esakal | नाते ‘टॉम ॲण्ड जेरी’सारखे!
sakal

बोलून बातमी शोधा

Omprakash-and-sayli

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

नाते ‘टॉम ॲण्ड जेरी’सारखे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जोडी पडद्यावरची - ओमप्रकाश शिंदे व सायली संजीव
अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘खुलता कळी खुलेना’, ‘का रे दुरावा’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिका गाजल्या.

मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करणारी सायली आणि ओमप्रकाश हे दोघे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत ते ‘यू टर्न’ या मराठी वेबसीरिजसाठी. आपल्या पहिल्या भेटीबद्दल ओमप्रकाश म्हणाला, ‘‘सायली आणि माझी पहिली भेट ही ‘झी मराठी’ वाहिनीच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये झाली. तेव्हा सायलीसुद्धा मालिका करत होती, त्यामुळे ती तिथे उपस्थित होती. त्या वेळी फार बोलणे झाले नाही, पण ओळख व्हावी इतपत आम्ही बोललो होतो.’’ सायली पहिल्या भेटीबद्दल म्हणाली, ‘‘कार्यक्रमादरम्यान आमचे शो होते, त्यामुळे आम्ही सर्वच घाईत होतो. त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या भेटीत आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो.’’ 

सोबत काम करतानाचा अनुभव विचारला असता ओमप्रकाश म्हणाला, ‘‘आमची ओळख होती, पण एकत्र काम कधी केले नव्हते. सायलीची आणि माझी ही पहिलीच वेबसीरिज आहे. त्यामुळे दोघांनाही हुरहुर लागली होती. मला सायलीची काम करण्याची पद्धत माहीत नव्हती. कारण काम करताना आपण वेगळे असतो आणि माणूस म्हणून वेगळे असतो, पण सायली जशी आहे तशीच आहे. आम्ही कधीही भेटलो तरी सरळ न बोलता वाकड्यात शिरूनच बोलतो. पण तीच आमची मैत्री आहे, असे म्हणायला हरकत नाही.’’ यावर मानसी म्हणाली, ‘‘ओमप्रकाश खूप सरळ मनाचा माणूस आहे. पण तो माझ्यासाठी तसा नाही, आमचे अजिबात पटत नाही.’’

एकूणच काय, तर दोघांचे नाते हे ‘टॉम ॲण्ड जेरी’सारखे असल्याने त्यांची केमिस्ट्री छान जुळली आहे. एकमेकांचे कौतुक करताना ओमप्रकाश म्हणाला, ‘‘सायलीला सामाजिक भान खूप आहे. समाजात आपण राहत असल्याने त्याचे भले ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव तिला आहे.’’

यावर सायली म्हणते, ‘‘ओमप्रकाश हा मनाने खूप चांगला आहे, तो कधीच कोणाचे वाईट व्हावे असे चिंतत नाही. आम्ही जरी भांडत असलो, तरी त्या भांडण्यातच एक प्रेम आहे, मैत्री आहे. त्याचा नावडता गुण एकच आहे, की वाक्‍या-वाक्‍याला तो चेष्टा करतो आणि मला याचा प्रचंड त्रास देतो.’’ 

सेटवरील गमतीजमतींबद्दल सायली म्हणाली, ‘‘आम्ही खूप धमाल केली. आम्ही जसे भांडतो व परत एकत्र येतो. वेबसीरिजमधील आमची पात्रे तशीच होती, त्यामुळे काम करायला अवघड गेले नाही. ओमप्रकाशची मस्ती, मला त्रास देणे हे चालूच असायचे.’’ ओमप्रकाश यावर म्हणाला, ‘‘सेटवर काम आणि मस्ती दोघांचा मी खूप समतोल राखला. खूप मस्ती केली. सायलीला फार त्रास दिला.’’ 

‘यू टर्न’च्या निमित्ताने राजश्री मराठीने वेब विश्‍वात पाऊल टाकले आहे. ही वेबसीरीज यू-ट्यूब चॅनेलवरही प्रदर्शित झाली आहे. लग्न यशस्वी होण्यासाठी काय करावे, याचे सल्ले देणारे आदित्य आणि मुक्ता लग्नानंतर छोट्याछोट्या गोष्टींवर वाद घालताना यात दिसतात आणि हेच वाद अखेर टोकाला जातात. एका नाजूक वळणावर आल्यानंतर ते यू टूर्न घेतात की, वेगळे होतात हे या वेबसीरिजमध्ये दाखविण्यात आहे. 
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

loading image
go to top