आपण आणि हवामान बदलाची आणीबाणी

औद्योगिक क्रांतीनंतर मागील ४५-५० वर्षामध्ये ग्रीन वायु उत्सर्जनामध्ये ८० टक्के वाढ झाली. ऊर्जेच्या वापरातून सर्वाधिक ६० टक्के ग्रीन वायु उत्सर्जन होते. त्याचा परिणाम म्हणजे तापमान वाढ होऊ लागली
आपण आणि हवामान बदलाची आणीबाणी
आपण आणि हवामान बदलाची आणीबाणीSakal news

आपल्याकडे दहा-पंधरा वर्षापूर्वी हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग याची चर्चा सुरू झाली. त्याचे परिणाम म्हणजे तापमान वाढ होईल, हिमनदया वितळतील, समुद्राची पातळी वाढेल, तीव्र किंवा कमी पाऊस, चक्री वादळ असे चित्र रंगविले (?) जात होते. सर्व सामान्य लोकांना हे कुठेतरी जगामध्ये होणार आहे, असे वाटत होते. परंतु मागील पाच वर्षापासून हवामान बदलाची समस्या (तापमान वाढ, मोठा पाऊस, दुष्काळ, गारपीठ रोगराई) सर्वांना जाणवत आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर मागील ४५-५० वर्षामध्ये ग्रीन वायु उत्सर्जनामध्ये ८० टक्के वाढ झाली. ऊर्जेच्या वापरातून सर्वाधिक ६० टक्के ग्रीन वायु उत्सर्जन होते. त्याचा परिणाम म्हणजे तापमान वाढ होऊ लागली. जागतिकीकरणानंतर विकासाचे मापदंड, परिमाण बदलले, नैसर्गिक संसाधनाचा अमर्याद वापर आणि वाढते प्रदूषण हे जणू अपरिहार्यच झाले. भारत हा देश मोसमी पावसावर आधारित शेती करणाऱ्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

८२ टक्के शेती पावसावर आधारित आहे. त्यामुळे हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका भारतीय शेतकऱ्यांना बसेल, असे जगभरातील तज्ञ सांगत आहेत आणि तसा अनुभव शेतकऱ्यांनाही येत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीठ त्याचबरोबर पिकांवर रोगांचा वाढता प्रादुर्भाव. दुसरीकडे शेतीमध्ये सुद्धा बदल होऊ लागले जे हवामान बदल या संकटाची तीव्रता वाढवू लागले ते म्हणजे पिकातील विविधता कमी होणे, जास्त आदानाची (इनपुट) नगदी पिके वाढली, रासायनिक खत वापर वाढला. या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम वातावरणावर होऊ लागला. हवामानामध्ये बदल होतच असतो, दुष्काळ, अतिवृष्टी हा निसर्ग चक्राचाच भाग आहे, हजारो वर्षापासून हे होत आहे. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याचे काही कारण नाही. असा एक मतप्रवाह आहे. हे जरी खरे असले तरी त्या बदलाची तीव्रता आणि वारंवारता ही चिंता करण्यासारखी बाब आहे. १९९० च्या तुलनेत २०१६ साली तापमान ०.८५ सेल्सिअसने वाढले आणि विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे त्यापैकी ६७ टक्के वाढ ही १९७० नंतरची आहे. विकासाचे सध्याचे प्रारूप म्हणजेच हवामानबदलाचे कारण असे समीकरण ठरत आहे.

कारण मोठे दळणवळण, त्यासाठी मोठा इंधनाचा वापर, मोठ्या रस्त्यांची मागणी त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सिमेंट वाळू त्यातून होणारी पर्यावरणाची हानी. मोठे प्रकल्प, त्यासाठी होणारी जंगलतोड, उपजाऊ जमिनीचे अधिग्रहण, त्यामुळे होणारे स्थलांतर, मोठी कारखानदारी, त्याचे प्रदूषण, वाढते शहरीकरण व त्यातून वाढणाऱ्या समस्या हे सर्व प्रकार आताच्या विकासाचे प्रारुपामध्ये आहेत. संपूर्ण जगामध्ये विविध पातळ्यांवर हवामान बदलाची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये धोरणकर्ते आहेत, संशोधक आहेत, राजकारणीसुद्धा आहेत. या विषयावर अनेक चळवळी सुरू झाल्या आहेत. ग्रेटा थनबर्ग या सोळा वर्षाच्या मुलीला आज सर्व जग ओळखत आहे. त्याचे कारण म्हणजे तिने हवामान बदलाचे अनुषंगाने सुरु केलेली चळवळ. हवामान बदलाचे संकटाकडे जगाचे लक्ष जावे, त्याचा दबाव निर्माण व्हावा आणि राज्यकर्त्यांचे धोरण बदलावे म्हणून तिने शाळा बंद ठेवण्यास भाग पाडले. तिने तिच्या देशातील पार्लमेंट समोरही आंदोलन केले. तिच्या शाळा बंद ठेवण्याच्या कृतीला जगभरातील विध्यार्थ्याकडून मोठा मिळाला.

नोबेल पुरस्कारासाठी तिची चर्चा सुरु आहे. एवढा मोठा परिणाम तिच्या आंदोलनाचा झालेला आहे. आपल्याकडे ही युवा वर्गामध्ये पर्यावरण या विषयी मोठा जिव्हाळा आहे असे जाणवते. वृक्षारोपण, जलसंधारण, जंगलवाचवा अशा चळवळीमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे. परंतु, आजच्या पर्यावरण आणि हवामान बदलाच्या आणीबाणीसदृश्‍य परिस्थितीमध्ये तेवढे पुरेसे नाही. जनरेठा, दबावगट अशा माध्यमातून शासनाला धोरण बनविण्यासाठी बाध्य करणे इथपर्यंत हा लढा न्यावा लागेल. या सर्व बाबींचा धांडोळा आपण पर्यावरण - शेती आणि हवामान बदल या सदरात घेणार आहोत.

- डॉ. सतीश करंडे, सल्लागार, शाश्वत शेती विकास मिशन, एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com