मातेच्या गर्भातच होतात बालकांवर संस्कार

garbh-sanskar
garbh-sanskar

महाभारतात अभिमन्यूची गोष्ट फार प्रसिद्ध आहे. सुभद्रेच्या पोटात असताना त्याने अर्जुनाला चक्रव्यूह भेदण्याची युक्ती सांगताना ऐकले होते. युद्धाच्या तेराव्या दिवशी जेव्हा कौरव सेना द्रोणाचार्यांच्या कौशल्यतेखाली चक्रव्यूहाची रचना केली तेव्हा अभिमन्यू आईच्या पोटात असताना शिकलेल्या विद्येच्या आधारे चक्रव्यूहाचे भेदन करतो आणि कौरव सेनेचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास करतो. परंतु, त्याची विद्या अपूर्ण असते. असं म्हणतात की, अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची कला सांगायच्या आधीच तिला झोप लागते व गोष्ट अर्ध्यावरच सुटते. अभिमन्यूच्या या अपूर्ण विद्येचा फायदा घेत कौरव मिळून त्याचा अत्यंत क्रूरतापूर्वक मृत्यू घडवून आणतात. मात्र, गर्भात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग अभिमन्यूला सोळा वर्षांने युद्धभूमीवर होतो.
हिरण्यकश्‍यप असुरांचा राजा. अमर होण्यासाठी त्याने दीर्घकाळ तपस्या केली. त्याकाळात त्याच्या राज्यावर आक्रमण करून देवराज इंद्र त्याची पत्नी कयाधुला बंदी बनवून घेऊन जात असताना त्यांना महर्षी नारद भेटतात व ते कयाधुला आपल्या आश्रमात घेऊन येतात. तेव्हा ती गर्भिणी असते व तिच्या पोटात प्रल्हाद असतो. नारदमुनी आपल्या आश्रमात तिला भगवद्भक्तीचा उपदेश देतात, जे प्रल्हाद पोटात असतानाच शिकतो. जन्माला आल्यावर ही भगवद्भक्ती कायम राहते व त्यात शिक्षणामुळे आणखी भर पडते. त्याच्या भक्तिभावामुळे भगवंत नृसिंहावतार घेऊन हिरण्यकश्‍यपचा वध करण्यास बाध्य होतात.
याच संदर्भात अष्टावक्राची गोष्ट पण प्रसिद्ध आहे. अष्टावक्र आई सुजाता हिच्या पोटात असताना वडील ऋषी कहोड यांना आपल्या शिष्यांना शिकवताना ऐकत असतो. एके दिवशी ऋषी कहोड यांचं उच्चारण चुकतं म्हणून अष्टावक्र आपल्या वडिलांना टोकतो. यावर ऋषी कहोड रागावून त्याला शाप देतात की तो शरीरावर आठ जागी व्यंग घेऊन जन्माला येईल. म्हणून त्याचे नाव "अष्टावक्र' असे प्रचलित झाले. आईच्या गर्भात असताना त्याला मिळालेल्या शिकवणीमुळे तो जन्मापासूनच ब्रह्मविद्येचा ज्ञानी होतो.
या सगळ्या पुराणातल्या गोष्टी आहेत. यांना सत्य किंवा असत्य असं प्रमाणित करणं कठीण आहे. अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंदांचे उदाहरण घेता येईल. त्यांची आई, माता भुवनेश्वरी ते पोटात असताना ध्यान धारणा करायची. त्यामुळे स्वामी विवेकानंदांना लहानपणापासून ध्यानविद्या ज्ञात होती. जिजाबाई गरोदर असताना मुघलांच्या अत्याचारांमुळे प्रजा त्रस्त होती. त्यावेळी त्यांच्या मनात राष्ट्रसंरक्षणासाठी सत्पुरुषाचा जन्म आपल्या पोटी व्हावा अशी इच्छा निर्माण झाली. जिजामाता यांच्या या दिव्य व क्रांतिकारक विचारांमधूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली.
चरक संहितेत गर्भाच्या उत्पत्तीवर श्‍लोक आहे
शुक्रासृगात्माशयकालसम्पद्यस्योपचाराश्‍च हितैस्थार्थ: ।
गर्भश्‍च काले च सुखी सुखन्च संजायते सम्परिपूर्णदेहः ×
शुद्ध शुक्र व शुद्ध रक्त, आत्मा, जरायू व काल हे सगळे उत्तम असल्यावर, हितकारक पदार्थांच्या सेवनाने व हितकारक भाव असल्याने वेळेनुसार सम्पूर्ण झालेला सुखी गर्भ सुखपूर्वक उत्पन्न होतो.
