स्टॉप दॅट... स्टॉप दॅट... स्टॉऽऽप दॅट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship

आज मी तुम्हाला नात्यांमधल्या धोक्‍याच्या इशाऱ्यांबद्दल म्हणजेच ‘रेड फ्लॅग्ज्’बद्दल सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही नात्यांत या ‘रेड फ्लॅग्ज्’कडे कधीही दुर्लक्ष करू नका.

स्टॉप दॅट... स्टॉप दॅट... स्टॉऽऽप दॅट!

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आज मी तुम्हाला नात्यांमधल्या धोक्‍याच्या इशाऱ्यांबद्दल म्हणजेच ‘रेड फ्लॅग्ज्’बद्दल सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही नात्यांत या ‘रेड फ्लॅग्ज्’कडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुम्ही एखाद्या ‘रिलेशनशिप’मध्ये असता आणि तुम्हाला जेव्हा ‘काही गोष्टी ठीक नाहीत,’ असं वाटतं, काही गोष्टी खटकतात, तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये ‘रेड फ्लॅग्ज्’ असं म्हणतात. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी ठीक सुरू नसल्याचा तो पुरावा असतो. एखाद्या व्यक्तीशी तुमचं नातं सुरळीत सुरू नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तर, तुमच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्या बाबतीत तुम्हाला असं वाटत असेल तर ते ‘रेड फ्लॅग्ज्’ असतात. मुलं-मुली दोघांच्याही बाबतीत हे लागू होतं.

एखाद्या ‘रिलेशनशिप’मध्ये तुम्हाला काही गोष्टी खटकत असल्या तरी तुम्ही म्हणत असाल की, ‘माझाच गैरसमज आहे. यात खटकण्याजोगं काहीच नाहीये...मीच ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ द्यायला पाहिजे किंवा दुसरी संधी द्यायला पाहिजे,’ तर ते चुकीचं आहे. तुमचा आतला आवाज तुम्हाला ‘ही गोष्ट बरोबर नाही...ही गोष्ट बरोबर नाही’ असं सांगत असतो, तेव्हा ती गोष्ट बरोबर नसतेच; पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा त्याचा अर्थ ते नातं संपलं असा मात्र नसतो.

हा अतिरेकी पवित्रा ठरेल. म्हणजे, मी तिला फोन केला होता तेव्हा ती माझ्याशी नीट बोलली नाही म्हणून लगेच तुकडा पाडायचा, संपलं नातं...ओव्हर, असं नसतं. मात्र, जर तुमच्या लक्षात आलं की, तुमची गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड तुमच्याशी फोनवर ‘रूड’पणे बोलत आहे; आणि, हा प्रकार जर महिना-दोन महिने सुरूच राहिला तर हा नक्कीच ‘रेड फ्लॅग’ आहे... मोठा ‘रेड फ्लॅग’! लवकरच काहीतरी मोठं अरिष्ट येणार असल्याची ही खूण असते...आणि ते अरिष्ट येईलही.

जर तुम्हाला असं वाटत असेल की, ‘मीच जास्त मनाला लावून घेतोय... माझंच काहीतरी...ती बिझी असेल...’, ‘नाही नाही, आज तिचा मूड चांगला नव्हता, तिला तिचे वडील रागवले म्हणून...’ अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीच्या वागण्याचं समर्थन करत असाल तरी ते ‘रेड फ्लॅग्ज्’च असतात.

समजा, तुमची गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड दुसऱ्या व्यक्तीशी ‘फ्लर्ट’ करतोय, भरपूर ‘चॅटिंग’ करतोय, त्यांचे हास्यविनोद सुरू आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘अरे...ते चर्चा करताहेत, ते टीव्ही सीरियलबद्दल बोलताहेत, ते ‘मीम्स’ शेअर करताहेत, म्हणून ती इतकं हसतीय...’ तुम्ही काहीही म्हणा (आणि, एखाद्या वेळी तुमचं बरोबरही असेल); पण समजा तुमची गर्लफ्रेंड रोज रात्री दुसऱ्या कुणाशी तरी तासभर ‘चॅटिंग’ करतेय; कारण, तो ‘कित्ती फनी’आहे, तो बेस्ट ‘मीम्स’ शेअर करतोय आणि त्यावर ती हसतेय व तीही त्याला तशीच ‘मीम्स’ शेअर करतेय...तर यात गैर काय आहे? मी अगदी ‘लिबरल’ आहे, खुल्या मनाचा आहे, मला या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही, असं तुमचं म्हणणं आहे. हेच बॉयफ्रेंडच्या बाबतीतही लागू होतं. समजा, तो इतर मुलींच्या बाबतीत अशा प्रकारे वागत असेल आणि तुम्हाला ‘त्यात काय...आहेच तो हसरा...फ्रेंडली’ असं वाटत असेल तर ठीक आहे. काही हरकत नाही...मग काही प्रश्‍नच नाही.

