आईपणाबरोबर अभिनयाचाही आनंद!

कविता लाड
मंगळवार, 11 जून 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

कम बॅक मॉम  - कविता लाड, अभिनेत्री 
आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. आई होणं म्हणजे नव्या जबाबदाऱ्या आपल्यावर येतात आणि आपण त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याच पाहिजेत. मला ईशान आणि सनाया अशी दोन मुलं आहेत. ईशान आता १५ वर्षांचा आहे आणि सनाया ११ वर्षांची आहे. 

प्रेग्नंसीनंतर मी नाटकातून ब्रेक घेतला होता. मी असं ठरवलं होतं, की माझी मुलं थोडी मोठी होत नाहीत तोपर्यंत नाटकात काम करणार नाही. कारण नाटक करायचे म्हटलं, तर अनेक ठिकाणी दौरे असतात. मुलांना लहान असताना सोडून नाटक दौऱ्याला जाणं मला जमलं नसतं, त्यामुळं मी नाटकातून काही काळ ब्रेक घेतला होता. पण माझे मालिकांमध्ये काम करणे सुरूच होत. मला आठवत की, ईशान थोडा मोठा झाला आणि त्यानं मला विचारलं, ‘‘आई तू नाटकात काम करत होतीस ना?’ तेव्हा मी त्याला हसून ‘हो,’ असं उत्तर दिलं होतं. पण आता त्यांना मला नाटकात काम करताना बघून फार छान वाटतं. मी प्रेग्नंट असताना ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका करत होती. मी तेव्हा जास्त सुट्टी घेतली नव्हती. मी प्रेग्नंसीमध्ये आठव्या महिन्यापर्यंत काम केलं आणि त्यानंतर तीन महिने मॅटर्निटी लिव्ह घेतली. तीन महिन्यानंतर मी पुन्हा काम करण्यास सुरवात केली. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका सुरूच होती. 

ईशान झाल्यानंतर ‘चार दिवस सासूचे’ सुरू असताना मी ‘अंकुर’ ही मालिकादेखील करत होते. त्यानंतर मी बऱ्याच मालिका केल्या. ‘मेजवानी’ या कुकरी शोचं सूत्रसंचालन केलं होतं. सनाया साडेतीन वर्षांनंतर झाली, तेव्हाही माझं काम सुरूच होतं. तेव्हा मी ‘चार दिवस सासूचे’ मालिका करत होते. ‘चार दिवस सासूचे’ मालिका दहा वर्षं चालली. सनाया झाल्यानंतर मी फक्त नाटकातूनच ब्रेक घेतला होता. ‘चार दिवस सासूचे’बरोबरच ‘तुमचं आमचं सेम असतं’ ही मालिका करत होते. त्यानंतर मी एक ‘सुखांत’ नावाचा चित्रपटही केला. त्या वेळी मी फार मोठी कामं करत नव्हते, कारण मुलांना सांभाळून काम करणं खरोखर अशक्‍य होतं. प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीला घर आणि बाहेरची काम दोन्ही घेऊन पुढं जाणं तितकंच गरजेचं असतं. पुढील भागात घर आणि करिअर कसं सांभाळलं, ते सांगते....! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Come Back Mom kavita lad Joy of acting with motherhood