे-सातला सगळे आदिवासी गाढ झोपलेसुद्धा. रात्रीचे काही सीन मला शेवटी रद्द करावे लागले. मला सगळं काम आटपून नेहमीच १२ वाजायचे झोपायला. 

दुसऱ्या दिवशी कोण-कोण आदिवासी लागणार म्हणून मला माझा असिस्टंट विचारायला आला. आता दिसायलाही सगळे जवळपास सारखे आणि नावही माहीत नाही. सांगणार कसं, शेवटी ते झोपले होते तिकडे मला जावं लागलं आणि निवडायला सांगितले. आम्ही तिघे तिकडे गेलो तर सगळे इतके गाढ झोपले होते. आमच्या येण्याने एकाचीही झोपमोड झाली नाही. कुणी कुठेही झोपलं होतं. बायका, माणसं, छोटी मुलं कुणाच्या अंगावर कपडे आहेत, कुणाच्या नाहीत; पण कशाचीच चिंता नाही. ना उद्याची चिंता, ना आपल्या जवळचं काही चोरी जाईल याची चिंता. ना कुणा स्त्रीला कुणी पुरुष येऊन माझ्या इज्जतीवर हात घालेल याची चिंता. सगळेच कसे निर्भय, स्वच्छ मनाने शांत झोपले होते. मनात म्हटलं देवानं हा माणूस रेखाटला होता. हेवे-दावे नसलेला, मनात कसलंही पाप नसलेला. आपण प्रगती करून काय मिळवतोय, हा आम्हा तिघांना मोठ्ठा प्रश्‍न पडला होता. बालपण गेल्यावर आपण असे कधी झोपलो होतो, याचा विचार करत आम्ही त्या दिवशी झोपी गेलो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Samruddhi Pore maitrin supplement sakal pune today