मात्र, जर हे तुम्हाला खटकत असेल तर, ही गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर, तो ‘रेड फ्लॅग’ आहे आणि पुढं काहीतरी घडणार असल्याचं ते दुश्र्चिन्ह आहे. तुम्हा या ‘रेड फ्लॅग्ज्’कडे दुर्लक्ष करू नका.

एखादा ‘रेड फ्लॅग’ हा आपला गैरसमज असू शकतो. आपली चूक असू शकते.

‘ती काही ‘रूड’पणे वागली नव्हती, माझाच गैरसमज झाला,’असं होऊ शकतं.

‘ती त्या मुलाशी ‘फ्रेंडली’ वागत होती, रात्री त्याच्याशी ‘चॅट’ करत होती; कारण, तो खूप ‘फनी’ आहे...’, ‘ती माझ्याशी आपणहून कधीच बोलत नाही, संभाषण मीच सुरू करतो...तिचा स्वभावच तसा आहे...’

तुम्ही जर त्या व्यक्तीच्या प्रत्येक वागण्याचं अशा प्रकारे समर्थन करत असाल तर तुम्ही मोठ्या अरिष्टाच्या दिशेनं जात आहात हे नक्की.

तुम्हाला जर असे अनेक ‘रेड फ्लॅग्ज्’ दिसत असतील तर त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला असे तीन ‘रेड फ्लॅग्ज्’ जाणवले तर तुम्ही संबंधित व्यक्तीशी स्पष्ट बोलावं हे बरं. तुमचं नातं कोणत्या दिशेला जात आहे, तुम्ही या नात्यात खूश आहात की नाही याबद्दल बोला. जर तुम्ही या नात्यात खूश नसाल तर त्याची अखेरही होऊ शकते. ठीक आहे. एखादं नातं संपलं म्हणजे जग संपलं असं होत नाही. रोज जगात इतके ‘ब्रेकअप्’ होत असतात. लोक ‘नये प्यार की शुरुआत’ म्हणतात, तेव्हा ते पहिलंवहिलं प्रेम थोडंच असतं? जेव्हा आधीचं काहीतरी उसवेल, तुटेल, तेव्हाच नवे बंध गुंफले जातील ना!

तुमच्यासमोर जर असे बरेच ‘रेड फ्लॅग्ज्’ येत असतील तर त्यांचं समर्थन करत राहू नका.

‘अरे यार, ती त्याच्याबरोबर बाईकवरून गेली आहे, दोन तास झाले. ते दोघं रोज असे जातात. तिला आवडतं असं फिरायला. तो घेऊन जातो तिला. तिचा मित्रच आहे तो...त्यात काय विशेष!’

मित्रांनो, अशा वेळी काय घडतं ते तुम्हाला माहीत आहे.

तुमची गर्लफ्रेंड रोज अशी एखाद्या मुलाबरोबर फिरायला जाते...तुम्हाला काय वाटतं, तो काय कुठल्या खासगी वाहतूकसेवेमधील टॅक्सीचा ड्रायव्हर आहे, जो दोन महिन्यांपासून रोज संध्याकाळी तिला फिरायला नेतोय?

आत्ता ते फिरायला जात आहेत...मग एक दिवस ते पाणीपुरी खातील...दुसऱ्या दिवशी आइस्क्रीम...मग एक दिवस तो तिला म्हणेल, ‘तू किती छान दिसतीयेस!’ मग एक दिवस तो म्हणेल, ‘चल, सिनेमाला जाऊ या...’ त्यानंतर एक दिवस म्हणेल, ‘चल, शहराबाहेर मस्त फिरायला जाऊ या...’

या साऱ्यात तुम्ही सीमारेषा कुठं आखणार आहात?

ही तिची इच्छा आहे, तिचं आयुष्य आहे. तुम्ही तिचे ‘कीपर’ नाही, प्राचार्य नाही किंवा पालकही नाही. तिनं काय करावं, काय करू नये हे तुम्ही कोण सांगणार? पण तुम्ही ‘रेड फ्लॅग’च्या बाबतीत मात्र काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही तिच्याशी याबद्दल बोला.

तुम्ही ‘रेड फ्लॅग’ लक्षात घ्या, किंवा मग गप्प बसा - ‘मी आहे चमनलाल. मी माझ्या गर्लफ्रेंडला असं कुणाबरोबरही जाऊ देतो. माझी त्याला काहीही हरकत नाही...आय ॲम ओके विथ धिस.’

मी हे गमतीनं सांगत नाहीये, अजिबात नाही. तुम्ही काहीतरी पाऊल उचला किंवा मग गप्प बसा; पण ‘नाही, नाही, असं काही नाहीये,’ असं मात्र अजिबात म्हणू नका.

