ग ऽ ग रे ग म प म (चिन्मय कोल्हटकर)

चिन्मय कोल्हटकर gunisamarth@gmail.com
रविवार, 2 डिसेंबर 2018

पुन्हा तीच संध्याकाळ...तोच यमन...तीच गत. "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ'!
जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा वाटलं, की किती साधी आहे ही गत! आज वाजवताना मात्र कळतं की संगीताचं सगळं सार या एकाच "गती'त सामावलेलं आहे!

पुन्हा तीच संध्याकाळ...तोच यमन...तीच गत. "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ'!
जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा वाटलं, की किती साधी आहे ही गत! आज वाजवताना मात्र कळतं की संगीताचं सगळं सार या एकाच "गती'त सामावलेलं आहे!

संध्याकाळची "यमन' रागाची वेळ. मी पेटी काढतो. तंबोरा जुळवतो. तबला-मशिनवर नेहमीच्या लयीत तीन ताल सुरू होतो. धड मध्यही नाही, धड द्रुतही नाही. अशा त्या लयीत पेटीवर माझी बोटं फिरू लागतात आणि सुरू होते अरविंददादांनी शिकवलेली पहिली गत ः "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ.' मन अलगद भूतकाळात जातं.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा नावाच्या छोट्या खेड्यात ज्याचं लहानपण गेलं तो मी. कॉलेजपर्यंत शिक्षणाची सोय असणाऱ्या या गावात संगीतशिक्षणाची मात्र वानवा. वडील गणिताचे शिक्षक. पेटीही वाजवायचे.

वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला शिकवलेलं "स्वरज्ञान' म्हणजे कोणतंही गाणं ऐकलं की ते पेटीवर कसं वाजवायचं याचं शिक्षणं. मला शास्त्रीय संगीत शिकवायची त्यांची प्रबळ इच्छा. मी आठवीत असताना शाळेला सुटी असतानाच्या कालावधीत मला ते या इच्छेपोटी कोल्हापूरला घेऊन आले. तिथं राजप्रसाद धर्माधिकारी यांच्याकडं घेतलेले तबल्याचे आणि पेटीचे प्राथमिक धडे...तिथंच तालयोगी सुरेश तळवलकर यांची झालेली ओळख व त्यांचं मिळालेलं मार्गदर्शन...बीई इलेक्‍ट्रॉनिक्‍सची पदवी घेतल्यानंतर माझं पुण्यात येणं...नोकरीचा शोध आणि गुरूचाही...

ते साधारण 2001 हे वर्ष असेल. मालिनीताई राजूरकर यांची पुण्यातली मैफल. साथीला साक्षात्‌ डॉ. अरविंद थत्ते. त्या विलक्षण मैफलीतच माझा निर्णय झाली, की पेटी शिकायची तर अरविंददादांकडंच.
माझी आणि त्यांची पहिली भेट...स्वतःचं कार्ड माझ्या हाती ठेवत "फोन करून घरी ये. मग बोलू,' असं त्यांनी मला सांगणं...नंतरच्या सहा महिन्यांत चार वेळा भेट आणि चर्चा. (चर्चा म्हणजे, ते बोलत व मी ऐके). त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्स! (शिकवण्यासाठीच्या. तो एक वेगळाच चॅप्टर आहे!). आणि ऑगस्ट 2002 मधला शिकवणीचा पहिला दिवस. मी "मोदी झेरॉक्‍स'मधलं काम घाईघाईनं आटोपून दादांच्या घरी आलेला. ते पहिली ओळ मला शिकवू लागले...(आणि डोक्‍यात प्रकाश पडला, कळलं, की मला अजून काहीच येत नाहीये पेटीतलं! खरंतर या दिवसापासून मी अनेक ठिकाणी साथसंगत, तसंच सोलो पेटीवादनही केलं होतं. "ऑल इंडिया रेडिओ'चा मान्यताप्राप्त कलाकारही होतो). पण उशिरा का होईना सुरवात तर झाली. ही खूप मोठी जमेची बाजू.

