ऑडिशन न देता मिळाला चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी व्ह्यू - मृणाल ठाकूर, अभिनेत्री
चित्रपटांबाबतची आवड मला लहानपणापासूनच होती. मी माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. सह्याद्री वाहिनीवर आधी चार वाजता मराठी चित्रपट लागायचे, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे या सर्वांना पाहायचे. असे खूप मोठे कलाकार आहेत, ज्यांना बघून मला वाटू लागले, आपणही या क्षेत्रात काही तरी करायला हवे. त्यामुळे शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातही मी आवर्जून भाग घ्यायचे.

कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर मालिकांमध्ये काम करू लागले. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेनंतर ‘विटी दांडू’ हा चित्रपट केला. मराठी चित्रपटांमध्ये काम करीत असतानाच ‘लव सोनिया’ हिंदी चित्रपट केला. 

‘बाटला हाऊस’ या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. नंदिता यादव असे तिचे नाव आहे. पत्रकार म्हटले की, धावपळ आणि धकाधकीचे काम असते. रात्रंदिवस एखाद्या स्टोरीवर काम करावे लागते. नंदिता अशाच एका स्टोरीवर काम करत असते आणि ते करत असताना तिला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. कोणते प्रसंग तिच्यावर ओढवतात हे दाखविले आहे. 

खरे तर बॉलिवूडमध्ये मी पदार्पण केले आणि मला हृतिक रोशन व जॉन अब्राहम अशा मोठ्या स्टार्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा त्यांना भेटले तेव्हा खूप दडपण आले होते. दोन्ही अभिनेत्यांची जातकुळी वेगळी. एक डान्सिंगमध्ये ग्रेट तर एक ॲक्‍शनमध्ये. परंतु ‘सुपर ३०’ या चित्रपटात हृतिकबरोबर मला डान्स करता आला नाही, तर बाटला हाउसमध्ये जॉनबरोबर ॲक्‍शन करता आली नाही. कारण दोन्ही चित्रपटांतील कथेचा प्लॉट वेगळा होता आणि दोन्ही चित्रपटांमध्ये काम करताना मला तेवढाच आनंद झाला. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता  
आले. आपण जेव्हा एखादी भूमिका स्वीकारतो तेव्हा ती भूमिका आपल्याला जगता आली पाहिजे. आपण त्या भूमिकेचा विचार करून त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे. आपण आपली ओळख विसरून सातत्याने त्या भूमिकेचा विचार केला पाहिजे आणि त्याकरिता मेहनत घेतली पाहिजे, अशा अनेक बाबी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. भविष्यात मला असा चित्रपट ऑफर व्हावा की, ज्यामध्ये हृतिक व जॉन बरोबर असेल आणि हृतिकबरोबर डान्स व जॉनबरोबर ॲक्‍शन करायला मला मिळेल. 

दिग्दर्शक निखिल अडवानी यांचा ‘डीडे’ चित्रपट मी पाहिला. मला तो प्रचंड आवडला. कारण त्या चित्रपटाचा जॉनरच वेगळा होता आणि अशा जॉनरला निखिल अडवानीच योग्य न्याय देऊ शकतात असे मला वाटले. त्यांना आणि मिलाफ झवेरी यांना मी ‘सत्यमेव जयते’साठी भेटलेले होते. त्यांनी माझी ऑडिशन घेतली होती; परंतु तेव्हा मी ‘सुपर ३०’ या चित्रपटात बिझी होते. त्यामुळे पुढील प्रोजेक्‍टस्‌ला नक्कीच विचार करू असे त्यांनी मला सांगितले आणि ती वेळ लगेचच एका वर्षात आली. 

‘बाटला हाऊस’च्या कथेवर काम करीत असतानाच त्यांच्या डोक्‍यात माझे नाव आले. त्यांनी मला फोन केला आणि अमूक-अमूक भूमिका आहे व तुला ती करायची आहे, असे सांगितले. मी त्यांना म्हटले, सर मला ऑडिशन्स द्यायला यावे लागेल का? तर ते म्हणाले, तुझी ऑडिशन्स अगोदरच (सत्यमेव जयते) घेतलेली आहे. माझी ऑडिशन्स न घेता मिळालेला हा पहिलाच चित्रपट. कारण आत्तापर्यंत बहुतेक वेळा मी ऑडिशन्स दिल्या आहेत आणि त्यानंतरच माझी निवड झाली आहे. माझ्यासाठी हा चित्रपट स्पेशल आहे आणि त्याला आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे मी नुकतीच उपराष्ट्रपती व्येंकय्या नायडू यांना ‘बाटला हाऊस’च्या ट्रेलरनिमित्त भेटले. तेव्हा त्यांनी माझे देशभक्तिपर चित्रपट करीत असल्याबद्दल खूप कौतुक केले. 

प्रत्येक माणसाची मत मांडण्याची पद्धत वेगळी असते. आपल्याकडे अशा बऱ्याच घटना आहेत, बरेच विषय आहेत; ज्यामुळे अशा घटनांवर चित्रपट काढून तो मुद्दा लोकांपर्यंत पोचवता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity View Mrunal Thakur maitrin supplement sakal pune today