‘ते दोघं संध्याकाळी बाईकवरून हवा खायला जातात...त्या दिवशी त्यांना परत यायला उशीर झाला; कारण, त्याची बाईक वाटेत पंक्‍चर झाली असेल,’ अशा प्रकारे तुम्ही अजिबात समर्थनं करू नका. हे ‘लो सेल्फ-एस्टिम’चं, ‘लो सेल्फ-रिस्पेक्‍ट’चं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करत नाही, स्वतःचा मान ठेवत नाही; तुमचा आतला आवाज, तुमचं ‘गट-फीलिंग’ तुम्हाला सांगतंय की, हे काही बरोबर चाललेलं नाहीये, अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीशी त्याबद्दल बोललं पाहिजे; पण तुम्ही ते करत नाहीये; कारण, तुम्हाला मनोमन भीती वाटतेय की, मी जर बोललो आणि ते खरं निघालं तर...? हा जो सॅंडी तिला बाईकवरून फिरवतोय? आणि तिनंच जर सांगितलं की ‘हो, मला सॅंडी आवडतो, तुझ्यापेक्षा जास्त आवडतो...तू कट ले’ तर काय करायचं?

जर तुमच्या मनात या गोष्टींची भीती असेल तर हे ‘लो सेल्फ-एस्टीम’चं, लो सेल्फ-रिस्पेक्‍ट’चं लक्षण आहे. आपल्याला पुन्हा कुणी मुलगी/मुलगा मिळणार नाही या कल्पनेनं तुम्ही घाबरला आहात असं म्हणायला हवं; पण ही काही जगण्याची रीत नव्हे. तुम्हाला आयुष्यात चांगला जोडीदार मिळाला पाहिजे...यू डिझर्व्ह. तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारं कुणीतरी मिळायलाच हवं.

काही वेळा एखादं नातं नाही तडीला जात. अशा वेळी तुमचा जोडीदार दुष्ट, चेटकीण, भयानक, खवीस आहे असंही मी म्हणणार नाही. काही वेळा तुम्ही एकमेकांना ‘कम्पॅटिबल’ नसता. कधी कधी तुम्ही सुरुवातीला एकमेकांना अनुरूप वाटता; पण नंतर ते चित्र तसं राहत नाही.

आपण हे ‘रेड फ्लॅग्ज्’ कसे ओळखायचे?

तर त्याची लक्षणं म्हणजे - वागण्यातील बदल, उद्दामपणा, बेपर्वाई, फोन केला तर त्याला ‘कॉल बॅक’ न करणं, इतर लोकांबरोबर खूप भटकणं, इतर लोकांबरोबर (विशेषतः विरुद्धलिंगी) जास्त प्रमाणात प्रोग्रॅम्स ठरवणं, काय काय बेत आखणं, तेसुद्धा तुम्ही असताना...हे सगळे ‘रेड फ्लॅग्ज्’ असतात. तुम्हाला त्याबाबत काहीतरी करावंच लागतं, किंवा मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं.

पण जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहता तेव्हा काय होतं? आपण सगळेजण ते करत असतो; पण त्यामुळे काय होतं, एक दिवस या बॉम्बचा स्फोट होतो; आणि, जेव्हा हा स्फोट होतो तेव्हा तुमचं काळीज विदीर्ण होतं... तुम्हाला रडू कोसळतं.

तुमच्याबाबतीत हा बॉम्ब कधी फुटू नये असं मला वाटतं. जर तुमच्या स्वयंपाकघरात कुणाच्या हातून गॅसचं बटण सुरू राहिलं असेल आणि गॅसचा वास येत असेल किंवा धूर पसरला असेल तर तुम्हाला तिथं जाणं - कितीही धोकादायक वाटत असलं तरी - भागच आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात आणणं आवश्यकच आहे. अशा वेळी, ‘नाही नाही, काहीही नाहीये, इथं कसलाही वास येत नाहीये,’ किंवा ‘हा वास शेजारच्या घरातून येतोय, आमच्या घरातला वास नाहीये हा...’ असं तुम्ही म्हणून चालणार नाही.

जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या स्वयंपाकघरात स्फोट होणार हे नक्की! नात्यांतसुद्धा असंच असतं. फक्त नात्यांतच नव्हे, तर आयुष्यात कुठल्याही बाबतीत असंच असतं. नोकरी-व्यवसायातसुद्धा असंच असतं. तुमचा बॉस तुम्हाला नीट वागवत नसेल, तुमचे सहकारी तुमच्याशी नीट वागत नसतील, तर तिथंही अशा ‘रेड फ्लॅग्ज्’कडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला चांगलं आयुष्य, चांगला जोडीदार मिळायलाच हवा...यू डिझर्व्ह दॅट!

आणि सर्वात महत्त्वाचं, कीप इम्प्रूव्हिंग युअरसेल्फ!

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Web Title: Chetan Bhagat Writes Red Plugs Relationship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..