मुलगा असणाऱ्या आईसाठी...

Samruddhi-Pore
Samruddhi-Pore

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
मी एकदा शेजारच्या काकूंकडे गेले होते. पोळ्या करत स्वतःशीच बोलत होत्या. प्रश्‍ने आणि उत्तरे. आधी मला वाटले, त्या काहीतरी ठरवत असतील. मीसुद्धा द्विधा मनःस्थितीत असते, तेव्हा काय नेमका निर्णय घ्यायचा त्यासबंधी स्वतःशीच बोलते. ‘असे केले तर हे होईल आणि ते केले तर तसे होण्याची शक्यता जास्त आहे. मग आपण हे ठरवूयात...’ 

मुळात बरेच लोक मनातल्या मनात विचार करून, स्वतःशीच बोलत निर्णय घेतात. काकू मात्र तसे काही करत नव्हत्या. त्या अगदी सहज कुणीतरी समोर असल्यासारख्या बोलत होत्या. आधी मी त्यांना आवाज देणार होते, पण म्हटले नको त्यांना डिस्टर्ब करायला. तेवढ्यात त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. मी घाईत होते, पण वेगवेगळे विषय काढून त्या बोलणे लांबवायला बघत होत्या. 

काकू महिला कॉलेजला बरेच वर्षे शिकवत होत्या. गेले ५-६ वर्षे निवृत्त झाल्या आहेत. दोन मुलगे होते. त्यातला एक परदेशात शिकायला गेला होता आणि एक इंजिनियरींग करत होता. आपल्या विश्‍वात पूर्णपणे रमलेल्या काकांनी निवृत्त झाल्यावर पुन्हा एकदा खासगी कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली होती. त्या आता पूर्वीपेक्षाही जास्त व्यग्र आहेत. माझ्या लक्षात आले, की काकूंना बोलायला कुणीच राहिले नव्हते. त्यांनी संपूर्ण आयुष्य नोकरी केली होती. सकाळी उठून सगळ्यांचे डबे करून कॉलेजला जाणे, कॉलेजमध्ये सतत लेक्चर्स घेणे. मुले लहानपणी सतत ‘आई-आई’ करत मागे होती. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आई लागायची. आता त्यांना ती सवय राहिली नाही. ती आता पूर्णपणे स्वतंत्र झाली आहेत. त्यांना वाटले होते, निवृत्त झाल्यावर घरामध्ये पूर्णपणे गुंतून जाऊ. पण आता त्यांच्यात गुंतायला कुणालाच वेळ नव्हता. काकूंना नोकरी करताना संपूर्ण जग त्यांच्याभोवती फिरते आहे, असे वाटायचे. आपल्या वाचून सर्वांचे अडते आहे.

नवरा, मुलगा, मुले, घर, कॉलेज, विद्यार्थिनी... आणि अचानक ते सगळे आता थांबले होते. आपल्यावाचून आता कुणाचेच अडत नाही, ही गोष्ट त्यांना खूप त्रास देऊ लागली. आतल्या आत त्यांनी एक आभासी दुनिया स्वतःभोवती निर्माण करून घेतली होती. त्या विश्‍वाशी त्या नकळत एकट्याच संवाद करू लागल्या होत्या. 

मी त्यादिवशी त्यांना बऱ्यापैकी वेळ देऊन परत घरी आले. पण माझ्या लक्षात आले, की त्यांचे बोलणे असंबध होते. त्यांच्या मनावर हळूहळू परिणाम झाला होता. मी काकांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. ते कामात व्यग्र होते. एक अतिशय हुशार प्राध्यापकबाई वयाच्या चौसष्ठव्या वर्षी एका मानसिक आजाराला नकळत बळी पडताना दिसू लागली होती. मुलाकडून कळले, की ती आजकाल निरर्थक बोलू लागल्याने त्याने आता संवादच बंद केला आहे. आयुष्यभर घरात सगळ्यांना काय हवे नको ते बघणारी, सर्वांची काळजी घेणारी, शिस्तप्रिय असणाऱ्या आईलाही आपण प्रेमाने काय हवे-नको ते विचारायची गरज आहे, हे घरातले विसरूनच गेले होते. बायकोबद्दल, आईबद्दल प्रेम नव्हते असे काही नव्हते. पण, ‘आईला काय गरज आहे, काळजी करायची तर ती घेईल ना स्वतःची! वाचून-वाचून ती अर्धी डॉक्टर झाली आहेच’, असे घरातल्यांना वाटे. हे सगळे बहुधा ज्यांना दोन्ही मुलगे होतात, त्यांचा बाबतीत जास्त घडते. मुली थोड्या आईसोबत जुळवून घेतात.

पण आईचा पदर धरून सतत, ‘आई हे दे, ते दे,’ करणारे मुलगे अचानक वेगळ्याच विश्‍वात रमतात. हा झटका काही आयांना सहन होत नाही. ज्या आया या परिस्थितीसाठी तयार असतात, त्यांना विशेष काही वाटत नाही. म्हणूनच स्त्रियांनी घर, संसार, मूल, नोकरी या व्यतिरिक्त आपले छंद जोपासणे आणि मैत्रिणी असणारे एक विश्‍व आधीच तयार ठेवावे. माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘मी मुद्दामच काही गोष्टीत नवऱ्याला आणि मुलांना इंडिपेडेंट होऊ देत नाही. त्यांचे माझ्यावाचून कसे अडेल, हेच मला हवे असते. हातात रुमाल नेऊन देणे, कपाट लावणे, पाणी सुद्धा मी हातात नेऊन देते. बाकी घरातल्या आवरा आवरीत वेळ घालवत बसत नाही.’ 

काकूंचा परदेशातला मुलगा काही दिवस परत आला. त्यांना सगळ्यांकडून संपूर्ण अटेंशन मिळू लागले. ‘आई तुझ्यावाचून आमचे अडते,’ ही गोष्ट काकूंना जास्त सुखावून गेली. व्हॉटसॲपवर खाते उघडले गेले. विचारांची देवाण-घेवाण करता-करता बदललेल्या जगासोबत, खऱ्या-खोट्या फेसबुक फ्रेंडसोबत काकूपण अंगठे दाखवून लाईकचे बटण दाबू लागल्या आणि हळूहळू सगळे ठिक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com