मोबाईलमग्न बालकविश्‍व (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 14 एप्रिल 2019

मोबाईलचा हा वापर आता इतका वाढलाय, की त्याला व्यसनाचं स्वरूप आलंय. जेव्हा केव्हा मेंदूमध्ये डोपामिन नावाच्या रसायनाचा स्राव होतो, तेव्हा एक सुखसंवेदना शरीर-मनभर पसरते. हे होतं काही घटनांमुळं किंवा काही ड्रग्जमुळं, वस्तूंमुळं किंवा काही व्यक्तींमुळं.

लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक, शारीरिक दुष्परिणाम काय आहेत, पालकांनी नक्की काय करायला पाहिजे, कोणत्या सवयी स्वतःला आणि मुलांनाही लावायला पाहिजेत या सगळ्याचा वेध.

रात्र झालीय. दिवसभर काम करून तो थकलाय. नाही म्हटलं, तरी सगळ्या कारभाराचा प्रमुख असल्यामुळे त्याच्यावर खूप जबाबदारी असते. श्वास घ्यायलासुद्धा फुरसत नसते. बरं, रात्र झाली म्हणून आराम करावा तर तेही शक्‍य नाही. उलट आता तर त्याला कितीतरी जास्त कामं करायची असतात. दिवसभराचा आढावा घ्यायचा असतो, जमा-खर्चाचा हिशोब करायचा असतो. दुरुस्ती-देखभालीची कामं उरकायची असतात. दिवसभरात जमा झालेल्या माहितीची प्रतवारी करायची असते आणि नवीन सामानासाठी जागा करायची असते. यासाठी त्याला हवा असतो थोडा निवांत वेळ; पण हे काय? रात्रीच्या शांत अंधाराऐवजी इथं तर आहे प्रकाशाचा चकचकाट! वेगानं हलणारी चित्रं! विविध आवाज कानावर आदळतायत. डोळे टक्क उघडे आहेत आणि कानात प्राण एकवटलाय. रोजचंच झालंय हे आताशा. म्हणजे समोरची कामं तशीच अर्धवट राहणार. उद्याचं चित्र त्याला लख्ख दिसतंय. अपुरी झोप, थकलेलं शरीर आणि गोंधळलेलं मन...

...हा आहे आधुनिक मानवी मेंदू. या नव्या जगातल्या बदलांच्या झंझावाती वेगानं तो भंजाळलाय. तंत्रज्ञानाच्या माऱ्यानं तो सतत ताणलेल्या रबरासारखा असतो. सतत थकलेला असतो. दिवस-रात्रीचं त्याचं काटेकोर कामाचं वेळापत्रक कोलमडून गेलंय. मुळात त्याला बिचाऱ्याला सवय अशी, की कुठलीही गोष्ट हळूहळू, निगुतीनं, पिढ्यानपिढ्या खूप सराव करून मगच आत्मसात करायची. एकएक भावना, एक एक सवय मुरवून घ्यायला त्याला लागतात शेकडो-हजारो वर्षं! एक-दोन शतकांपूर्वीपर्यंत हे सहज शक्‍य व्हायचं; पण आता मात्र असा निवांतपणा मिळणं अशक्‍य झालंय. घडणारे बदलच इतके वेगवान आहेत! कुठलाही नवा फोन, नवीन वाहन किंवा यंत्र बघता बघता जुनाट होतंय, मोडीत निघतंय. कशी सवय व्हायची याची? आणि कधी? कुणीही गोंधळणारच अशा वेळी. आणि या साऱ्या बदलांचा मुकुटमणी आहे- "तंत्रज्ञान!'
तंत्रज्ञानाचा हा बासरीवाला आपल्या मुलांना भुलवतो आहे. त्यांना नादावून दूरदूर घेऊन जातो आहे. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी दिसतं, की जरा मोकळा वेळ मिळाला की हातातल्या मोबाईलनं ताबा घेतलाच म्हणून समजा! दवाखान्यात रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी हमखास उपाय म्हणून मोबाईलवरची हलती चित्रं दाखवली जातात. बाळाला अंगावर दूध पाजवता पाजवता सर्फिंग करणाऱ्या आयाही दिसतात. क्‍लिनिकमध्ये येणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या बहुतांश पालकांची हीच तक्रार असते. विद्यार्थीदशेतल्या या लवचिक वयात एकदा लागलेली सवय मोठे झाल्यावरही त्यांचा पिच्छा सोडत नाही. खरंतर आता वेळ असते कार्यक्षमता दाखवायची, उत्पादनक्षम होण्याची, सामाजिक बंध निर्माण करण्याची, नवनवीन नाती जोडण्याची; पण त्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक-सामाजिक-भावनिक कौशल्यांच्या बाबतीत पंगू होतात मुलं यामुळे.

