esakal | कवितेची निर्मितीप्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे!
sakal

बोलून बातमी शोधा

poem.

आत्मशोधाच्या मार्गाकडे जाणाऱ्या तसेच सौंदर्याच्या मूलभूत रूपाचा शोध घेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यांची समीक्षा करण्यासाठी कवितेची निर्मितीप्रक्रिया जाणून घेणे, तिचा अभ्यास करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कवितेची निर्मितीप्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे!

sakal_logo
By
गणेश कनाटे

 या भागापासून आपण प्रत्यक्ष काव्यनिर्मितीप्रक्रियेबद्दल थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे जाणून घेण्याचे तीन मार्ग संभवतात- 1) मानसशास्त्रीय अभ्यासाच्या मदतीने, 2) साहित्यशास्त्राच्या मदतीने आणि 3) मेंदूविज्ञानाच्या मदतीने. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात आधीच्या दोन मार्गांनी ही प्रक्रिया समजून घेण्याचे प्रयत्न झालेले आहेत; परंतु मेंदूविज्ञानाच्या मदतीने ही निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याचे प्रयत्न मात्र झालेले दिसत नाही.

सर्वप्रथम मानसशास्त्राच्या मदतीने आजवर काव्यानिर्मितीबद्दल काय आणि किती जाणून घेता आले ते बघूया. भारतीयांच्या दुर्दैवाने हे सारे काम पाश्‍चात्य जगतातच झालेले आहे व या कामाची सुरुवात जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीच झाली होती व ते काम अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे. भारतामध्ये मात्र या क्षेत्रात दखल घेण्यासारखे काहीही काम करण्यात आलेले नाही. असो. सिग्मंड फ़्रॉइड व त्याच्या मनोविश्‍लेषण-शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी जेव्हा अर्थबोध आणि अचेतन मनाच्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून काही प्रयोग व संशोधन केले तेव्हा स्वप्नांच्या विश्‍लेषणातून त्यांना काही महत्त्वाचे निष्कर्ष हाती लागले ज्यामुळे मानसशास्त्रात तर मोठे काम घडलेच; परंतु साहित्याशास्त्रालाही कवी-लेखकाच्या मनात काय घडत असते आणि त्या घडामोडींचा त्यांच्या निर्मितीप्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे काही नेमक्‍या संज्ञा व संकल्पनांच्या मदतीने नीट मांडता आले. फ्रॉइड, मॉर्टन प्रिन्स आणि फ्रेडरिक क्‍लार्क प्रिस्कॉट या व इतरही काही मंडळींनी स्वप्न, दिवास्वप्न, काव्यात्म प्रचिती, गूढ

प्रचिती, भ्रम आदी संकल्पनांचा मानसशास्त्राच्या अंगाने अभ्यास करून यांचा आणि कवीच्या मनात घडत असणाऱ्या इतर घडामोडींचा काव्याशी कसा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनात प्रतिमांचा, दाबलेल्या-दडपलेल्या अतृप्त इच्छांचा, भावनांचा प्रचंड साठा असतो व तो प्रत्यक्षरीतीने काव्यनिर्मितीत वापरला जातो, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. प्रिस्कॉट यांनी The Poetic Mind नावाचा ग्रंथ लिहून काव्यनिर्मितीमागची मानसशास्त्रीय प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फ्रॉइडवाद्यांनी "काव्य हे स्वप्नांप्रमाणे अतार्किक आणि अनेकार्थी असते; ते प्रतिमांची व प्रतीकांची रचना असते; ही रचना जाणीवपूर्वक व कृत्रिमपणे निर्माण केलेली नसते, तर कवीच्या नैसर्गिक मनोव्यापारांचा तो परिपाक असतो,' हे ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. (सुधीर रसाळ, कविता आणि प्रतिमा)

या मंडळींनी काव्याच्या स्वतंत्र रूपघटकांचे काव्यातील स्थान गौण मानले आणि एकप्रकारे कवितेला स्वप्नांचे तसेच दिवास्वप्नांचे पर्यायी रूप मानले. यामुळे या मताला फारशी स्वीकारार्हता लाभली नाही. फ्रॉइडवाद्यांच्या मते कवितेतून एकप्रकारे कवीची विरेचनाची (कथार्सीस) गरज भागते.

