esakal | गरज नियोजनाची!
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi-Pore

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

गरज नियोजनाची!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
मी मागच्या लेखात आपल्या देशात इतका अमृतसरीसारखा पाऊस पडतो, त्याचे नीट नियोजन का नाही म्हणून लिहिले होते. त्यानंतर एक आठवडा उलटला आणि पावसाचा कहरच झाला. सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर जवळपास सगळे पाण्याखाली गेले. दुकानाच्या फक्त पाट्या दिसू लागल्या. सगळी माणसं एखाद-दुसरं गाठोडं घेऊन नावेत बसून जीव मुठीत धरून योग्य स्थळी येत होती. आपल्या देशात खरंच काहीही घडू शकते ना? आणि त्याची पूर्वकल्पना कुणालाच नसते, असे काहीसे वाटू लागले आहे.

काही वर्ष आधी हे सर्व पचलंही असतं. पण आता आपण इतक्या प्रगती पथावर आहोत की, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातली बातमी आमच्या हातातल्या मोबाईलवर सेकंदासरशी समजते. सांगलीसारख्या शहरात पावसाच्या पाण्याने पूर येतो. गावात हळूहळू पाणी शिरत जातं. गावकरी घाबरतात. हजारोंनी व्हिडिओ काढले जातात. जगप्रसिद्ध होतात. लाखो लोक ते इकडून तिकडे पाठवतात, अगदी अमेरिकेपर्यंत! पण त्यांना योग्य मदत मिळतच नाही. नंतर गावकऱ्यांची घरं पाण्याखाली जाऊ लागतात, ते आकांत करून मदत मागू लागतात. पण अजूनही प्रशासन पोचलेले नसते किंवा वरिष्ठांचे आदेश नसल्यामुळे जवळपासचे प्रशासकीय अधिकारी योग्य ती सोय कण्यात अयशस्वी ठरतात. मग दोस्त, मित्र, मदत करणारी इतर देव माणसं कुठूनतरी नावेची व्यवस्था करून गावकऱ्यांना मदत करायला धावतात. अर्थात त्यांच्याकडे पुरेसे ज्ञान नसते. घर वाहून जाणार म्हणून माणसं जमेल तेवढी जन्मभराची पुंजी गाठोड्यात टाकून नावेत बसतात आणि निघतात. नावेत वजन जास्त होते किंवा नाव बरोबर नसते, ती वाटेतच उलटते आणि पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात जवळपास सगळे मृत्युमुखी पडतात. गरोदर बायका, सहा महिन्यांचं मूल, म्हातारी माणसं...

असह्यतेने एका क्षुल्लकशा गैरसोयीने मरतात. लिहितानाही डोळे भरून आलेत. आजही वाटतंय टायटॅनिकसारख्या मरणाच्या थंड पाण्यातून लोक वाचवून बाहेर काढणारे प्रशासन किती सज्ज असावे? आपण का नाही? 

त्या माणसांची मृत्यूनंतरही शोकांतिका संपत नाही. चिखलात पडलेले मृतदेह काढायलाही प्रशासन पोचत नाही. बातम्यांतून वारंवार ते सगळं दाखवलं जातं. आपण चॅनेलवाल्यांना नावं ठेवतो. पण अशावेळी त्यांचं कौतुकच म्हणावं, ते पोचतात आणि सामान्य नागरिकांना मदतीचे आव्हानही करतात. तिथल्या प्रशासनाचा ढिसाळ कारभारही बाहेर काढतात. त्यांना घाबरून का होईना, थोडी हालचाल सुरू होते. बरं हालचाल म्हणजे काय?

तिथला कुणीच स्थानिक नेता जो मतदान करण्यासाठी झोळी घेऊन दारोदार फिरलेला असतो तो कधीच सुरक्षितस्थळी पसार झालेला असतो. त्याचं तोंडही दिसत नाही. 

मदत करणारे दिसतात, माझ्या देशाचे जवान, इंडियन आर्मी! त्यांचे मदतीचे हात हे जात, पंथ, धर्म, परिस्थिती बघून कधीच पुढे येत नाहीत. तिथे असतो फक्त माणूस! 

परवा एका व्हिडिओमध्ये बघत होते. पुरात अडकलेल्या एका महिलेला सुरक्षित स्थळी पोचवल्यावर ‘आज म्या देव पाहिला’ सारखे ती स्त्री त्या जवानांच्या पाया पडत होती. तो जवान मात्र क्षणाचाही विलंब न लावता पटापट नागरिकांना मदत करत होता. शंभरवेळा नतमस्तक माझ्या देशाच्या लढणाऱ्या जवानांना! काय असतं यांचं जीवन, हे मी जवळून बघितलं आहे.

मॅकेनिकल इंजिनिअर असलेला माझा भाऊ जेव्हा देशाच्या सेवेसाठी इंडियन आर्मीत सिलेक्ट झाला आणि पहिलंच पोस्टिंग बॉर्डरवर. बॉर्डरवरच्या लढाया, महिना-महिना काहीच संपर्क नाही. दिवाळी येते, घरात गोडधोड बनतं.

आपल्याला आपल्या मुलाची खुशालीही कळलेली नसते. काय असेल वातावरण? कल्पना करू शकता? आणि दुसरीकडे नेते मंडळींची मुलं हैदोस घालत असतात. कसं वाटत असणार आर्मीतल्या मुलांच्या कुटुंबांना? खरंच विचार करून बघा. पगार किरकोळ, कुटुंबापासून वर्ष-वर्ष दुरावा. माझे आजोबासुद्धा आर्मीत होते. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. असे सगळे वातावरण घरातच बघितले आहे. बरेच आहे बोलण्यासारखे सविस्तर बोलूनही आता एवढेच म्हणेन, आपल्याला नियोजन करण्याची फार-फार गरज आहे. कडक नियोजन, आणि ते नीट पाळले न गेल्यास कडक कारवाई. प्लॅन ए, बी आणि सी आधीच तयार करून ठेवून कुठलीही परिस्थिती ओढवली तर आपण सज्ज असायलाच पाहिजे. आता खरंच बस! सगळ्यांना फैलावर घ्या.

loading image