गर्भारपणाच्या सहाव्या आठवड्यातच मेंदू व मज्जातंतू निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याच्या साहाय्याने विकसित होत असलेल्या बाळाची गर्भाशयात हालचाल सुरू होते. हृदयाची स्पंदने सुरू होतात. मेंदू व मज्जातंतूची वाढ प्रचंड गतीने होत असते. म्हणूनच या वाढीवर चांगल्या किंवा वाईट घटकांचा परिणाम लगेच होतो. मग ते घटक बाह्य असोत वा आंतरिक. यामुळे गर्भवती स्त्रीने काय खायचे व काय नाही खायचे याचे पथ्य व प्रमाण ठरवून दिले आहे. गर्भातल्या बाळाचे शारीरिक पोषण आईच्या आहारावर तर मानसिक पोषण आईच्या विचारांवर होत असते. आयुर्वेदात दिलेल्या वरील श्‍लोकामध्ये उल्लेख केलेल्यानुसार "हितकारक भाव' हेही तेवढेच महत्त्वाचे, जेवढे शारीरिक पोषण. गर्भातला शिशू चैतन्य जीव असतो. त्याच्यामध्ये ग्रहण करण्याची क्षमता असते. म्हणून त्याला संस्कार देता येतात. संस्कार हे सर्वप्रथम विचारांतूनच केले जातात. कृती विचारांच्या मागून येते. कृती शुद्ध असली पण त्यामागचा विचार अशुद्ध असेल तर त्या कृतीला काय महत्त्व? हे संस्कार बाळाच्या जन्माअगोदरच परिणाम दाखवायला सुरुवात करतात. भावी आईवडिलांच्या मनात जसे विचार असतील तसेच संस्कार बाळावर दिसून येतात. विवेकानंदांनी आपल्या मातेस प्रश्न विचारला, "जन्माअगोदर मी कुठे होतो?' मातेचं उत्तर होतं, "जन्माआधी तू माझ्या विचारात होतास.' महानतेचा पाया भक्‍कम होण्याची सुरुवात इथूनच होते. गरोदरपणाच्या काळात मातेचे विचार सदैव सकारात्मक व बाळाच्या भविष्याबद्दल शुभ असावेत. माझं बाळ बुद्धिमान, तेजस्वी, शक्तिमान, भाग्यशाली, सर्वांवर प्रेम करणारं व मनमिळाऊ होणार हा विचार सतत केल्यास सर्वगुणसंपन्न बाळ जन्माला येऊ शकतं. "सुप्रजा चयन' ही संकल्पना राबवणे कठीण नाही.
गर्भातालं बाळ आईचे बोलणे ऐकतं. आईचा आवाज त्याचा ओळखीचा होतो. तान्हं बाळ रडताना आईचा आवाज ऐकून शांत होतं ते यामुळेच. तर आई बाळाबरोबर सकारात्मक संवाद साधू शकते. फक्त आईचाच नाही तर त्याचाशी जो कुणी सतत संवाद साधत असेल, त्याचा आवाजपण बाळ ओळखायला लागतं. गर्भात असताना नियमित ऐकलेली गाणी किंवा स्तोत्र जन्मानंतर पण बाळ ओळखतं. विलक्षण गोष्ट अशी आहे की आपल्या शास्त्रीय संगीताचाही बाळावर परिणाम होतो. प्रत्येक महिन्यात गायले जाणारे राग वेगवेगळे आहेत. यासंदर्भात आपल्या देशात बरीच संशोधने पण केल्या गेली आहेत. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनतर्फे केलेल्या संशोधनात गर्भातल्या शिशूची ग्राह्य क्षमता फार लवकर विकसित झालेली असते. क्रूगर व गार्व्हेन या दोन शास्त्रज्ञांनी आईच्या आवाजात गाणी ऐकताना शिशूच्या हृदय स्पंदनांच्या गतीचे निरीक्षण केले. या प्रयोगाद्वारे त्यांच्या लक्षात आलं की, गर्भातलं बाळ फक्त ऐकतच नाही, तर लक्षात ठेवण्याची क्षमता पण त्यामध्ये असते.
शिशू आईच्या आहारातून स्वत:चा आहार मिळवतं अपरा(वार) वा नाळ या माध्यमाने. तर आईचे विचार ही तसेच त्याच्यपर्यंत पोहोचत असतात. असा हा अलौकिक संवाद आहे. आई सुखात तर शिशू सुखात. परंतु, आईला सुखात ठेवणे ही नक्कीच परिजनांची जबाबदारी आहे. समाजाचे एक घटक म्हणून ही बाब जर आपण सर्वांनीच अमलात आणली, तर पुढची पिढी ही "सुप्रजा' होणार, यात काही शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com