स्थापत्य शाखेतल्या बदलांची अभ्यासपूर्ण नोंद...

स्थापत्य अभियांत्रिकी ज्ञानशाखा ही जगातील सर्वांत जुनी अभियांत्रिकी ज्ञानशाखा समजली जाते. हजारो वर्षांच्या जगाच्या विकासात या ज्ञानशाखेने मोलाचं योगदान दिलं आहे.
Civil Engineering changes in architecture Key for Practical Construction book
Civil Engineering changes in architecture Key for Practical Construction book sakal
Updated on
Summary

स्थापत्य अभियांत्रिकी ज्ञानशाखा ही जगातील सर्वांत जुनी अभियांत्रिकी ज्ञानशाखा समजली जाते. हजारो वर्षांच्या जगाच्या विकासात या ज्ञानशाखेने मोलाचं योगदान दिलं आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी ज्ञानशाखा ही जगातील सर्वांत जुनी अभियांत्रिकी ज्ञानशाखा समजली जाते. हजारो वर्षांच्या जगाच्या विकासात या ज्ञानशाखेने मोलाचं योगदान दिलं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या तीन मूलभूत गरजांपैकी निवारा या गरजेची परिपूर्ती प्राचीनकाळापासून आजतागायत स्थापत्यशास्त्राने केली आहे. ‘की फॉर  प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन’ हे पुस्तक स्थापत्य अभियंता प्रकाश मेढेकर यांच्या ‘दिशा बांधकाम नवनिर्मितीची’ या मराठी पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आहे. इंग्रजी आवृत्तीमुळे भाषेच्या मर्यादा ओलांडून हे पुस्तक आता देशविदेशांतील लोकांपर्यंत पोचण्यास मदत झाली आहे. या पुस्तकात बांधकाम साहित्याचा वापर, तंत्रज्ञानातील आधुनिकता आणि पद्धतीमधील नावीन्यता आणि कालानुरूप घडलेले सर्व बदल अतिशय समर्थपणे मांडण्यात आले आहेत.

पुस्तकातील अनेक लेख पर्यावरणाशी निगडित असल्याने आजच्या काळात अशा विषयांची माहिती सर्वसामान्यांना होणं सोपं झालं आहे. आपलं ज्ञान व अनुभव पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न लेखकाने आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत समर्थपणे केला आहे. वेळेच्या बचतीसाठी नवीन साहित्य, तंत्रज्ञान, मशिनरी आणि विशेष पद्धती वापरणं आवश्यक आहे. बांधकामक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या अभियंत्यांसाठी याची ओळख होणं तर फारच आवश्यक आहे. प्रचलित विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना काही मर्यादा असतात, सर्व गोष्टी त्यात शिकवता येत नाहीत. कॉलेजमधील अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल अनुभव यामधील अंतर भरून काढण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून घडलं आहे.

वैविध्यपूर्ण बांधकाम साहित्य, अष्टपैलू काँक्रीट, अत्याधुनिक यंत्रप्रणाली, इमारतींसाठी व शहरांसाठी आधुनिक तंत्रज्ञान अशा पाच विभागांमध्ये या पुस्तकाची विभागणी केलेली आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम साहित्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकीला नवं रूप मिळालं आहे. या सदरात सिमेंट, स्टील, सौंदर्यपूर्ण नैसर्गिक दगड, काच, ॲल्युमिनिअम, स्टेनलेस स्टील, बायसन बोर्ड, प्लास्टिक, सीलिंग टाइल्स, पर्यावरणपूरक फ्लाय अॅश इ. साहित्यावर माहितीपूर्ण लेख आहेत.

