

Iranian Shaheed 136 drone impact on global warfare economics
esakal
हर्ष काबरा
इराणच्या अत्यंत स्वस्त ‘शाहेद’ ड्रोननी इस्राईल-अमेरिकेच्या महागड्या क्षेपणास्त्रांची आणि सुरक्षा यंत्रणांची दमछाक करत युद्धाचे गणित बदलले आहे. इराणचे हे वीस ते पन्नास हजार डॉलर किमतीचे ड्रोन अमेरिकेच्या ४० लाख डॉलर किमतीच्या क्षेपणास्त्रांना आव्हान देत आहेत. भविष्यातील लढाई तंत्रज्ञानाइतकीच अर्थशास्त्रावरही अवलंबून असेल, याचेच हे संकेत आहेत.
अमेरिका आणि इस्राईलने इराणवर हल्ले चढवले तेव्हा आखाती प्रदेश केवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनीच नव्हे, तर हजारो घोंघावणाऱ्या इराणी ड्रोननीदेखील वेढला गेला. हा संघर्ष सुरू झाल्यापासून एकट्या संयुक्त अरब अमिरातीवर सुमारे १ हजार ५०० ड्रोन आढळले आहेत. त्यापैकी ७०हून अधिक लक्ष्यांवर आदळल्यामुळे बंदरे, विमानतळ, हॉटेल आणि डेटा सेंटरचे नुकसान झाले. ड्रोन हल्ल्यामुळे बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या ताफ्याच्या तळावरील एक रडार घुमट नष्ट झाला, तर सौदी अरेबियातील सर्वांत मोठी रास तनुरा रिफायनरीला आग लागली. कुवेत आणि अन्य देशांमध्ये ड्रोनने हवाई सुरक्षा यंत्रणा भेदल्यामुळे किंवा अडवलेल्या ड्रोनचे अवशेष खाली पडल्यामुळे प्राणहानीही झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालणारे हे शस्त्र नेमके कोणते, तर इराणचे ‘शाहेद-१३६’ ड्रोन. लष्करी ताकदीसोबतच आणखी एका ठळक वैशिष्ट्यामुळे हे ड्रोन सध्या चर्चेत आहे. केवळ २०,००० ते ५०,००० डॉलर किमतीचे हे ड्रोन एखाद्या लक्झरी कारपेक्षाही स्वस्त आहेत! हेच शस्त्र आज तब्बल २०० पट अधिक महागड्या, सुमारे ४० लाख डॉलर किंमतीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना आव्हान देताना दिसत आहे. हे एक तथ्य आधुनिक युद्धाच्या नव्या स्वरूपाबद्दल बरेच काही सांगून जाते.