हायकोर्ट ते अमेरिकन चित्रपट ( समृद्धी पोरे)

हायकोर्ट ते अमेरिकन चित्रपट ( समृद्धी पोरे)

सेलिब्रिटी टॉक  - समृद्धी पोरे
मी  पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट बनवतेय. नाव आहे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’. प्रत्येक मनुष्य कदाचित आयुष्यभर हेच शोधत असतो. जो मनुष्य आहे त्या परिस्थितीत ते शोधतो त्याला सुख सापडते. नाहीतर सुखाच्या शोधात चुटकीसरशी कसे आयुष्य संपते कळतसुद्धा नाही. एका सर्वसाधारण परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करणे, एका हुद्द्यावर काम करणे, त्यानंतर अचानक ते सोडून दुसरेच काहीतरी करायचा निर्धार करणे खरंतर सोपे नसते.

माझ्या बाबतींतही असेच झाले. ग्रॅज्युएशन झाल्यावर एका लग्नसमारंभात सहज बघितलं आणि लग्नासाठी मागणी घातली. वडील सरकारी मोठ्या पोस्टवर असतानाच वारले होते. त्या दुःखात असतानाच हा प्रस्ताव! आईला वाटले मुलीला एक सुखी आयुष्य देणारा ठरेल. माझे लग्न झाले आणि आईचा तर्क बरोबर निघाला. लग्नानंतर मी पहिल्यांदा मुंबई बघितली होती. इथे येऊन रुईया कॉलेजला दाखला घेतला. पुढचे शिक्षण पूर्ण करत राहिले. डीएमएलटी झाले. एलएलबी झाले (वकिलीचे शिक्षण) सरळ हायकोर्टात प्रॅक्‍टिस करू लागले. सोबत घर संसार सुरू होता. दोन सुंदर मुली झाल्या. कामाचे आणि घराचे अंतर ट्रेनने दीड ते दोन तास लागायचे. या १५-१६ वर्षांच्या वकिली प्रॅक्‍टीसमध्ये खूप खटले चालवले. प्रत्येक खटला एक सिनेमाची गोष्ट होऊ शकेल. त्या गोष्टी लिहीत गेले. आता चक्क अमेरिकेत शूटिंग करायला गेले. सगळाच प्रवास शून्यातून सुरू झाला. कुटुंबात मित्र परिवारातील कुणीच चित्रपटाशी निगडित नव्हते. भारतात चित्रपट तयार केला तेव्हा एक टीम तयार केली. तीच टीम माझ्या सर्व चित्रपटासाठी होती. पण आता अमेरिकेत मात्र हॉलिवूडचे सगळे तंत्रज्ञ आहेत. सगळे न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करून आले आहेत. त्यांची लीडर होऊन काम करायचे म्हणजे मला आपली पात्रता वाढवण्याची गरज आहे.

भारताचे तंत्र आणि अमेरिकेचे तंत्र फार फरक आहे. काही मशिन्स, कॅमेरे मी बघितलेलेसुद्धा नाहीत. माणूस रोज शिकत असतो. अनंत काळाचा विद्यार्थी असतो. तशी मी पण आहे. चौकस बुद्धी सतत मिळेल त्या ठिकाणातून माहिती गोळा करत असते. मला तेथील एक गोष्ट प्रामुख्याने आवडते ती म्हणजे शिस्तबद्धता, समोरच्याला ते कधीच गृहीत धरत नाही. प्रत्येकाच्या वेळेची किंमत त्यांना असते मग तो कितीही छोटा काम करणारा असो. आपल्याकडे माझी बॅट आहे ना, मग मीच बॅटिंग करणार. तसाच निर्माता इथे वागत असतो. तो प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतो. हिरो हिरॉईन निवडीपासून तर चित्रपटाचा शेवट बदलेपर्यंत. कधी कधी त्याची मुलगी किंवा भाचीच अभिनेत्री म्हणून हवी असते. चित्रपट सुरू झाल्यावर आणि सगळ्या ठरल्यावरसुद्धा त्याचे जसे जसे कान भरले जातील, तसे त्याचे निर्णय बदलत जातात. परंतु परदेशात मात्र असे होत नाही. आधी ठरले त्यात बदल करायचे असतील तर सर्वानुमतेच बदल होऊ शकतात. जो पैसे टाकतो तो जेव्हा जे म्हणेल तसे होऊ शकत नाही. कारण बाकीच्यांनी आपला विश्‍वास टाकलेला असतो आणि तो तिथे सहजासहजी तोडला जात नाही. मी आपल्या इंडस्ट्रीला नावे ठेवत नाही. पण चांगले ते दुसऱ्याच का असेना पण आपण शिकून घ्यावे आणि आपल्याकडे रुजवावे, या मताची मी आहे. तिकडून काम करून आल्यावर आपल्याकडे मी त्यांच्या चांगल्या गोष्टी रुजवून काम करणार आहे.

एक हिंदी चित्रपट केल्यावर मी फक्त हिंदी सिनेमाच्याच मागे पडले असते. पण आपल्या देशात आपल्या भाषेत काम करण्याची मजा वेगळीच आहे. आर्ट डायरेक्‍टर, कॅमेरामन लाइटमॅन, ड्रेस मॅन सगळे आपली कला दिग्दर्शकासोबत एका सिनवर टाकतात आणि संवादासकट तो एक एक सीन लॉक होत जातो. कालांतराने संपूर्ण स्क्रिप्ट वेळापत्रकासकट लॉक होते आणि नंतर त्यात बदल न होता प्रत्येक कलाकार वागू लागतो... असे व्यवस्थापन पैशाची पण नासाडी आटोक्‍यात आणते. अशा व्यवस्थापनात आम्ही काम करतोय. पुढच्या सत्रात तेथील कलाकारांच्या गंमती जमती घेऊन लवकरच येईल तुमच्या भेटीला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com