esakal | गंध फुलांचा गेला सांगून
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi-Pore

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

गंध फुलांचा गेला सांगून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
आपण नेहमी म्हणतो आयुष्यात असलेला आत्ताचा क्षण जगायचा. ना मागचा विचार करायचा ना भविष्याचा... पण खरं सांगू, नाही करता येत असं! मी तसं जगण्याचा विचार करते. पण, वास्तवात आठवणींमध्ये रमते. तो मला पुढे जगण्याचा आधार वाटतो. लहानपणी आपल्याला पटकन मोठं व्हायचं असतं. घरात बाळ-बाळ म्हणून आपले लाड सुरू असतानाच पाठचे भावंड आले, की आपण ताई होतो. मग तू मोठी आहेस ना? मग समजून घे, हे अनवधानाने आलेच. मग तरुण होतो, लग्न होते, आई होतो. मग मुलं मोठी होऊन आपल्या भविष्याकडे उडू बघतात. 

प्रत्येक अवस्थेत आपण मागच्या आठवणींनी सुखावतो आणि पुढे जगायला प्रेरित होतो. बालपण, शाळकरी मैत्रीण, तारुण्यातील आपल्या पार्टनरसोबतच्या सोनेरी आठवणी, मग मुलांचं मोठं होणं, सगळं आठवूनच आपण पुढच्या आयुष्याच्या पायऱ्या चढत असतो. माझ्या दोन्ही मुली त्यांचं करिअर करायला अमेरिकेत गेल्या. खूप आनंद झाला, की त्या आयुष्यात प्रगती करीत आहेत. नव-नवीन शिकत आहेत. पण, का माहीत नाही, माझ्यासाठी माझी आणि माझ्या आठवणींची दुनिया एका स्टेजवर जरा थांबलीय आणि झोके घेतेय. कधी मी त्यांच्यासोबत पुढे जाते, कधी परत मागे रमते. मी माझ्या झोपण्याच्या बरोबर समोरच्या भिंतीवर माझ्या मुलीचे त्यांच्या जन्मापासून तर कोर्टात जाताना माझ्या मागे लागायच्या, रडायच्या, खेळण्यासाठी हट्ट करायच्या तोपर्यंतचे त्यांचे लहानपणाचे फोटो लावून ठेवलेत. माझी दुनिया तिकडे जरा थांबलीय. सकाळी उठून त्या फोटोंना बघते, रमते. त्यांच्या बाबांसोबत जुन्या आठवणी उकरून काढते आणि मग परत वास्तविक क्षणांमध्ये येऊन कामाला लागते. का होत असावं असं? एखाद्या आईचं? 

एकदा माझी एक मैत्रीण मला म्हणाली, ‘तुला माहीत आहे? आपल्या मुलांचे आपल्याशिवाय काहीच अडत नाही.’ ही गोष्ट कुठंतरी अभिमानास्पद वाटत असली तरी थोडी दुखावतेसुद्धा! म्हणून आपण आपल्या पदराला धरून आई-आई करणारी मुलं आठवत राहतो. त्यांना पावडर-टिकली करून झोपवणारी, घास भरवणारी, अंगाई गाऊन झोपवणारी आपल्यातली आई पटकन वास्तवात स्वीकारू शकत नाही. जरा वेळ लागतो या प्रक्रियेला. त्यांनी मोठं होऊन उंच भरारी घ्यावी. यासाठी देवाकडे सतत साकडं घालणारी आई, प्रत्यक्षात मूल उडतं तेव्हा जरा दुखी होते. ते सहाजिकच आहे. 
तर मी बोलत होते, आठवणींमध्ये रमण्याबद्दल. 

परवा शिकागोमध्ये असणारी माझी मुलगी तिच्या पाकिस्तानी मित्राच्या लग्नाला गेली होती. मित्र त्याच्या आईबाबांना, सगळ्यांची ओळख करून देत होता. कुणी सिंगापूर, कुणी चायना, कुणी युरोप, कॅनडा वरून होते. ‘श्रेया फ्रॉम इंडिया’ ओळख झाली, तेव्हा सगळ्यांचे डोळे आनंदानं आपलेपणानं चमकले. सगळे एकमेकांना ‘अरे सुनो’ बोलू लागले. ‘ये लडकी इंडियासे है’. फाळणीच्या वेळेला त्यांचे अर्धे नातेवाईक भारतात राहिले आणि ते पाकिस्तानात गेलेले. जणू काही कुणीतरी बिछडलेले भेटल्यासारखे ती सगळी माणसं तिला प्रेमानं खाऊ-पिऊ घालू लागली.

त्याची आजी श्रेयाला बाजूला नेऊन डोळ्यांत पाणी आणून सांगत होती, ‘हम अमेरिका में मिल सकते है, लेकीन अपने मुलुक सें आपके मुलुक में नही आँ सकते. कभी इंडिया जाओगी तो मेरे लिए वो केसरी डंडीवाला फुल लेकर आना. उसकी खुशबू में मेरा बचपन है. सारा वही छुट गयाँ.’ ती प्राजक्ताच्या फुलाबद्दल बोलत होती. त्याच्या आजीच्या अंगणात प्राजक्ताचं झाड होतं आणि सुवासात तिचं बालपण अजूनही बागडत होतं. तर काय, आठवणींवरच माणूस एक सुंदर जीवन पुढेपुढे जगत असतो. सगळं विसरून जाऊन पुढे जगणं शक्यच नाही.

loading image