गणेशोत्सव...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सेलिब्रिटी व्ह्यू : मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री

सेलिब्रिटी व्ह्यू : मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री
परवा, मी मुंबईत असताना माझ्या मुलीचा, स्वरालीचा प्रचंड एक्सायटमेंटमध्ये फोन आला. ती तिकडे अक्षरशः नाचत होती हे मला जाणवत होते. ‘‘आई, आई खाली मांडव घालायला सुरवात झाली. गणपती येणाऽऽऽर...’’ स्वरालीचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. आमच्या सोसायटीत गणपती अतिशय उत्साहाने साजरा होतो. सकाळ-संध्याकाळ मंत्रपठण, आरत्या, वेगवेगळ्या स्पर्धा, कार्यक्रम, गाणी, गोष्टी, गप्पा...! हे १० दिवस नुसते भारलेले असतात. आमच्या सोसायटीत एकंदरच अतिशय सुसंस्कृत वातावरण! प्रत्येक घरटी कुणी ना कुणी एखादी कला जोपासताना दिसेलच. अशा सोसायटीत स्वरालीचं बालपण जाणं हे  आम्हाला तिच्यासाठी फार महत्त्वाचं वाटतं. त्यात गणेशोत्सव म्हणजे सोसायटीचा ‘हायलाइट!’ पुढचे सारे दिवस निव्वळ चैतन्याने, उत्साहाने भारलेले असणार. घराघरांतून उदबत्त्यांचे, उकडीच्या मोदकांचे सुवास घमघमणार, घंटा, शंख, झांजांचे नाद निनादणार, आरत्यांचे स्वर घुमणार. रेशमी साड्या, कपाटातून आणि सोन्याचे दागिने लॉकरमधून बाहेर येणार. सगळ्या सख्या नटूनथटून एकमेकांकडे दर्शनाला जाणार. आमच्या सोसायटीत प्रत्येक घर स्वतःच्या गणपतीला मनोभावे सजवतं, पुजतं आणि त्याच हिरिरीने सोसायटीच्या गणपतीचीही सेवा केली जाते. सगळे जण ज्या आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात, त्या सणाला आजपासून सुरवात झाली! 

प्रत्येक गणेशोत्सवात माझं मन बालपणात शिरतंच... तुळशीबागेतला वाडा आणि तिथले गणपतीचे दिवस. तुळशीबाग गणपती, मंडई गणपती यामध्ये आमचा वाडा. वाड्याचा गणपतीपण जोरदार! तसा आमचा घरचा गणपती काकाकडे खालच्या मजल्यावर असायचा, पण माझ्या धाकट्या बहिणीने, अमृताने एक वर्ष शोकेसमधली मूर्ती काढून त्याची पूजा करायचा खेळ सुरू केला. मग अशी गंमत नको म्हणून दुसऱ्या वर्षीपासून आईबाबांनी आमच्याकडे पण गणपती-गौरी आणायला सुरवात केली. त्यामुळे घरात एक छोटी मूर्ती वाड्यात बऱ्यापैकी मोठी आणि दिंडी दरवाजातून बाहेर पडलं, की तुळशीबागेच्या गणपतीची ही अवाढव्य मूर्ती! त्या काळात आमच्या लहान मूर्तीला ती अजूनच भव्यदिव्य  वाटायची. 

आमच्या वाड्यातही छान कार्यक्रम, स्पर्धा व्हायच्या. या निमित्तानं आम्ही गाणी बसवायचो, नाटक करायचो, अथर्वशीर्षाची पठणं करायचो, माझ्यासारख्या अनेक कलाकारांचं पहिलं वहिलं स्टेज हे वाडा - सोसायटी - चाळीच्या गणेशोत्सवाचंच आहे. कितीतरी जण सांगतात, की तिथेच आम्ही आमची कला सर्वप्रथम सादर केली आणि गणपतीच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत पोचलो. 
घराघरांत बसवल्या जाणाऱ्या या गणपतीला सार्वजनिक स्वरूप देऊन लोकमान्य टिळकांनी केवढी मोठी सांस्कृतिक, वैचारिक चळवळ सुरू केली. गणपतीच्या निमित्ताने लोक एकत्र यावेत. काहीतरी भरीव कार्य त्यांच्या हातून व्हावं असा त्यांचा हेतू होता खरा... पण आता त्याचं झालेलं बीभत्स रूप पाहून त्यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील? 

मूर्तीपेक्षा देखावा मोठा... 
भक्तीपेक्षा दिखावाच खोटा...! 

ठिकठिकाणी छोटी-छोटी मंडळं त्यांचे एवढाले मांडव, वाहतुकीची कोंडी, कालबाह्य देखावे, त्यांचे स्पीकर, आवाज, विचित्र गाणी, त्यावर होणारे हिडीस बीभत्स नृत्य... या साऱ्यात बाप्पाचा जीव घुसमटत असेल का हो? कुठे चाललंय हे सगळं? या सगळ्या मानसिक, वैचारिक, बौद्धिक गोंगाटाने बुद्धीचं, कलेचं दैवत असणाऱ्या बाप्पाचा जीव घाबराघुबरा होत असेल. त्याला फक्त प्रेमाने, मनापासून दिलेली हाक पुरते. त्याला नसते याची गरज! हे माहीत आहे की सुज्ञाला! तरी कुणीच का थांबवत नाही? का हे जितकं जितकं मोठं होईल तितका आपला ‘फायदा’ आहे याच हिशेबात आहेत सगळेच समाजकारणी आणि राज्यकर्ते? अनेक प्रश्‍न असेच वर्षानुवर्षे निरुत्तरित!! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity view Madhurani Prabhulkar Ganeshotsav