सुरवातीला भलमोठा डेस्कटॉप कॉम्प्युटर असायचा. तो सुरू व्हायलाच खूप वेळ लागायचा. इंटरनेटवर जायचं म्हणजे तर फारच वेळखाऊ प्रकार असायचा. कॉम्प्युटरचा आकार हळूहळू कमी व्हायला लागला. इंटरनेट वेगवान व्हायला लागलं. त्याच्या वापरातला सहजपणा जसा वाढला, तसा त्याचा वापरही वाढला. त्यानंतर आले मोबाईल फोन्स. ते जोपर्यंत फक्त कॉल करण्यासाठी होते तोपर्यंत फारसं काही जाणवलं नाही; पण स्मार्टफोन्सनी मात्र क्रांती केली. इंटरनेट, वायफाय आणि नेटपॅक सहजी उपलब्ध व्हायला लागले. आता मनात आलं, की बाटलीतला हा राक्षस "जी हुजूर' म्हणून हात जोडून उभा राहतो.

अनेक उपयोगांमुळंच भुरळ
तसं बघायला गेलं, तर किती सोयी आहेत त्या एवढ्याशा पेटीत! आता आपल्याला घड्याळ लागत नाही, कॅलक्‍युलेटर लागत नाही, की कॅलेंडर. कामाची लिस्ट लिहायला डायरी लागत नाही, ई-मेल बघायला कॉम्प्युटर लागत नाही. फोटो काढायचा असेल, तर कॅमेरा हजरच असतो. कुठलीही माहिती, कुठलंही गाणं बोटाच्या एका इशाऱ्यासरशी क्षणात समोर येतं. शिवाय त्याचा आकार खिशात मावणारा सोयीचा....नेमक्‍या याच सुविधांनी मुलांच्या वापरावर देखरेख ठेवणं मात्र जवळजवळ अशक्‍य केलंय. त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये जातायेता डोकावून पाहता येत नाही. आपण काय पाहतोय हे पटापटा लपवण्यात मुलं बघत बघता तरबेज होतात. वयाला न पेलणाऱ्या कितीतरी लैंगिक आणि हिंसक गोष्टी मुलं सहज पाहू शकतात. मागच्याच आठवड्यात एक आई मुलीला घेऊन आली होती. ""माझ्या फोनवर ती फक्त कार्टून्स बघते, माझं लक्ष असतं न तिच्याकडं,'' असं आईनं आत्मविश्वासानं मला सांगितलं. नंतर जेव्हा मी मुलीशी बोलले, तेव्हा तिनं इंटरनेटवर मिळवलेली बरीच माहिती मला सांगितली- जी ऐकून आईला कदाचित धक्का बसला असता. इतक्‍या जागरुक असलेल्या आईलासुद्धा नाही पूर्णपणे लक्ष ठेवता आलं वापरावर.

