मुलांना ‘खरा’ आनंद शोधू द्या

Madhurani-Prabhulkar
Madhurani-Prabhulkar

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री
फेसबुकवर स्क्रोल करता करता नुकतीच मी एक गोष्ट पाहिली, एक राजबिंडा होतकरू तरुण एका सुंदर, तरुण बॅले नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वावर फिदा असतो. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच चित्र बदलते. ती सुंदर तरुणी बॅले प्रॅक्‍टिसला जाणं बंद करते आणि खा खा खाऊ लागते. अर्थातच परिणामी तिचे वजन वाढू लागतं. तिचा डौल संपुष्टात येतो. मग प्रेग्नंसीनंतर ती अजूनच लठ्ठ होऊ लागते. तिचा नवरा तिला वेळोवेळी नृत्य सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देतो; पण ती दुर्लक्ष करते. त्याच्याकडे आणि स्वतःकडेसुद्धा! तिचं वाढलेलं वजन, तिची नृत्याप्रती कमी झालेली आस्था, तिचा ऐतखाऊ स्वभाव त्याला अस्वस्थ करू लागतात आणि ओघानेच त्यांच्यात अधिकाधिक अंतर पडू लागते. तिच्या ज्या गुणांवर त्याने प्रेम केलेलं असतं, त्यातला अंशही आता त्याला सापडेनासा होतो आणि तो निराश होऊन वेगळं व्हायचं ठरवतो. तिला हे समजल्यावर एका अतिशय हळव्याक्षणी ती स्वतःला व्यक्त करते.

ती सांगते की, तिला बॅलेविषयी कधीच एवढं प्रेम नव्हतं. तिच्या आईची इच्छा होती की तिने बॅले डान्सर व्हावं आणि आईचं प्रेम मिळावं, तिची नाराजी नको म्हणून ती बॅले करत राहिली. सततच्या रिहर्सल्‌स, फिगर सांभाळण्यासाठी सतत तोंडावर ठेवलेला ताबा, याला ती कंटाळलेली असते.

ती पुढे म्हणते, ‘तू तरी मला मी जशी आहे तसं स्वीकारशील, प्रेम करशील म्हणून मी माझ्या मनाप्रमाणे वागत राहिले.’ हे ऐकून तो तिला समजून घेतो. तिचं अस्तित्व, तिचा आतला आवाज शोधायला तिला मदत करतो. ती स्वतःवर प्रेम करायला शिकते वगैरे, वगैरे.

या संपूर्ण कथेत मला २-३ गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. ज्यावर आपणही विचार करायला हवाय. आपणही आपल्या मुलांना वाढवताना हीच चूक करत नाहीयेत नं? आपल्या आवडी, स्वप्न मुलांवर लादत नाहियेत नं? मुलं खूप निरागस असतात. आई-वडिलांशिवाय त्यांना विश्‍व नसतं. त्यांना खूष करण्यासाठी, त्यांचं अधिक प्रेम मिळवण्यासाठी ते एखादी गोष्ट करत राहतात. त्या गोष्टीची खरंच त्यांना आवड आहे का, त्यातून त्यांना खरोखर आनंद मिळतोय का, हे आपण सतत तपासून पाहायला हवं.

दुसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा जोडीदार निवडताना त्या व्यक्तीला आपण एका विशिष्ट टप्प्यावर भेटलेलो असतो. त्या वयात ती अमुक-तमुक बनलेली असते, तिचं विशिष्ट शिक्षण झालेलं असतं, तिनं विशिष्ट मार्ग करियरसाठी निवडलेला असतो. त्या व्यक्तीच्या त्या वेळेच्या व्यक्तिमत्त्वावर अंदाज बांधून आपण त्याबरोबर आयुष्य काढायचा विचार करतो. पण मला असं वाटतं, आपण ज्या व्यक्तींशी नातं जोडणार आहोत त्याने किंवा तिने करिअरचा ‘हाच’ पर्याय का निवडलाय याची आणि त्याच्या सर्वच निवडीची सखोल पडताळणी करायला हवी. अनेकांच्या करिअर निवडीत वरकरणी दिसतात, त्यापेक्षा अगदी वेगळी कारणं असतात. ज्याची पाळंमुळं त्यांच्या बालपणात दडलेली असतात. जसं की माझा एक मित्र होता, ज्याने प्रचंड मेहनतीने शिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी मिळवली आणि तिथे स्थायिक झाला. यात ‘वेगळं’ काय असं तुम्हाला वाटेल, पण त्यामागचं कारण वेगळं होतं. त्याच्या आई-वडिलांमधील विसंवाद, भांडणं तो लहानपणापासून पाहत होता. या साऱ्याचा त्याला उबग आला होता म्हणून तो अमेरिकेला पळून गेला.  मी आणि माझा नवरा गेले अनेक वर्ष ॲक्‍टिंग ॲकॅडमी चालवतो. महाराष्ट्रभरातून, सर्व समाजातील, सर्व स्तरातील मुलं आमच्याकडे येतात. त्यातल्या फार कमी जणांचे अभिनय कलेवर प्रेम असतं. बरेच जण येतात ते पटकन प्रसिद्ध व्हायला. लोकांचं कौतुक मिळवायला. जे त्यांना कदाचित त्यांच्या बालपणी त्यांच्या घरात, शाळेत मिळालं नसणार. काही जण ‘इतर मुलं’ करतात म्हणून एखादी शाखा निवडतात, काही जण ‘सेफ’ म्हणून एखादं करिअर निवडतात, काही जणांना ज्या गोष्टीची खरी आवड असते त्यातून अर्थार्जन करण्याची शाश्‍वती आपली व्यवस्था निर्माण करत नाही म्हणून दुसरं काही करत राहावं लागतं. अशी एक ना अनेक कारणं असू शकतात! प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या निवडीमागे एक ‘मूळ’ कारण असतं. त्याच्या खालच्या टोकापर्यंत पोचता आलं तर गोष्टी स्पष्ट दिसतात.

आपला जोडीदार असेल किंवा अगदी मित्र किंवा घरातलं कुणीही. प्रत्येक व्यक्तीचं करिअर हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. ज्यासाठी तो आयुष्यातली उमेदीची वर्ष देणार असतो. त्यातून त्याला-तिला ‘खरा’ आनंद मिळतोय का? नसल्यास तो ज्यातून मिळतोय ते शोधायला लावून ते करण्यास आपण उद्युक्त करायला हवं, असं केल्यास आपल्या आसपासची मूठभर आयुष्य आपण नक्की आनंदी बनवू शकू, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com