esakal | भाषेचा खरा विकास
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi-Pore

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

भाषेचा खरा विकास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना भाषेकडे खूप लक्ष द्यावे लागत असे. आयुष्यभर एक विशिष्ट लहेजा असलेली भाषा बोलायची सवय असलेल्या माणसाला हे फार कठीण होऊन बसते. ग्रामीण रोल आला, की कोल्हापूरची मराठी आणि श्रीमंत शिकलेला रोल असला, की प्रमाण भाषा हे ठरलेले समीकरण होते; पण अलीकडच्या काळात हे समीकरण मोडले. जो ज्या भागातून येतो, त्याला त्याच्या भाषेतून काम करायला मिळाले, की तो अक्षरशः सुसाट सुटतो आणि खऱ्या अर्थाने त्याची कला तो भूमिकेत ओततो. पाठ करून संवाद म्हणायची त्याच्यावर वेळ येत नाही. भूमिकेमध्ये शिरून, समजून तो कला सादर करू शकतो. मकरंद अनासपुरे एक वेगळीच भाषा घेऊन आले तेव्हा मजा आली आणि त्यांची भाषा प्रसिद्ध झाली. भारत गणेशपुरे त्यांची अमरावतीची भाषा बोलून करमणूक करू लागल्यावर एक वेगळीच मजा वाटू लागली.

बिग बॉस या कार्यक्रमातला शिव ठाकरे त्याची ग्रामीण भाषाच बोलत राहिला आणि प्रेक्षक त्याच्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडले. मुंबईनगरी अशी आहे, की जो जसा आहे तसा ती स्वीकारते. कुठल्याही प्रांतातला माणूस इथे आरामात पंख पसरवून विसावतो, त्यामुळे एक वेगळीच भाषा या शहराची तयार झाली आहे. त्याला आपण मुंबईची भाषा म्हणू लागलो.

सर्वप्रथम माणसाच्या दिसण्याने आपल्याला भुरळ पडते; पण त्यानंतर तो बोलू लागला, की त्याचे व्यक्तिमत्त्व समजते. तो फार प्रमाण भाषेत बोलत असूनही त्याचे विचार सुंदर नसल्यास संपूर्ण व्यक्तिमत्त्व मातीत मिळते. म्हणजेच काय, भाषा ही संवाद साधण्याचे साधन आहे. कुठल्याही लहेजातून तुम्ही उच्च दर्जाचे विनोद करत असाल किंवा उच्च विचार मांडत असाल, तरच संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची छाप पडते. 

मराठी भाषेचे सौंदर्य फार सुंदर आहे. जेवढी गावे, तेवढ्या तऱ्हेच्या भाषा. महाराष्ट्रात प्रत्येक पंधरा किलोमीटरनंतर मराठी भाषेचा लहेजा बदलत जातो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यांतून कलाकार कुठल्याही दडपणाखाली न येता त्यांना येते तशी कला सादर करू लागले आहेत, त्यामुळे विविधरंगी भूमिका बघायला मिळत आहेत. पूर्वी लोक हसतील म्हणून नाटकातल्यासारखे बोलण्याचा व्यक्ती प्रयत्न करीत असे; पण प्रयत्न तो प्रयत्नच! तो कुठेतरी कमी पडतच होता. आता नाटकात, सिनेमात, शहरात भाषेचा बिनधास्तपणा आला आहे आणि हाच खरा भाषेचा विकास आहे.

loading image