सहज राहायचं, सहज वागायचं... (अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर)

मधुराणी प्रभूलकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

सेलिब्रिटी व्ह्यू : मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टिने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सध्या मी एक प्रायोगिक नाटक करतेय, ‘काजव्यांचा गाव’. अलीकडंच या नाटकाला मिळालेल्या अनेक पुरस्कारांमुळं ते गाजतंय. ही कथा आहे कोकणातल्या एका कुटुंबाची. त्यात मी आहे प्रतिभा. शिक्षणाच्या ओढीनं तरुण वयात घरातून पळून गेलेली, आणि आता उच्च शिक्षणाकरिता स्वबळावर अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेय. एका अमेरिकन मित्रासोबतच तिथं राहते. नाटकात ती स्वतःच्या आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याकरिता कोकणातील तिच्या घरी आलेय. या नाटकात प्रतिभाच्या आणि तिच्या वयात आलेल्या दोन भाच्यांबरोबर एक सुंदर सीन आहे. या भाच्या हुशार आहेत, पण गोंधळलेल्या आहेत. वयाला साजेशी स्वप्न आणि वेगवेगळे न्यूनगंडसुद्धा आहेत. आपल्या या ‘भारी’ आत्याविषयी त्यांना कुतुहलमिश्रित प्रेम आहेत. त्या सीनमध्ये या आत्याला खूप काही विचारतात. तू कशी इतकी स्मार्ट झालीस? तिथे कशी रुळलीस? तिथल्या अमेरिकनांना तू कशी वाटतेस... यांवर आयुष्य जवळून पाहिलेली प्रतिभा त्यांना खूप सुंदर पद्धतीने सांगते. ती म्हणते, ‘आपण आपलं सहज राहणं असतं नं, तसं वागायचं...’
प्रदीप वैद्य लिखित-दिग्दर्शित या नाटकात अनेक सुंदर वाक्‍यं आहेत. त्यातलंच माझं हे अतिशय जवळचं...‘सहज राहायचं, सहज वागायचं’ म्हटलं तर सोपं, पण तसं अवघडही. एक वय असतं ज्या वयात आपल्यामध्ये आत खूप खळबळ असते. काहीतरी सिद्ध करायची, वेगळं दिसायची, सगळ्यांमध्ये ‘स्वीकारलं’ जायची... त्यात ‘स्वत्व’ हरवून बसते कधीकधी!

मला या वाक्‍याच्या वेळी नेहमी माझे जाहिरात क्षेत्रातले सुरवातीचे दिवस आठवतात. ‘जाहिरातीतून काय करायचं, अर्थात मॉडेलिंग करायचं,’ हे स्वप्न मी सदाशिव पेठेतल्या घरात बसून पाहिलं होतं. मुंबईला गेल्यावर अनेक प्रयासानंतर जाहिरातींच्या ऑडिशन्सपर्यंत पोचायचा मार्ग सापडला आणि मी ऑडिशन्स द्यायला सुरवात केली. सुरवातीला मला खूप बुजल्यासारखं व्हायचं. घरातून थोडाफार मेकअप करून ट्रेन-बस असा प्रवास करत केविलवाण्या अवस्थेत मी तिथं पोचायची आणि तिथं आलेल्या इतर मुली एकदम टकाटक, उंच, गोऱ्या, सडपातळ, रुबाबदार, ब्रॅंडेड गॉगल्स, बॅग्ज, चपला, फाडफाड इंग्लिश... त्या सगळ्यांमध्ये मला रडूच यायचं आधी! वाटायचं, आपणही असं राहावं, पण उंच टाचांनी चालता यायचं नाही आणि ब्रॅण्डेड खिशाला परवडायचं नाही. माझ्या 25-30 ऑडिशन्स झाल्या, पण काम मिळेना. माझा धीर खचत गेला. त्यातल्या काही जणींशी हळूहळू मैत्री झाली. या ऑडिशन्स कशा देतात ते पाहायला मी त्यांच्याबरोबर आत जाऊ लागले. लक्षात आलं, ‘ॲक्‍टिंगमध्ये या ‘ठो’ आहेत. डोक्‍यात लख्ख प्रकाश पडला. माझं वेगळेपण ही माझी ॲक्‍टिंग आहे. पुण्यात केलेल्या नाटकाच्या सेवेची पुंजी आहे बरोबर, हाच आपला यूएसपी. पायात घातलेल्या उंच टाचा काढल्या, जमिनीवर आले आणि ‘आहे तशी आहे’ या आत्मविश्‍वासानं पुन्हा प्रवास सुरू केला. मला ‘मी’ सापडल्यावर आपोआप सगळं सोपं झालं. बघता-बघता मी मोठ्या-मोठ्या ब्रॅण्डस्‌च्या 80-90 जाहिराती केल्या. 

या सगळ्या प्रवासात मला स्वतःविषयी जे हाती लागलं ते स्मरून मी जेव्हा प्रतिभाच्या तोंडचं ‘ते’ वाक्‍य प्रयोगात म्हणते, तेव्हा दरवेळी आतमध्ये माझ्या दिवे लागल्याचा भास होतो मला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity View with Madhurani Prabhulkar in Maitrin Supplement sakal pune today