नव्या घराची मजा

Girija-Oak
Girija-Oak

सेलिब्रिटी व्ह्यू - गिरिजा ओक
२००८ -
‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक भागात विशिष्ट बजेटचं घर भाड्याने हवं आहे.’
‘ओके मॅडम, तुम्ही एकट्या राहणार की फॅमिली आहे?’
‘एकटी’
‘........(शांतता).... बरं बरं. मी सांगतो काही असलं तर’

२०१९ -
‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक भागात विशिष्ट बजेटचं घर भाड्याने हवं आहे.’
‘ओके मॅडम, तुम्ही एकट्या राहणार की फॅमिली आहे?’
‘फॅमिली आहे. मी, नवरा, आमचा ६ वर्षांचा मुलगा आणि त्याला सांभाळणारी ताई.’
‘(चटकन) १०-१२ ऑप्शन्स आहेत मॅडम, कधी दाखवू?’
कळतंय ना तुम्हाला? एकटी मुलगी, त्यातून अभिनेत्री म्हणजे घर मिळणं अशक्‍य! मी अनेकदा आईला बरोबर घेऊन जायचे. तेव्हा ‘ही तुमचीच आई आहे ना नक्की?’ अशा नजरेनं बघायची लोकं. कुठे घर मालकाला अडचण तर कुठे सोसायटीला. यांची नक्की भीती काय हेच मला कळायचं नाही. एक ‘अभिनेत्री’ एका घरात एकटी राहून असं काय भीतीदायक करणार कोणास ठाऊक? एकटं राहू इच्छिणाऱ्या मुलींसाठी भाड्याने घर मिळवणं कठीणच असतं पण त्यातून तुम्ही अभिनय क्षेत्रात असाल तर मग विसराच! जी माणसं रोज आमच्या मालिका बघतात तीच माणसं या सोसायट्यांमध्ये राहतात, कमिटी बनवतात आणि आम्हालाच मीटिंगमध्ये राहण्याची परवानगी नाकारून पुन्हा घरी जाऊन आमचीच मालिका चवीने बघतात! काय लॉजिक आहे राव? मुळात हे क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका यांच्याकडे बघण्याचा असा वेगळा दृष्टिकोन का? संताप आला तरी शेवटी ’सोसायटी’ मधेच राहावं लागतं, अडीअडचणीला जवळची नव्हे, तर जवळ राहणारी माणसं मदतीला धावून येण्याची शक्‍यता जास्त त्यामुळे संताप आवरावा लागतो. काय करणार?
मी तब्बल ३६ घरं बघितल्यानंतर एक घर मिळालं. शूटिंग, शिफ्टिंग, धावपळ सगळी मज्जाच! सध्या त्याच प्रक्रियेतून जातेय. घर मात्र पहिल्या फटक्‍यातच मिळालंय. आता सौ व माता आहे ना! सोसायटी मीटिंगमध्ये पोराला घेऊन जावं आणि ‘जाओ बेटा, अंकल को हॅलो बोलो’ असं प्रात्यक्षिकही करावसं वाटलं. मग म्हटलं अति नको! आता सगळं सुरळीत झालं ना? तर सध्या घर शोधणे ही प्रक्रिया संपली असून घर लावणे ही प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंत पुण्यात आणि मुंबईत सासू सासऱ्यांबरोबर राहत होतो. सगळा संसार मांडायची जबाबदारी एकटीवर नव्हती. आता कबीरच्या शाळेसाठी वेगळीकडे राहणार असल्यामुळे सगळं अगदी नव्याने सुरू आहे. रस्त्यांवरची ‘गृह वस्तू भांडार’ टाइप दुकानं मला खुणावतायत. बादल्या, केरसुण्या, डस्टबीन्स अधिक रंगीत दिसू लागल्या आहेत. शूटिंग नसलं की घरची कामं आणि शूटिंगमध्ये वस्तूंच्या याद्या करणे हेच सध्या सुरू आहे. काही गोष्टी आजकाल ऑनलाइन येतात आणि त्यामुळे वेळ वाचतो, पण डिलिव्हरी घेण्यासाठी घरी पण असावं लागतं ना... मी आणि नवरा दोघंही कामासाठी बाहेर मग सगळं सामान आजकाल माझ्या आईकडे पाठवण्यात येतंय. छोटं गोडाऊन केलंय मी तिच्या घराचं. या सगळ्यात माझ्या लाडक्‍या सासूने मला जवळ जवळ २ महिने पुरेल इतकं किराण्याचं सगळं सामान छान बांधून दिलं आहे (येस, आय लव्ह हर!). मी आत्ता ‘लेडिज स्पेशल’ नावाची मालिका करतेय. इथले निर्माते पण गेल्या महिन्याभरात माझ्या तारखा सांभाळून घेतायत. घर लावणे या प्रक्रियेत मी पार बिझी आहे आणि मला खूप मज्जा येतय! एखादी नवीन गोष्ट तयार करताना जशी आणि जितकी मज्जा येते ना तितकीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com