व्यसनाचं स्वरूप
मोबाईलचा हा वापर आता इतका वाढलाय, की त्याला व्यसनाचं स्वरूप आलंय. जेव्हा केव्हा मेंदूमध्ये डोपामिन नावाच्या रसायनाचा स्राव होतो, तेव्हा एक सुखसंवेदना शरीर-मनभर पसरते. हे होतं काही घटनांमुळं किंवा काही ड्रग्जमुळं, वस्तूंमुळं किंवा काही व्यक्तींमुळं. अर्थातच असे अनुभव हवेहवेसे वाटतात. त्यामुळं ते पुनःपुन्हा मिळवण्याच्या मागं लागतो आपण. त्यासाठी आपल्या वर्तणुकीत बदल करतो. वर्तणुकीतले हे बदल काही वेळा असहाय वाटावं इतके तीव्र बनतात आणि मग लागतं व्यसन! हे आता घडतंय मोबाईल, गेम्स आणि इंटरनेटच्या बाबतीत. हा वापर अवलंबित्वाकडं, व्यसनाच्या दिशेनं झुकायला लागलाय हे ओळखण्यासाठी काही इशारे आहेत.
- हा वापर अधिकाधिक करत जाणं
- तो कमी करण्याचे उपाय व्यर्थ ठरणं
- ताणतणावावर, चिंतेवर उतारा म्हणून त्याकडं वळणं
- त्या वापरामुळं एखादं जवळचं नातं, शिक्षण किंवा इतर गोष्टींना धोका पोचणं
- वेळ-काळाचं भान जाणं
- इतर काही करत असताना त्याचाच विचार करत राहणं
- कितीही वापरला तरी कमीच वाटणं
- फोन वाजलेला नसताना सारखा तसा भास होणे
- कोणत्याही कारणानं वापर अशक्‍य झाला तर चिडचिड, तणाव, नैराश्‍य अशा भावना होणं
अतिवापराच्या घातक परिणामांविषयी सतत बोललं जातंय. त्यातल्या महत्त्वाच्या दुष्परिणामांची थोडक्‍यात उजळणी अशी ः
डोळेदुखी, मानदुखी सारखे आजार, एकटेपणा, दारू-सिगरेटसारख्या व्यसनांची वाढती शक्‍यता, रस्त्यावरचे अपघात, कुपोषण, लठ्ठपणा, सामाजिक कौशल्यांचा अभाव, जुगार-ऑनलाईन खरेदीचं व्यसन, पोर्नोग्राफी, सायबर गुन्हे, निद्रानाश, नैराश्‍य, तुटलेली नाती, शैक्षणिक आणि व्यावसायिक अधोगती
या व्यसनापायी आपल्या शब्दसंग्रहात काही नवीन शब्दांची भर पडणं अपरिहार्य झालंय ः
- नो मोबाईल फोबिया (NoMophobia) अर्थात मोबाईलपासून दूर जाण्याची सतत वाटणारी भीती
- फिअर ऑफ मिसिंग आउट (FOMO) ः आपण नेहमी संपर्कात राहिलो नाही, तर मित्रमैत्रिणींच्या वर्तुळातून बाहेर फेकले जाऊ अशी भीती
- सेक्‍स्टिंग (Sexting) लैंगिक शब्द किंवा प्रतिमा वापरून पाठवलेले मेसेज
- सायबरसेक्‍स, सायबरबुलिंग, सायबरक्राइम ः इंटरनेट वापरून केलेले लैंगिक व इतर गुन्हे
- फुबिंग (Phubbing) इतरांबरोबर असताना फोनमध्ये डोकं खुपसून बसणं
याव्यतिरिक्त मेसेज पाठवण्याची एक संक्षिप्त सांकेतिक भाषा आणि चित्रलिपी तयार झालीय ती वेगळीच.

