अत्र तत्र सर्वत्र... प्लास्टिक!

लहान मुलांची खेळणी, पाण्याच्या बाटल्या, डबे, कारचा डॅशबोर्ड... अशा रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचा समावेश आहे.
Plastic
Plasticsakal

- जुही चावला-मेहता

लहान मुलांची खेळणी, पाण्याच्या बाटल्या, डबे, कारचा डॅशबोर्ड... अशा रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचा समावेश आहे. पर्यावरण प्लास्टिकच्या विळख्यात गुरफटले जात आहे आणि आपण काय करतो... तर बंदी असतानाही दुकानातून सामान भरभरून प्लास्टिक पिशव्या घरी आणतोय... हे कुठेतरी थांबले पाहिजे.

गेल्या काही लेखांमध्ये आपण प्लास्टिक प्रदूषणाची सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे त्याने आपल्या आयुष्यात शिरकाव केला आहे आणि त्याचा आपल्यावर, प्राण्यांवर आणि सभोवतालच्या परिसरावर काय परिणाम होतो, याबद्दल आपण बोलत आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ई-मेलद्वारे माझ्याशी संवाद साधला आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार..!

तुम्ही सगळे प्लास्टिक प्रदूषणाबाबत इतके जागरूक असल्याचे पाहून मला खरेच खूप आनंद झाला आहे. खारीचा वाटा का होईना, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करत आहात, हे कौतुकास्पद आहे. मला आलेले काही ई-मेल्स मी लवकरच सगळ्यांशीच शेअर करणार आहे.

प्लास्टिक आणि त्यापासून बनणाऱ्या पिशव्यांच्या प्रदूषणाविषयी आपण खूप ऐकले आहे... बघत आलो आहोत; पण त्याचा परिणाम काहीच होत नाहीये. प्लास्टिक प्रदूषणाविषयी मी जेव्हा माहिती शोधत होते, तेव्हा पिशव्यांविषयी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल वाचनात आला... ‘जर आपण प्लास्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घातली नाही किंवा उत्पादकांना त्या सर्व पुन्हा गोळा करणे बंधनकारक करणारी यंत्रणा तयार केली नाही, तर पुढच्या पिढीसाठी आपण अणुबॉम्बपेक्षाही काही तरी गंभीर देत आहोत’ असे त्यात म्हटले होते. ते वाचून डोके सुन्न झाले. दोन मिनिटे समजलेच नाही की नक्की काय करावं? आपण काय करतो आहोत?

प्लास्टिक कचऱ्याची समस्या अतिशय गंभीर आहे आणि त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. उपाय म्हणजे काय करता येईल? प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर होऊ शकतो का? त्याबाबत संशोधन केल्यावर मला समजले, की एकूण फक्त तीन ते चार टक्के कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. मग अशा प्रकारे दररोज पसरत चाललेल्या प्लास्टिकच्या भस्मासुराचा निकाल कसा लागणार? तो असाच पसरत राहून पर्यावरण प्रदूषित  करत राहणार का?

थोडा विचार करा, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक आहे. लहान मुलांची रंगीबेरंगी खेळणी, पाण्याच्या बाटल्या, डबे, कारचा डॅशबोर्ड इत्यादी रोज वापरल्या जाणाऱ्या कित्येक वस्तूंमध्ये प्लास्टिकचा समावेश आहे. आपल्याला माहितीच आहे, की प्लास्टिकची निर्मिती होताना त्यात अनेक विषारी रसायनांचा वापर केला जातो.

जेव्हा आपण ते जाळतो तेव्हा त्यातून डायऑक्सिन्स, फ्युरन्स इत्यादींसारखी अनेक विषारी रसायने हवेत मिसळतात. ऊन, वारा आणि पावसाच्या संपर्कात आल्यावर प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे होतात. त्याला आपण मायक्रो प्लास्टिक म्हणतो. लँडफिलमध्ये पडलेले प्लास्टिक ऊन-पावसाच्या संपर्कात आल्यावर त्यातून निघणारी विषारी रसायने जमीन आणि भूजल साठा प्रदूषित करतात. समुद्रकिनारी फेकला जाणारा प्लास्टिक कचरा सागरी प्राण्यांसाठी धोका निर्माण करतो.

आपल्या मुंबई शहरातील सर्वात जुने डम्पिंग ग्राऊंड  म्हणजे देवनार... ते भारतातील सर्वात मोठे डम्पिंग ग्राऊंड आहे, असे म्हटले जाते. १३२ हेक्टरपेक्षा जास्त जागेवर ते पसरलेले असून आणि दररोज त्या ठिकाणी  ५,५०० मेट्रिक टन कचरा, ६०० मेट्रिक टन गाळ आणि २५ टन जैव-वैद्यकीय कचरा फेकण्यात येतो.

देवनारखेरीज कांजूरमार्गमध्येही डम्पिंग ग्राऊंड आहे. त्यातून निघणाऱ्या कचऱ्यामध्ये विविध प्रकारच्या प्लास्टिकचाही समावेश असतो. वर्षानुवर्षे प्लास्टिकचा कचरा तसाच पाडून राहिल्यामुळे तो कुजतो आणि त्यामुळे जमीन प्रदूषण होते. जर विचार करा, अशा कचऱ्यातून निघणारे विषारी द्रव्य कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या घरात आणि शरीरात प्रवेश करत आहेत... त्यावर आपण काय उपाय करणार आहोत?

इंटरनेटवर सर्च करून माहिती घेतली, तर आजच्या घडीला प्लास्टिक प्रदूषण आपल्या जेवणात आणि पिण्याच्या पाण्यात येऊन पोहचले असल्याचे धक्कादायक वास्तव तुमच्या लक्षात येईल. आपल्याला आणि आपल्या मुलांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

पर्यावरण अशा प्लास्टिकच्या विळख्यात गुरफटले जात आहे आणि त्यावर आपण काय करतो आहोत? सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे, तरीही आपण दुकानातून वा भाजी-फळवाल्याकडून प्लास्टिक पिशवीतून सामान घरी आणतोच आहोत. आता हे कुठेतरी थांबवले पाहिजे... तुम्हाला काय वाटते?

juhichawlaoffice@gmail.com

(शब्दांकन : नीलिमा बसाळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com