....आणि याच हातांनी थाळी वाजविली

citizens clap thank those fighting forefront against coronavirus article write mukund potdar
citizens clap thank those fighting forefront against coronavirus article write mukund potdar

कोलकाता : जून 2019
75 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर नीलरतन सरकार मेडिकल कॉलेजमधील ज्यूनीयर डॉक्‍टर परीबाह मुखोपाध्याय यांना मृताच्या कुटुंबीयांकडून बेदम मारहाण. डॉक्‍टरांच्या डोक्‍याला सूज.

पुणे : ऑगस्ट 2018
रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमधील निवासी डॉक्‍टरवर 30 हून जास्त लोकांचा हल्ला. निवासी डॉक्‍टरांचा संप.
गर्लफ्रेंडला पाचवा महिना गेल्यानंतर तिचा गर्भपात करण्यास नकार दिल्याबद्दल गायनॅकॉलॉजीस्ट डॉ. अमोल बीडकर यांच्यावर पिंपळे गुरवमधील क्‍लिनिकमध्ये प्रियकराकडून तीक्ष्ण हत्याराने वार

औरंगाबाद : जानेवारी 2020
रस्त्यावरील अपघातात जखमी झालेली महिलेला रस्त्यावरील काही व्यक्तींनी औरंगाबादमधील धूत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा नातेवाईक येईपर्यंत मृत्यू. नातेवाईक येताच डॉक्‍टरांवर हलगर्जीपणाचा आरोप आणि हल्ला.

22 मार्च 2020 रोजी देशभरातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्‍चात्ताप होईल अशा पद्धतीने थाळीनाद, शंखनाद केल्यानंतर जोसार्वजनिक उच्छाद मांडला त्याचे सोशल मिडीयावरील व्हिडिओ पाहून धक्का बसला. आपला नाद करायचा नाय अशा अविर्भावात भारतवासीयांनी थाळीचे तीन तेरा केले. या देशबांधवांनी ज्या वर्गाला पाठिंबा देण्यासाठी थाळीनाद केला तो पाहून त्या वर्गाला म्हणजे डॉक्‍टर मंडळींना काय वाटले असेल? असा विचार मनात आला आणि थरकाप उडाला.

काही क्षणांत डॉक्‍टरांवरील हल्याच्या हेडलाईन्स आठवल्या. काही पुण्यातल्या, काही महाराष्ट्रातल्या, तर काही मेरा भारत महान अर्थात मायदेशातल्या. भारतात विकल्या जाणाऱ्या क्रिकेट-क्राईम-सिनेमा या तीन C मुळे एक गोष्ट पक्की ठाऊक होती आणि ती म्हणजे भारत हा बघ्यांचा देश आहे. त्यातच अलीकडे मोबाईलमुळेबघ्यांचे रूपांतर सेल्फीखेच्यांमध्ये झाले.

मूळ उद्देशाला हरताळ फासणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, हे थाळीनादाद्वारे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वास्तविक पाच मिनिटांचा थाळीनाद ही प्रतिकात्मक कृती होती. त्यातून प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रातील झुंजार बंधू-भगिनींना धन्यवाद द्यायचे होते. कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्यात वाढू नये म्हणून जनता कर्फ्यू हे पहिले पाऊल होते. सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत हे पाऊल यशस्वीरीत्या टाकले गेले, पण त्यानंतर थाळीनादाचा अतिरेक झाल्याने आपण दोन पावले मागेच गेलो.

बुजुर्ग मंडळी परिपक्व असतात, पण एका आजीबाईंनी दोन्ही पराती एकमेकांवर आदळत दिलेला प्रतिसाद महाभयंकर होता. एके ठिकाणी तरगंजक्‍या पत्र्यावर बेछूट लाठीमार करण्यात आला. पूर्वी डॉक्‍टर, इंजिनीयरआणि वकिलांना समाजात प्रतिष्ठा होती. आता आर्थिक उदारीकरणासह विविध कारणांमुळे तसे चित्र राहिलेले नाही. त्यातही व्हॉटस ऍपसह विविध सोशल मिडीयावरील पोस्टमुळे स्वयंघोषित डॉक्‍टरांचे पेव फुटले आहे.

डॉक्‍टरांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दिवसेंदिवस विघातक बनतो आहे. त्यातूनच डॉक्‍टरांवर हल्ले होतात. काही ठिकाणी रुग्णालयांत रुग्णांकडे दुर्लक्ष होते, तर काही ठिकाणी भरमसाट बिल आकारले जाते. हे प्रमाण नेमके किती टक्के याचा काथ्याकूट न करता हा मुद्दा पुढे नेऊयात. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना सरकारी रुग्णालयांत उपचार दिले जात आहेत. तेथील सुविधा, दर्जा, आदींविषयी सतत चर्चा होते, जी नकारात्मक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांनी कात टाकली आहे. तेथील डॉक्‍टरांनी शड्डू ठोकले आहेत. नर्सेस, वॉर्ड बॉय हे सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. थाळीनादाच्या अतिरेकामुळे त्यांच्यावरील ताण वाढल्याशिवाय राहणार नाही.

ज्या मंडळींनी थाळीनाद केला त्यातीलच काही हात डॉक्‍टरांवर उगारले गेले. थाळीनादाची गुंजहवेत ओसरली. पण या मंडळींचा अतिउत्साह अजूनही शाबूत आहे. कोरोनामुळे अंतर्मुख होण्याची एक संधी एका दिवसासाठी मिळाली होती, पण त्या संधीचे सोने करण्याऐवजी थाळी बडवून भंगार झाले.

कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेता आणखी बराच काळ संयम ठेवावा लागणार आहे. त्यातील पहिल्या चाचणीचा तरी चोथा झाला, पण अजूनही सावरण्याची संधी आहे. थाळीनाद करणाऱ्यांनी हाच विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com