जादुभऱ्या खजिन्याची सवय
आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की खरंतर ही सवय मोबाईलची नसते, ती असते त्यात असलेल्या जादुभऱ्या खजिन्याची; त्यातून मिळणाऱ्या माहिती, करमणूक आणि सामाजिक संबंधांची. अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय, की हे असं खुळावून जाणं हा काही सर्वस्वी वापरणाऱ्याचा दोष नाही. कॉम्प्युटर गेम्स, सोशल मीडिया तयार करताना मानवी मानसिकतेचा अतिशय खोलवर अभ्यास करून त्याचा पुरेरूर वापर केला गेलाय. आकर्षक जाहिराती, पुनःपुन्हा पॉप होणाऱ्या सूचना, इतरांनी काय लिहिलंय किंवा कोणते नवीन फोटो टाकलेत याविषयी माहितीचा भडीमार, गेम्समधून मिळणारे गुण अशा गोष्टी वापरून मुलांच्या मनातल्या असुरक्षिततेला खतपाणी घातलं जातं. एखाद्याला याकडं पुनःपुन्हा ओढलं जातं. जितका जास्त वेळ आपण घालवू, तितकी आपल्या कौशल्यामध्ये भर पडते आणि ती चांगली गोष्ट आहे असं मुलांच्या मनावर ठसवण्यात त्या यशस्वी होतात. शिवाय नवीन तंत्रज्ञानाची मुख्य खासियत म्हणजे ते वापरायला अत्यंत सोपं असतं आणि म्हणून अधिक हवंहवंसं वाटतं.

आभासी नात्यांचा मोह
माणूस समाजप्रिय प्राणी आहे. आपल्याला सामाजिक मान्यता मिळावी, इतरांना आपण आवडावं, लोकप्रिय असावं ही सहजभावना असते. उत्क्रांती होत असताना वंशसातत्यासाठी ती आवश्‍यक असते. किशोरवयीन मुलींमध्ये ही भावना अधिक प्रमाणात दिसून येते. ही गरज पुरवली जाते इंटरनेटवर होणाऱ्या आभासी नात्यांमधून. ही नाती अतिशय आकर्षक वाटतात. सुरक्षितही वाटतात. ती इतकी मोहमयी असतात, की काहीही विचार न करता, सवयीनं मुली फोन चेक करत राहतात; पण हे आभासी मित्र-मैत्रिणी खूप अपुरे असतात मानसिक किंवा भावनिक आधार द्यायला. कारण त्यासाठी लागणारी देहबोली इथं गायब असते. प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या सहवासानं किंवा खांद्यावर ठेवलेल्या हातानं जे समाधान मिळतं त्याचा पत्ताच नसतो. शिवाय फोमोला, हेव्या-दाव्यांना, न्यूनगंडांना ही नाती जन्म देतात हे सिद्ध झालंय.

अर्थात या सगळ्यावर प्रतिबंध आणि उपाय, दोन्ही करण्याची तातडी आहे. मुळात आधीच्या पिढीनं हे मोबाईल-बाळपण अनुभवलेलं नाही आणि आताच्या पिढीला त्याच्याशिवायचं जगणं माहिती नाही. कुठलाही नवीन खेळ शिकताना आपण आधी शिकतो त्या खेळाचे नियम. अनोळखी प्रदेशात जाताना नकाशा बघतो, "गुगल गुरूं'च्या साह्यानं तिथली माहिती घेतो, काय धोके आहेत याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणं तयारी करतो. तशीच तंत्रज्ञानाच्या प्रदेशात भटकण्याआधी काही तयारी करायला हवी, नियम समजून घ्यायला हवेत. त्यातले काही मुद्दे इथं पाहूया. यापलीकडं जाऊनही अनेक उपाय सुचू शकतील.

