आमची मैत्री विश्‍वासावर टिकून!

Varun-Dhawan-Alia-Bhatt
Varun-Dhawan-Alia-Bhatt

जोडी पडद्यावरची... - वरुण धवन, अलिया भट 
वरुण धवन आणि अलिया भट यांचा ‘कलंक’ चित्रपट येतो आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटासाठी ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांचे ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ असे चित्रपट गाजले.

‘कलंक’मध्ये वरुण जाफर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर अलिया रूप. वरुण म्हणाला, ‘‘आम्ही एकत्र काम करतो तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. आम्ही दोघेही भूमिकेत नावीन्य शोधतो. या चित्रपटातही आम्ही प्रेक्षकांची निराशा करणार नाही.’’ अलिया म्हणते, ‘‘आम्ही एकाच वेळी करिअरला सुरवात केली व तेव्हापासूनच आमच्यात निखळ मैत्री आहे.

‘कलंक’सारख्या पीरियड फिल्ममध्ये काम करणे अवघड असते. मात्र, वरुणसह अन्य कलाकार परिचयाचे असल्यामुळे काम करणे सोपे गेले. वरुण मला खूप मदत आणि सहकार्य करतो. त्याचा सीन चांगला झाल्यास मी त्याचे कौतुक करते किंवा चूक आढळल्यास तीही आम्ही एकमेकांना सांगतो.’’ 

वरुणमध्ये आता काही बदल झाला आहे का, असे विचारले असता अलिया म्हणाली, ‘‘लोकांसाठी वरुणमध्ये काही बदल झाला असेल, परंतु माझ्यासाठी नाही. अर्थात, तो आता मॅच्युअर्ड झाला आहे. आमची दोघांची केमिस्ट्री अफलातून आहे. त्यामुळे काम करताना एकमेकांना काही सांगण्याची गरज वाटत नाही. आमच्या मैत्रीचे नाते वेगळेच आहे. एक दिवस आम्ही गोड बोलतो, तर दुसऱ्या दिवशी भांडतोही. एकमेकांवरील विश्‍वासावर आमची मैत्री कायम आहे.’’ 

वरुण म्हणाला, ‘‘मला सुरवातीला महेशसरांची मुलगी चित्रपटसृष्टीत येतेय, एवढेच माहीत होते. तिची व माझी पहिली भेट ‘स्टुडंट ऑफ द इअर’च्या सेटवर झाली. त्या वेळी मला ती खूप छोटी व क्‍यूट वाटली. काम करताना ती ‘लंबी रेस’ खेळणार, हे मला माहीत होते आणि तसेच झाले. ती सुरवातीला छोट्या गोष्टींवरून रडायची, नाराज व्हायची. आता ती खूप धीट आणि गंभीर झाली आहे. ती कोणत्याही समस्येचा बिनधास्त सामना करते, तेही न रडता!’’ अलियाच्या ॲक्‍टिंगबद्दल वरुण म्हणाला, ‘‘अलिया सतत ॲक्‍टिंगचा विचार करते. पुढचा सीन अधिक चांगला कसा होईल, हाच विचार ती करीत असते. ती थोडी बडबडी आहे. आम्ही एकमेकांच्या कामाबाबत बोलतो आणि सूचनाही करतो. प्रत्येक सीनमध्ये माझ्याबरोबरच अलियाही सुंदर दिसली पाहिजे आणि तिचे कामही छान झाले पाहिजे, असा माझा आग्रह असतो.

तीदेखील माझ्याबाबतीत असाच विचार करते. आमचे ट्युनिंग चांगले आहे आणि त्यामुळेच कामही उत्तम होते. ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोरे परदेसीया’ या गाण्यासाठी तिने घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. या गाण्यासाठी तिने बिरजू महाराजांकडून प्रशिक्षण घेतले. या चित्रपटातील तिचा परफॉर्मन्स पाहून सगळे चकित होतील...’’

अलिया म्हणाली, ‘‘वरुण आणि मी नेहमी कामाबाबत चर्चा करीत असतो. मला वाचनाची खूप आवड आहे. तो मला कोणते पुस्तक वाचले, ते कसे वाटले याबाबत विचारीत असतो. वरुणला वाचनाची आवड अजिबात नाही. त्याला खाण्याची आवड आहे आणि मला तो खात राहा, असे सांगतो.’’ 
(शब्दांकन - संतोष भिंगार्डे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com