आयुष्याची 23 वर्षं गेल्यानंतर "डॉ. अरविंद थत्ते' नावाच्या संगीतविद्यापीठात झालेला माझा प्रवेश... संगीतशास्त्राचं आख्खं ब्रह्मांड त्यांनी माझ्यासमोर उलगडलेलं आणि ते समजून घ्यायचा प्रयत्न करणारा मी...पेटीचं तंत्र, वाजवायच्या पद्धती, भात्याची हाताळणी, कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या करायच्या नाहीत याचं काटेकोर पालन...रागशास्त्र...रागात काय काय घडतं...रागातल्या विविध गती... लयकारी...तिहाया...विविध जातींमधलं वादन आणि रियाज...साथसंगतीचं तंत्र...त्यातले नियम आणि ऍप्रोच...सोलोवादनातल्या महत्त्वाच्या गोष्टी...रागविस्ताराच्या पद्धती...एका विषयामधून दुसऱ्या विषयात जाणं...त्यामधलं ब्रिजिंग...विविध घराण्यांचं विश्‍लेषण...गायकांच्या गायकीचा अभ्यास...निरीक्षणं...शंकानिरसन...लय पक्की करण्यासाठीचा रियाज...जोडरागांचा अभ्यास... श्रुतिविचार...श्रुतींची ओळख आणि त्या प्रत्यक्ष तंबोऱ्यावर लावून केलेला रियाज व अभ्यास... स्टेजवरचे अनुभव शेअर करणं...त्यातून दादांनी सांगितलेली निरीक्षणं नोंदवून घेणं व अभ्यासणं...! अशा अगणित गोष्टी डोळ्यासमोरून झर्रकन्‌ तरळून जातात.

इथून पुढं सुरू झालं माझं "प्रोफेशन'! म्युझिकमधलं. तळवलकरगुरुजींनी काही ठिकाणी माझ्या ओळखी करून दिल्या; विशेषतः शांभवी वझे, मनीषा साठे, विजय कोपरकर इत्यादी. "चांगला मुलगा आहे. त्याला साथीला घेत जा,' असं इतर कलाकारांना सांगतानाच ते स्वतःबरोबरही मला साथीला न्यायचे. त्या काळात मी विजय कोपरकर, माधुरी जोशी अशा गायकांकडं साथीला जात असे. हळूहळू संगीताचे कार्यक्रम मिळायला लागल्यावर मी नोकरी सोडली आणि "म्युझिक प्रोफेशन'मध्ये स्वतःला पूर्ण वेळ झोकून दिलं.
एकीकडं अरविंददादांकडं विद्यार्जन अव्याहत सुरू असतानाच मोठमोठ्या कलाकारांबरोबर साथसंगतीचे योग येत गेले आणि कलाकार म्हणून माझाही विकास सुरू झाला.

संस्कारांचं म्हणायचं तर, अरविंददादांमुळे मी "पहिल्यांदा चांगला माणूस आणि मग कलाकार' हे त्यांचं वाक्‍य मनावर कोरून घेतलं. "कलाकार शिकलेला नसतो, छंदीफंदी असतो, व्यसनी असतो, कलाकाराची फक्त कलाच पाहावी,' अशा सर्व वाक्‍यांच्या विरुद्ध हे "थत्ते नावाचं विद्यापीठ' होतं. साधं राहणं, खूप चांगला माणूस असणं, दिलेली वेळ काटेकोरपणे पाळणं, दिलेली तारीख जिवापलीकडं पाळणं इत्यादी गोष्टी मी चटकन सरावात आणल्या. दादा नेहमी म्हणतात ः "एक वेळ कलेतल्या काही गोष्टी तुला आल्या नाहीत तरी चालेल; पण समाजात एक उत्तम माणूस म्हणून तुझी ओळख ही असलीच पाहिजे आणि ती कायम राहायला हवी.''
एके दिवशी मित्रवर्य निखिल फाटक मला बेबीताईंकडं घेऊन गेला. बेबीताई म्हणजे आदरणीय रोहिणी भाटे. संगीताचं दृक्‌-श्राव्य विश्व बेबीताईंनी माझ्यासमोर ठेवलं आणि मी भारावून गेलो. तो "ऍस्पेक्‍ट' झपाट्यानं आत्मसात करू लागलो. श्राव्यसंगीताचं दृश्‍यरूप...अहाहा! अवकाशाचा वापर...नृत्य... अभिनय...कोरिओग्राफी...संस्कृतचा-साहित्याचा गाढा अभ्यास...स्वतः केलेली कवनं आणि संगीतरचना (कथकच्या बंदिशी, ताल, धृपदं, कवित्तं इत्यादी)... हा सगळा आवाका प्रचंड मोठा आणि विशेष म्हणजे एवढा प्रचंड अभ्यास असणारी ही स्त्री स्वभावानं आणि स्टेजवर मात्र नखशिखान्त कलाकार! माझ्या सांगीतिक जडणघडणीत खूप मोठा वाटा हा बेबीताईंचा सहवास आणि कथकसंगती यामुळे मिळालेल्या गोष्टींचा आहे.