- मुलांना या मोहमयी दुनियेची तोंडओळख आपणच करून देतो. ती ओळख करून देण्याचं वय आपण काही प्रमाणात पुढं ढकलू शकतो का? मुलांच्या शाळेचा निर्णय जसा आजकाल तान्हेपणी घेतला जातो तसे आणि तेव्हा, "स्क्रीन कधी सुरू करणार', "मोबाईल कधी देणार' हे निर्णय पालकांना घ्यायला लागणार आहेत. स्वत:ला विचारायला लागेल ः "ठामपणे "नाही' म्हणण्याचा कणखरपणा, मुलांच्या दबावाला बळी न पडण्याची क्षमता आणि वाईटपणा घ्यायची तयारी या गोष्टी आहेत का माझ्याकडं?'
- त्यानंतर येतो मोकळा, निवांत वेळ. या वेळाचा कंटाळा येऊ न देता त्याचा सदुपयोग करण्याची मुलांना सवय लावता येईल का? निवांत काही न करता बसलं, की कितीतरी भारी कल्पना सुचतात, कितीतरी क्षमतांचा विकास होतो. एका पत्रकाराच्या मुलाखतीत वाचलं होतं, की मोबाईलच्या व्यसनातून बाहेर आल्यावर तो जेव्हा स्वत:बरोबर वेळ घालवायला लागला, तेव्हा त्याच्या कल्पनाशक्तीत वाढ झालेली त्याला जाणवली. मुलांचा मोकळा वेळ भरून काढण्यासाठी आपण त्यांना पुरेसे पर्यायही द्यायला हवेत. उदाहरणार्थ, खेळायला मोकळी मैदानं, करमणुकीचे इतर पर्याय, मुक्त खेळ, कामं, ट्रेकिंग, छंद...
कुठलंही गॅजेट हाती देण्याआधी ते वापरताना घ्यायची काळजी, त्याचे दुष्परिणाम, त्याचा सदुपयोग, वेळेवर नियंत्रण याविषयी मुलांना शिक्षित आणि जबाबदार करणं.
- काही कौटुंबिक नियम बनवणं आवश्‍यक आहे. कुटुंबात अशा काही जागा आणि अशा काही वेळा जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्या पाहिजेत- जिथं मोबाईलला प्रवेश नाही. उदाहरणार्थ, रात्रीची झोपण्याआधीची वेळ, जेवणाचं टेबल, बाथरूम, फिरायला गेलो असताना, सगळे एकत्र गप्पा मारत असताना. काही जण आठवड्यातला एखादा दिवस "मोबाईल-उपवास'ही करतात.
- काही अतिशय सोपे वाटणारे; पण उपयुक्त उपाय आहेत. आपल्याला स्क्रीन दिसणार नाही अशा प्रकारे मोबाईल उलटा ठेवणं, सतत वाजणारी नोटिफिकेशन्स बंद करणं, लागेल तेव्हाच इंटरनेट चालू करणं. साधी सकाळी उठण्याची गोष्ट घेऊ. गजर लावलेला असतो मोबाईलवर. उठल्या उठल्या सगळ्यात पाहिलं दर्शन होतं ते फोनचंच. आणि मग घेतलाच आहे फोन हातात तर मेसेजेस, मेल असं सगळं बघण्याची इच्छा होते. त्यापेक्षा गजराचं घड्याळ वापरलं तर?
- कुठल्याकुठल्या गोष्टी याकडं वळायला उद्युक्त करतात याचा आढावा घेणं. उदाहरणार्थ, कंटाळा, निराशा, एकटेपणा, ताणतणाव. ताणतणावाला तोंड देण्यासाठी लागणारी कौशल्य विकसित करायला हवीत.
- बऱ्याचदा समोरासमोर गप्पा मारण्याचं किंवा ओळख करून घेण्याचं धाडस नसतं म्हणून सोशल नेट्‌वर्किंग साइट्‌सचा आधार घेतला जातो. ही सामाजिक कौशल्यं आत्मसात केली, तर यावर मात करता येते. त्यासाठी स्वत:ला संधी दिली पाहिजे; वेगवेगळे क्‍लब्स, क्‍लासेस, खेळ यात सहभागी होऊन किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी स्वयंसेवक बनून.
- नवनवीन गॅजेटस, गेम्स, ऍप्स तयार करताना उत्पादकांनी फक्त नफा-तोट्याचा विचार न करता मुलांवरच्या त्यांच्या परिणामांचंही भान ठेवायला हवं.

