‘तुला पाहते रे’ टर्निंग पाॅइंट!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 August 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - सोनल पवार, अभिनेत्री 
मी मूळची साताऱ्याची. माझे शिक्षण साताऱ्यामध्ये झाले. मी बी.फार्म केले आहे. शिक्षण करता करता मी एकांकिका स्पर्धेमध्ये, तसेच आमच्याच महाविद्यालयाच्या नाटकांमध्ये भाग घ्यायचे. साताऱ्यात मुंबईसारखे नाही, तेथे छोटे-छोटे कार्यक्रम होतात. मी एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला लागल्यावर मला वाटले, मी अभिनयात काहीतरी करू शकते. लहानपणी मला अजिबात वाटले नव्हते, की मी अभिनयक्षेत्राकडे वळेन किंवा मला तशी या क्षेत्राची आवडही नव्हती. पण मी टीव्ही भरपूर पाहायचे. मी, माझा अभ्यास आणि टीव्ही इतकेच आवडायचे, असे म्हटले तरी चालेल. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीकरिता मुंबईला आले. त्या वेळी मी एका ग्रुपमधून नाटकात अधूनमधून काम करू लागले. तिथे आम्हाला शिकवायला एक दादा होता, त्याने मला विचारले, ‘‘तू ‘अस्मिता’ नावाच्या मालिकेतील एक भूमिका करशील का?’’ नोकरी सांभाळून शक्‍य असल्याने मी होकार दिला. ‘अस्मिता’ माझी पहिली मालिका. त्यानंतर मी ‘सरस्वती’ मालिकेत काम केले.

याशिवाय ‘शौर्य’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘गोठ’ या मालिकांमध्ये काम केले. तसेच मी ‘२१ दिवस’ या मराठी चित्रपटातही काम केले. हा माझा पहिलाच चित्रपट. ‘झी मराठी़ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेची मला ऑफर आली. ही मालिका माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली. या मालिकेने मला खरी प्रसिद्धी मिळाली. यामध्ये मी रुपाली नावाचे पात्र साकारले होते. ही मालिका संपल्यावरही लोक मला रुपाली नावानेच ओळखतात. कधीकधी मलाच स्वतःला रुपाली आणि सोनल नावामध्ये कन्फ्युजन होते. त्याशिवाय या मालिकेतील माझ्या आणि ईशाच्या मैत्रीलाही लोकांची पसंती मिळाली. ‘तुला पाहते रे’ मालिकेसाठी मी ऑडिशन दिले. त्या वेळी मला ‘झी मराठी’ची मालिका आहे, एवढेच सांगण्यात आले होते. माझ्या लुक टेस्टनंतर या मालिकेच्या निर्मात्यांनी मला कॉल केला आणि तुझी निवड झाल्याचे सांगितले. त्या असेही बोलून गेल्या की, या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत असणार आहे. मला धक्काच बसला.

ज्यांना लहानपणापासून भेटायची फक्त इच्छा होती, चक्क त्यांच्यासोबत मला काम करायला मिळणार या आनंदातच तो दिवस गेला. माझ्यापेक्षा माझ्या बाबांना जास्त आनंद झाला, ते खूप मोठे फॅन आहेत सुबोध दादाचे. मी बी.फार्म केले असल्याने, ‘एवढं शिक्षण घेतलंय तर नोकरीच कर,’ असे माझ्या घरचे म्हणायचे. नोकरी सोडून अभिनयाकडे वळले तेव्हा थोडे त्यांना खटकले होते. पण जसजशा मला मालिका मिळत गेल्या, मी काहीतरी करतेय याची त्यांना खात्री पटली व त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. बाहेरही माझे कौतुक होऊ लागले मग तर ते खूशच झाले. असा एकूण माझा प्रवास होता.

आता सध्या मी एक अल्बम करते आहे. या अल्बममधील ‘पाहिलं तुला’ या गाण्यामधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हे गाणे प्रदर्शित होईल. 
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Sonal pawar maitrin supplement sakal pune today