पाण्यानंतर जगात सर्वाधिक वापरलेली वस्तू म्हणजे काँक्रीट. काँक्रीटच्या सदरात सेल्फ कॉम्पॅक्टिंग काँक्रीट, ग्लास फायबर काँक्रीट, सेल्युलर काँक्रीट, पारदर्शक काँक्रीट, उष्ण तापमानातील काँक्रीट, फेरोक्रीट, पेपरक्रीट व याशिवाय विविध प्रकारच्या काँक्रीटवर अतिशय सखोल लेख आहेत. अभियंत्यांना त्यातून व्यवहारोपयोगी ज्ञान मिळण्यास निश्चित मदत होईल. बैठ्या एकमजली घरांपासून सुरू झालेला इमारतींचा प्रवास आता गगनचुंबी इमारतीपर्यंत येऊन थांबला आहे. अत्याधुनिक यंत्रप्रणालीमुळे हा प्रवास सुकर झाला आहे. या पुस्तकातील अत्याधुनिक यंत्रप्रणाली या सदरात विविध प्रकारच्या क्रेन, पेव्हर, मिक्सर, पंप, रोलर, ब्रेकर, बुलडोझर, ग्रेडर, सुरक्षित प्लॅटफॉर्म यावर अतिशय माहितीपूर्ण विवेचन केलं आहे. प्रत्येक यंत्रणेचे विविध भाग कोठे आहेत ते सचित्र नमूद केलं आहे. कोणत्या प्रकल्पावर कोणती यंत्रप्रणाली वापरावी व कोणती यंत्रप्रणाली प्रभावी ठरेल याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांना यातून मिळतो. या यंत्रप्रणालींचे विविध भाग, त्यांची कार्यं व वैशिष्ट्यं यांची माहिती तांत्रिक असली तरी लेखकाने आपल्या साध्या सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडली आहे, त्यामुळे ती किचकट न बनता सर्वसामान्य वाचकांच्याही मनात कुतूहल निर्माण करते आणि पुस्तक अधिक वाचनीय बनवते.

पारंपरिक व प्रचलित इमारतींपेक्षा बहुमजली इमारतींचे स्थापत्य अभियांत्रिकीचे आयाम वेगळे आहेत, त्यावरही मेढेकर यांनी प्रकाश टाकला आहे. अशा प्रकारच्या इमारतींसाठीची अग्निप्रतिबंधक यंत्रणा, त्यांचं जलव्यवस्थापन, कचरा वर्गीकरण व त्यासाठी लागणारी यंत्रणा, बांधकाम सुरक्षितता, प्लंबिंग, रंगकाम, नॅनो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर, प्रीइंजिनिअर्ड इमारतींचं तंत्रज्ञान, भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान आदी विविध व महत्त्वपूर्ण बाबींचा सविस्तर ऊहापोह केल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या सल्लागार अभियंत्यांना मोठीच मदत झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र शासनाने ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आपल्या देशात राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांचं अंदाजपत्रकही सरकारने बनवलं आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून सुमारे १०० शहरांची निवडही जाहीर झाली आहे. या नवीन योजनेच्या अंमलबजावणीच्या टप्प्यावर अशा पुस्तकाची निर्मिती होणं ही चांगली बाब आहे. कारण स्मार्ट सिटीसाठी लागणारं तंत्रज्ञान, खोदाईविरहित जगाची ओळख, वॉटरजेट प्रणाली, जी.पी.एस. प्रणाली, ड्रेनेज सफाईचं तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण तंत्रज्ञान, फ्लायओव्हर पूल बांधणी, चारचाकी पार्किंगसाठीच्या यंत्रणा, पाणी शुद्धीकरणाचं फायटोरीड तंत्रज्ञान, रस्तेबांधणी वगैरे विविध विषयांवरील लेख स्मार्ट सिटी प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व अभियंत्यांच्या ज्ञानात भर घालणारे आहेत. आजच्या काळातील अभियंते, सल्लागार, व्यावसायिक, प्राध्यापक व विद्यार्थिवर्गासाठी अशा इंग्रजी आवृत्तीची आवश्यकता होती.

पुस्तकाचं नाव : की फॉर प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन

लेखक : प्रकाश मेढेकर

प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे

(०२०-२४४०५६७८, ८८८८८४९०५०)

पृष्ठं : २८०, मूल्य : ४२५ रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com