चाकण झेपावणार विकासाकडे

हरिदास कड
मंगळवार, 22 जानेवारी 2019

चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण व परिसराचा गेल्या पंचवीस वर्षांपासून विकास होत आहे. हा विकास होत असताना या शहर व परिसरासाठी पायाभूत सुविधा असणे महत्त्वाचे आहे. शहराच्या विकासात भर टाकणारा हिंजवडी ते चाकण मेट्रो प्रकल्प भविष्यात उभा राहणार आहे. हा प्रकल्प उभा राहत असताना पुणे-नाशिक रेल्वे चारही प्रकल्प सुरू होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे मेट्रो, रेल्वे प्रकल्प यामुळे दळणवळणाच्या सुविधांत भर पडणार असल्याने चाकण व परिसर विकासाच्या बाबतीत पुढील काळात झेप घेणार आहे. 

चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण व परिसराचा गेल्या पंचवीस वर्षांपासून विकास होत आहे. हा विकास होत असताना या शहर व परिसरासाठी पायाभूत सुविधा असणे महत्त्वाचे आहे. शहराच्या विकासात भर टाकणारा हिंजवडी ते चाकण मेट्रो प्रकल्प भविष्यात उभा राहणार आहे. हा प्रकल्प उभा राहत असताना पुणे-नाशिक रेल्वे चारही प्रकल्प सुरू होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे मेट्रो, रेल्वे प्रकल्प यामुळे दळणवळणाच्या सुविधांत भर पडणार असल्याने चाकण व परिसर विकासाच्या बाबतीत पुढील काळात झेप घेणार आहे. 

चाकण व परिसर हा पुणे, पिंपरी-चिंचवड शहराला जवळचा आहे. तसेच औद्योगिक वसाहतीपासून पुणे-मुंबई महामार्ग जवळ आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कंपन्या उभारण्यासाठी उद्योजकांची पहिली पसंती असते. चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे 10 हजार एकरवर औद्योगिक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. पुढील काळात पाचव्या टप्प्यासाठी सुमारे दोन हजार एकरवर जमिनींचे संपादन होणार आहे. पाचवा टप्पा हा आयटी हब होणार आहे. त्यामुळे सुमारे 50 हजारांवर नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. पाचव्या टप्प्यासाठी जमीन संपादनाच्या फाइलवर संबंधित विभागाच्या अधिकारी, मंत्र्यांनी नुकतीच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे संपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या संपादनापायी सुमारे 500 कोटींहून अधिक रकमेचे वाटप शेतकरी व जमीन गुंतवणूकदारांना होणार आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालही मोठी होणार आहे. 

चाकण औद्योगिक वसाहत ही देशात महत्त्वाची मानली जाते. या वसाहतीत बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये ह्युंदाई, जीई, मर्सिडीज बेंझ, फोक्‍सवॅगन, फिलिप्स, ब्रीजस्टोन, सॅनी इंडिया, कॉर्निंग इंडिया, बजाज ऑटो, भारत फोर्ज, महिंद्रा, मिंडा, बॉस, सिग्मा, लुमॅक्‍स, बडवे ऑटो व इतर मोठ्या, छोट्या अशा सुमारे एक हजारावर कंपन्या आहेत. या कंपन्यांतून सुमारे दोन लाखांवर कंपनी अधिकारी, कर्मचारी, कामगार काम करतात. यामध्ये परराज्यातील कामगारांचा मोठा भरणा आहे. तसेच देश, विदेशातील तंत्रज्ञही या कंपन्यांतून काम करतात. काही कंपन्यांतून उत्पादित मालाची निर्यातही केली जाते. चाकण औद्योगिक वसाहत देशात तसेच परदेशात एक ऑटो मोबाइल्स हब म्हणून ओळखले जाते. औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक भागातील दुकानदारी तसेच इतर छोटे, मोठे व्यवसाय वाढले आहेत. स्थानिकांच्या भाड्याच्या खोल्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे; तसेच प्लॉटिंग व्यवसायालाही तेजी आहे. चाकण व परिसरात दहा हजारावर भाड्याच्या खोल्या आहेत. भाड्याच्या खोल्या वाढत असताना गृह प्रकल्पांची संख्या ही वाढली आहे. कंपन्यांना पाणी मोठ्या प्रमाणात लागते. औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपुरवठा योजना राबविली असली, तरी काही कंपन्या खासगी व्यक्तींकडून टॅंकरद्वारे पाणी विकत घेतात. त्यामुळे त्याही व्यवसायाला या भागात मागणी आहे.

हिंजवडी -चाकण मेट्रो प्रस्तावित
हिंजवडी-पिंपरी-चिंचवड-चाकण अशी मेट्रो पुढील काही वर्षांत उभी राहणार आहे. या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचा प्राथमिक सर्वे पीएमआरडीएने केला आहे. या कामासाठी अजून एजन्सी ठरलेली नाही. या प्रकल्पाची गरज आहे का हे लक्षात घेऊन हिंजवडी-चाकण मेट्रो प्रकल्प पुढील काळात उभा राहणार आहे, अशी माहिती पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) चे आयुक्त किरण गित्ते यांनी "सकाळ'ला दिली. 

चाकण औद्योगिक वसाहतीची वैशिष्ट्ये....
.अमेरिकेतील प्रतिडेट्रायट म्हणून चाकण औद्योगिक वसाहतीची ओळख
.सुमारे दोन लाखांवर लोकांना प्रत्यक्षात रोजगार 
.स्थानिक तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरीतील ठेकेदारांना कामाची संधी
.स्थानिकांना रोजगार कमी; पण राज्यातील तसेच परराज्यातील तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी
.कार, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती
.ऑटो मोबाइल्स हब म्हणून देशात, परदेशात परिचित
.ऑटो मोबाइल्स कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची उभारणी
.वाहतूक व्यवसायाला चालना. यामध्ये बस, कंटेनर, ट्रेलर वाहतुकीला मोठी चालना त्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्ट चालकांच्या व्यवसायाला गती, छोट्या मालवाहतुकीलाही चालना त्यातून स्थानिकांना रोजगार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan is becoming the development hub in Maharashtra