एवढं करूनही ही सवय लागते, तेव्हा काय? एक गोष्ट नक्की, की यावर एका डोसमध्ये आजार पळवून लावणारं रामबाण औषध नाही, की कुठलीही जादूची कांडी नाही. अनेक आघाड्यांवर प्रयत्न करत राहायला लागतं. वापराच्या प्रमाणाविषयी जागरुक होणं, ही पहिली पायरी असते. रोज किती वेळा, किती वेळ आणि कायकाय बघतो याची यादी साक्षात्कारी असते. कारण हा वापर इतका बेभान करणारा असतो, की अनेकांना आपण इतका वेळ यावर घालवतो याची कल्पनाच नसते. यासाठी काट्यानं काटा काढायचा मार्ग आहे. अशी कितीतरी ऍप्स आहेत, जी या वापरावर देखरेख करू शकतात, त्याविषयी पूर्वसूचना देऊ शकतात, नकोशा साइट्‌स ब्लॉक करू शकतात. आत्ताच आपण प्रतिबंधासाठी पाहिलेल्या अनेक गोष्टी ही सवय कमी करण्यासाठीसुद्धा वापरता येतात. आणि हे उपाय प्रत्यक्षात येण्यासाठी घरातलं निरोगी वातावरण आणि पालक-मुलांमधला संवाद खूप उपयोगाचे ठरतात.

व्यावसायिक मदतही हवी
या सगळ्या प्रयत्नांना हे अवलंबित्व पुरून उरलं, तर मात्र व्यावसायिक मदत घ्यायला कचरू नये. तुमचे फॅमिली डॉक्‍टर, बालरोगतज्ज्ञ, पौगंडावस्थातज्ज्ञ यांच्याशी बोलायला हरकत नाही. आपल्या लक्षात न आलेले कितीतरी सहज-सोपे पर्याय ते सुचवू शकतात. गरज वाटल्यास ते मानसतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घ्यायला सांगतील. वेगवेगळ्या प्रकारच्या मानसोपचार पद्धती यासाठी वापरल्या जातात. काहीवेळा गट-उपचारांचा उपयोग होतो. काही ठिकाणी, विशेषत: पाश्‍चिमात्य देशात यासाठी व्यसनमुक्तीकेंद्रं आहेत- जिथं तीव्र स्वरूपाच्या केसेसवर हॉस्पिटलमध्ये राहून निवासी उपचार केले जातात. यावर कुठलं विशिष्ट औषध असं नाही; पण बरोबरीनं येणाऱ्या नैराश्‍यासारख्या काही त्रासांसाठी औषधोपचार केले जातात. एकूणात ही प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते. त्यासाठी चिकाटीनं प्रयत्न करत राहायला लागतं.

दोष कुणा एकावर टाकून देऊन प्रश्न सुटणार नाहीत; ना मुलांवर, ना पालकांवर, ना तंत्रज्ञानावर. माध्यम-मग्नतेचे दुष्परिणाम काही त्या मुलापुरते किंवा त्या कुटुंबापुरते सीमित राहणार नाहीयेत. संपूर्ण समाज त्यानं ढवळून निघणार आहे. त्यामुळं ही आपण सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. मोबाईल-इंटरनेट या गोष्टी पूर्णपणे वजा करणं शक्‍य नाही आधुनिक आयुष्यातून. त्यामुळं त्याचा भानावर राहून, प्रमाणात आणि जबाबदार वापर करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं. शेवटी मोबाईल फोन काय किंवा इंटरनेट काय, माणसानं तयार केलेल्या गोष्टी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं माणसाचा प्रवास सुरू झालेला असला, तरी अजून तरी या तंत्रज्ञानाचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child mobile addiction article writen by dr vaishali deshmukh in saptarang