याच प्रवासात शमाताई (शमा भाटे) भेटल्या आणि कुठल्याही व्यवहाराच्या पलीकडं असणारं सांगीतिक नातं मला मिळालं. विलक्षण व्यक्तिमत्त्व. लिहावं तेवढं थोडं. त्यांच्याबरोबर मी सुमारे दहा वर्षं सहकलाकार म्हणून वावरलो आहे. संगीतावरच्या अनेक गोष्टी शेअर करणं, त्यांच्यासाठी अनेक रचना कंपोज करणं, त्यांच्या मोठ्या कार्यक्रमांचं संगीतसंयोजन करणं इत्यादी गोष्टींतून मला भरपूर अनुभव मिळत गेला आणि मी समृद्ध झालो.

याबरोबरच नामवंत तबलावादकांना लेहऱ्याची संगत सुरू झाली होती. तळवलकरगुरुजींबरोबरच योगेश सम्सी, अनिंदो चटर्जी, विजय घाटे, अरविंदकुमार आझाद, रामदास पळसुले इत्यादी. आणि एके दिवशी योगेशदादांचा फोन आला ः "चिन्मय, अमुक तारीख फ्री आहे का? झाकीरभाईंबरोबर वाजवायचंय.' अस्मान ठेंगणं!
रागसंगीताचे विविध पैलू विविध घराण्यांच्या गायक-गायिकांबरोबरच्या साथसंगतीमुळे उलगडले. गिरिजादेवी, उल्हास कशाळकर, व्यंकटेशकुमार, जयश्रीताई पाटणेकर, अश्विनी भिडे-देशपांडे, तसंच पुढील पिढीतल्या जवळजवळ सर्वच गायक-गायिकांना साथसंगत केली आणि रागशास्त्र पक्क झालं. याच प्रवासात साक्षात्‌ किशोरीताई आमोणकर यांना साथसंगत करण्याचा योग आला. त्यांना "गानसरस्वती' का म्हटलं जातं याची प्रत्यक्ष अनुभूती स्टेजवर घेता आली. त्यांच्या भेटी-गाठी आणि चर्चा (चर्चा म्हणजे, त्या बोलत व मी ऐके) यातून भली मोठी शिदोरी मला मिळाली.
मध्यंतरीच्या काळात पुण्याचे मुकुंद मराठे व साताऱ्याचे राजेंद्र मणेरीकर यांच्याकडं गाण्याचे धडे घेतले. मणेरीकरबुवांमुळे "व्हॉईस कल्चर'चा परिचय झाला आणि नवीन अभ्यासक्षेत्र खुलं झालं.

अरविंददादांकडं मी शिकत असतानाच्याच काळात सुयोग कुंडलकर आणि चैतन्य कुंटे यांचंही शिक्षण दादांकडं सुरू होतं. "कोल्हटकर-कुंटे-कुंडलकर' यांना "थ्री "के'ज्‌ ऑफ थत्ते' किंवा "थत्तेंचे तीन एक्के' असं म्हणतात, हे मला नंतर कळलं! वास्तविक चैतन्य, सुयोग आणि मी हे वेगवेगळ्या धाटणीचे आणि संगीतप्रवृत्तीचे विद्यार्थी; परंतु अरविंददादांनी आम्हाला शिकवताना आमच्या मूलभूत धाटणीला (फ्लेवर) धक्का न लावता शिकवलं, ही त्यांच्या शिकवण्याची आणखी एक खासियत. आमची तिघांची तालीम ही वेगवेगळी चाले (वन टू वन). त्यामुळे एकाच शिक्षणपद्धतीत शिकणाऱ्या आम्हा तिघांचा सिलॅबस मात्र वेगवेगळा होता हे नक्की!
या प्रवासात ज्येष्ठ संवादिनीवादकांशी माझी झालेली ओळख आणि त्यांचं मला मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यात आदरणीय अप्पा जळगावकर, तुळशीदास बोरकर आणि विश्वनाथ कान्हेरे यांचा प्रामुख्यानं समावेश करावा लागेल, तसंच लहानपणी ऐकलेली रामभाऊ विजापुरे यांची पेटी ही आयुष्यभर लक्षात राहणारी. मनोहर चिमोटे यांचं वादनही बऱ्याच वेळा ऐकलं आहे.
इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर असल्यानं साहजिकच मी स्टुडिओकडं वळलो. रेकॉर्डिंग्ज्‌मध्ये पेटी वाजवण्याबरोबरच तिथलं संयोजनही करू लागलो. कथकसाठी काही बंदिशी करता करता कथक बॅलेज्‌साठी स्वतंत्रपणे संगीतदिग्दर्शन केलं. या प्रवासात गाठ पडली ती "स्टुडिओ मॅजिक नोट'च्या आमोद कुलकर्णीशी. त्याच्याशी उत्तम ट्युनिंग जमलं. आता तर "चिन्मय-आमोद' या नावानंच आम्ही विविध प्रोजेक्‍ट्‌सना संगीत देत असतो. प्रोफेशनच्या सुरवातीच्या काळात ज्या एका स्टुडिओत असिस्टंटच्या नोकरीसाठी अर्ज केला होता, त्याच स्टुडिओतलं एका प्रोजेक्‍टचं काम "रिपेअर' करण्यासाठी माझ्याकडं आलं. असे काही गमतीशीर योगदेखील आले.
संगीतकलाकारांसाठी साउंड सिस्टिमचं बेसिक ज्ञान हे महत्त्वाचं असतं. काही कार्यशाळांच्या माध्यमातून हा विषय मी शिकवला व अजूनही शिकवतो आहे.
कलाकारासाठी वाद्य हे जसं महत्त्वाचं तसंच त्या वाद्याचा निर्माताही. पुण्यातल्या "कलाश्री म्युझिक'चे चंद्रकांत निगडे (चंदूभाई) हे वाद्यावर निस्सीम प्रेम करणारे कुशल कारागीर. त्यांच्याशी माझी झालेली ओळख व मैत्री हे मी माझं भाग्य समजतो. चंदूभाईंच्या मदतीनं हार्मोनिअमच्या बांधणीतलं संशोधन मला करता आलं. "सकाळ'नं "नॅनो हार्मोनिअम' असं नामकरण केलेल्या कमी वजनाच्या पेटीची निर्मिती आम्ही दोघांनीच केली. भाता कसा बांधावा, रीडच्या जातीनुसार व पोतानुसार रीड बोर्डचं डिझाईन कसं बदलावं, लाकूड कोणकोणतं वापरावं इत्यादी अनेक विषय मी हाताळले.

