काही बोलायचे आहे

काही बोलायचे आहे

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर 

तुमइतना जो मुस्कुरा रहे हो क्‍या गम है जिसको छुपा रहे हो,

माझं अतिशय आवडतं गाणं... कधीही ऐकलं तरी डोळ्यांत टचकन पाणी आणणारं...! हे असे आनंदी चेहऱ्याचे मुखवटे घालून वावरणारे किती असतात आपल्या आसपास...! कदाचित आपणही असतो त्यातलेच! जरा त्यांच्या पाठीवर मायेनं हात फिरवला...त्यांच्या मुखवट्यावर जरासा ओरखडा उमटला तरी भळाभळा वाहील पाणी... आत साचलेलं...दडवलेलं...! का साचलंपण एवढं...? सोपंय...त्याला वाट करून द्यायला जमलंच नाही म्हणून...! मग हा आनंदी मुखवटा खरा वाटू लागला आणि फिट्ट बसला चेहऱ्यावर...उतरता उतरेना...!

कधी-कधी मला वाटतं... माणसं वावरतच नाहीत आपल्या आसपास ज्वालाग्राही पदार्थांनी ठासून भरलेल्या स्फोटकांच्या आकृत्या वावरतात.. किती भीषण आहे हे! यावर बोलायला हवंय...!

खरंतर बोलण्यावरच बोलायला हवंय! निसर्गाने मनुष्याला बुद्धी दिली आणि माणसाने त्याचा वापर करून अनेक शोध लावले त्यातच येते भाषा...! भाषा... संवाद साधण्यासाठी...! व्यक्त होण्यासाठी, ज्ञान ग्रहणासाठी... आनंदासाठी असते भाषा! आज-काल आपली मातृभाषा एक, शिक्षणाची/व्यवहाराची एक आणि मनोरंजनाची एक असा प्रत्येकाला कमीत कमी ३ भाषा तरी येतातच! पण उपयोग काय? आपल्याला इतक्‍या भाषा येऊ? बोलतो कुठे आपण? संवाद कुठे साधतो? आपण तर टाइप करतो... फक्त...! हे असंच सुरू राहिलं तर शेपूट झडली तशी जीभही झडेल माणसाची! कारण एकच... आपण बोलतच नाही....? कुणाला वेळच नाही....

नवरा-बायकोला एकमेकांशी बोलायला वेळ नाही, मुलांशी नाही. आई-वडिलांशी नाही, मित्र-मैत्रिणींशी नाही... आपण बोलतच नाही... आणि जे बोलतो... ते आपल्याला बोलायचंच नसतं...! मग खोटं खोटंच खरं खरं वाटायला लागतं आपल्याला! काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं, प्रत्येकाने ‘I am fine’चा मुखवटा चढवलाय प्रत्येकाने पण आता त्याही पुढे गेलंय सगळं... आता I am awsome/I am rocking चे मुखवटे आलेत बाजारात! ते घालून पोस्ट करून एकमेकांना लाईक करण्यातच सगळे बिझी आहेत! कारण इथे तेच मुखवटे विकले जातात. सॅड यांना कुणी विचारत नाही. काय रे, काय झालं? असं थांबून विचारायला वेळ नसतो या मित्रांकडे...! त्यात आपण कुणाला लाईक नाही केलं तर आपल्याला कोण लाईक करणार म्हणून ‘लाईक-लाईक’ करण्यात खूप वेळ जातो...! त्यात समोर बसलेल्या हाडामासाच्या व्यक्तींचा हात हातात घेऊन काय होतंय? हे विचारायचं राहूनच जातं हो? आज-काल पहा आपण नजर चुकवतो जवळच्या माणसांची, अगदी आपलीसुद्धा... भीती वाटते आपल्याला स्वतःशी बोलण्याचीसुद्धा... धडपडत असतो. सतत एकच काळजी... आत काय चाललंय ते कुणाला कळलं तर... पटकन राग आला... टचकन्‌ रडू आलं तर! छे-छे हे चालत नाही इथे इथे समोरच्याला चांगलं वाटेल असंच वागत आणि बोलत राहावं लागतं इथे समजून घ्यायला... सांत्वन करायला वेळ कुणाकडे आहे? सतत सतत ही धडपड मुखवटा पकडून ठेवण्याची... या अंतर्विरोधातून जन्माला आलेत हे शब्द anxiety, stress, depression...! काय दिलंय आपल्याला शहरीकरणांनी... काय मिळालंय या तंत्रज्ञानानी... खेळणी झाली नाहीयेत नं आपली? प्रगती झालीच... पण त्या खाली चिरडलं जातंय का माणसाचं रसरसतं माणूसपण? जिवंतपण?

हे कुठेतरी थांबायला हवं... माणसांनी माणसाला मुखवटे फेकून उराउरी भेटायला हवं इतकंच वाटते बस्स!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com