स्वतःच्या प्रज्ञेमुळे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेल्या मूलभूत संशोधनामुळे मानसशास्त्राच्या क्षेत्रात प्रचंड आदराने घेतले जाणारे दुसरे नाव आहे कार्ल गुस्ताव युंग यांचे. युंग हे फ्रॉइडचे शिष्य; परंतु त्यांनी आपल्या गुरूचे बरेचशे सिद्धान्त पुढे नेले, तर काही खोडूनही काढले. फ्रॉइड यांनी अचेतन मनाबद्दल बरेच मूलगामी संशोधन केले आहे व या अचेतन मनातील मनोव्यापाराचा मानवी जीवनावर तसेच कलानिर्मितीवर कसा परिणाम होतो, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. युंग यांनी आणखी पुढे जाऊन अचेतन मनाचे व्यक्तिगत अचेतन (Perosnal Unconscious) तसेच सामूहिक अचेतन (Collective Unconscious) असे दोन भाग असतात, असे दाखवून दिले आणि सामूहिक अचेतन मनाच्या संकल्पनेच्या मदतीने मांडलेल्या थियरीच्या मदतीने काव्याला एक व्यापक असे सांस्कृतिक मूल्य मिळवून दिले. युंग यांच्या मते हे सामूहिक अचेतन मन आणि त्यात घडणाऱ्या मनोव्यापारांमुळे कवीला काही आर्ष प्रतिमा (archetypal images) प्राप्त होतात ज्यांच्या मदतीने तो अगदी थेट नव्हे; पण अप्रत्यक्षरीत्या काव्यनिर्मिती करत असतो व त्यातून कवी आपल्या युगासोबतच आपल्या आधीच्या युगांचेही ज्ञान, आकलन आणि अर्थनिर्णयन आपल्या काव्यातून मांडत असतो. अर्थात हे सगळ्यांच कवींबाबत आणि सगळ्यांच कवितांबाबत लागू पडणारे सिद्धान्त नाही. परंतु, ही महत्त्वाची मांडणी होती.

तथापि, या सिधान्ताचीही एक मर्यादा आहेच. या मांडणीमुळे कलाकृती जवळजवळ वस्तुनिष्ठ होऊन जाते आणि कलावंत तिच्या निर्मितीचे निमित्तमात्र. काही कविता (अगदी काहीच) या कवीला साक्षात्कार व्हावा तशा सुचतात आणि कवी त्या एकप्रकारे फक्त कागदावर उतरवून घेत असतो, असे त्यालाही वाटते. या मांडणीचा उपयोग अशा कवितांचे विश्‍लेषण आणि अर्थनिर्णयन करण्यासाठी होऊ शकतो- उदाहरणार्थ ग्रेस यांची प्रसिद्ध "वेरावळीय समुद्राचे दृष्टांत' ही कविता किंवा मनोहर ओक यांची "दिवसातल्या पहिल्या सिगारेटच्या' ही कविता किंवा चार्ल्स बॉद्‌लेयर या प्रसिद्ध फ्रेंच कवीच्या "ला फ्लर द माल' या कवितासंग्रहातील अनेक कविता. परंतु, अशा कविता असतात किती? तसेच या प्रकारच्या मांडणीत कवितेत आशयासोबतच अभिव्यक्तीचे अंग म्हणून येणारे इतर घटक पूर्णपणे दुर्लक्षिले जातात. कविता ही आशय आणि अभिव्यक्तीचे एकजीव असणे असते, या दोन्हींत एक अभिन्नत्व असते, हे मानसशास्त्रीय पद्धतीने निर्मितीप्रक्रियेकडे बघताना दुय्यम स्थानी जाते.

याचा अर्थ ही मांडणी पूर्णपणे त्याज्य आहे, असे मुळीच नाही. किंबहुना या सिद्धांतव्यूहाचा वापर करून मर्ढेकर, चित्रे, पु. शि. रेगे, आरती प्रभू, मनोहर ओक, ग्रेस इत्यादी मराठीतील महत्त्वाच्या कवींच्या काव्याचा अभ्यास करणे, समीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. वाच्यार्थाच्या पातळीवर राहणाऱ्या, रंजनाचा, प्रबोधनाचा हेतू ठेवून लिहिलेल्या कवितांच्या बाबतीत या प्रकारचे मानसशास्त्रीय चिंतन करण्याची फारशी गरज नाही. परंतु, आत्मशोधाच्या मार्गाकडे जाणाऱ्या तसेच सौंदर्याच्या मूलभूत रूपाचा शोध घेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यांची समीक्षा करण्यासाठी कवितेची निर्मितीप्रक्रिया जाणून घेणे, तिचा अभ्यास करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील आणि सुधीर रसाळ यांच्या ग्रंथांचा अभ्यास मराठीत कविता लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाने केलाच पाहिजे, असे वाटते.

loading image