गुरुंबरोबर कलाकारासाठी आवश्‍यक असते ती कुटुंबाची साथ. कारण, कलाकाराच्या "म्युझिक इमोशन्स' ही मंडळी सांभाळत असतात. माझं कुटुंब तर त्याहीपलीकडं जाऊन माझ्या मागं उभं आहे. बेभरवशाचं आर्थिक उत्पन्न, स्ट्रगल-पीरिअड (जो अजूनही सुरू आहे... सुरूच असतो नेहमी) या सगळ्यात पत्नी साधना हिची मोलाची साथ आणि आई-वडील, भाऊ, बहीण यांचा खंबीर आधार यावरच माझा संगीतप्रवास सुरू आहे.

हार्मोनिअमवादनापासून सुरू होऊन पुढं म्युझिक ऍरेंजर, कंपोजर, रेकॉर्डिंग इंजिनिअर, म्युझिक डायरेक्‍टरपर्यंत पोचलेला हा प्रवास मला नवीन काहीतरी अजमावून पाहायची प्रेरणा देत असतो. "ऍरेंज्ड्‌ म्युझिक'वर शास्त्रीय हार्मोनिअम सोलो, "अभिवृंद' हा शास्त्रीय संगीताचा ऑर्केस्ट्रा ही त्याची काही उदाहरणं. निखिलच्या "धा ना' यूट्यूब चॅनलसाठीही मी संगीत देतो.
या प्रवासातली मित्रमंडळींची साथदेखील महत्त्वाची असते. निखिल, आमोद यांच्याबरोबरच चारुदत्त फडके, सुनील अवचट, गोविंद भिलारे, निखिल महामुनी आदींमुळं हा "प्रवास' सुखाचा होतो.

कथकनृत्यांगना शर्वरी जमेनीस हिच्याबरोबर अनेक महोत्सवांतून, विदेशांतल्या दौऱ्यामधून पेटीची आणि गायनाची साथ मी केली आहे. सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सव, "वसंतोत्सव', "स्वरझंकार', "तानसेन महोत्सव', "जितेंद्र अभिषेकी महोत्सव' अशा अनेक संगीतमहोत्सवांत मला माझी कला सादर करता आली हे भाग्यच!
काही विद्यार्थी पेटी आणि गाणं शिकण्यासाठी माझ्याकडं येतात. "आपल्याला जे येतंय ते त्यांना कसं शिकवायचं' या नवीन गोष्टीचा अभ्यास यानिमित्तानं होतोय. त्यातही वेगळीच मजा आहे.

कथक नृत्यांबरोबरच भरतनाट्यम्‌च्या ज्येष्ठ कलाकार सुचेताताई चापेकर यांचंही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मला लाभले.
पुन्हा तीच संध्याकाळ...तोच यमन...तीच गत. "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ'!
जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा वाटलं, की किती साधी आहे ही गत! आज वाजवताना मात्र कळतं की संगीताचं सगळं सार या एकाच "गती'त सामावलेलं आहे!
ग ऽ ग रे गमपम...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinmay kolhatkar write article in saptarang