झंझावाताची ही ‘करुण’ कहाणी!

‘मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार’ हे ग. दि. माडगूळकर यांचे गीत कानी पडले की करुण नायर आठवतो.
karun nair
karun nairsakal
Updated on

‘मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार’ हे ग. दि. माडगूळकर यांचे गीत कानी पडले की करुण नायर आठवतो. आता या अजरामर गीताचा आणि करुण नायर याचा काय संबंध, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो; पण कधी कधी काही काव्य आणि संदर्भ चपखल असतात.

आयपीएल सुरू आहे आणि क्रिकेट विश्वातील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमरा याच्यासमोर भल्याभल्या फलंदाजांचे पाय थरथरतात, तेथे आयपीएलमध्ये तीन वर्षांनी पुन्हा खेळण्याची संधी मिळताच बुमराच्या गोलंदाजीची धुलाई करुण नायरने केली आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास वर्षभर सातत्याने कामगिरी करत असलेल्या करुण नायरचे नाव चर्चेत राहिले.

कारण करुणची ‘करुण’ कहाणी इतरांसारखी नाही. एक शतक केले, की सुरू असलेली मालिकाच नाही, तर पुढचा दौराही नक्की असतो, असे सर्वसाधारपणे समजले जाते; पण त्रिशतक केल्यानंतर पुढच्या सामन्यात वगळले जाणारा हा क्रिकेट विश्वातील दुसरा फलंदाज ठरला होता. या अगोदरचा फलंदाज हा १९३० मधला होता.

मुळात सुनील गावसकरांपासून सचिन तेंडुलकर आणि आताच्या विराट कोहलीपर्यंत हे फलंदाज, महान या पंक्तीतले; पण त्यांनाही त्रिशतक करता आलेले नाही. भारताकडून पहिला त्रिशक करणारा विरेंद्र सेहवाग आणि दुसरा करुण नायर.

इंग्लंडविरुद्ध चेन्नईत ३०३ धावांची केलेली ही खेळी करुण नायरसाठी मोठा बँक बॅलन्स निर्माण करणारी होती; पण त्यानंतरच्या पुढच्याच कसोटीत त्याला वगळले जाते आणि पुन्हा कधी कसोटी सामना खेळायची संधी मिळणार, याची चातकाप्रमाणे वाट पाहण्याची वेळ त्याच्यावर का येते, हे एक कोडेच!

२०१६ मधील तो प्रसंग होता. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा अशी त्यावेळी भक्कम मधली फळी होती. रहाणेला दुखापत झाली म्हणून करुणला संधी मिळाली होती; पण रहाणे तंदुरुस्त झाल्यामुळे करुणला त्रिशतक केल्यानंतरही बाहेर जावे लागले. म्हणून ‘कुणा मुखी लोणी पडावे’ याचा आनंदच असतो; पण लोण्याची चव चाखल्यानंतर लगेचच अंगार सहन करण्याची वेळ येणे हे दुर्दैवच.

एका खेळीने कोण सुपरस्टार होत नसतो, अगोदरच्या पुण्याईचे पारडे जड ठरवले जाते, हे सुद्धा तेवढेच सत्य. सातत्यालाही तेवढेच मोठे प्राधान्य असते; पण सातत्य दाखवायला पुन्हा संधी तर मिळायला हवी.

संघ रचना आणि नावाजलेल्या खेळाडूंची जागा यामुळे त्रिशतक केले म्हणून त्याची जागा निश्चितच केली पाहिजे, असेही नाही; पण शेवटी विश्वासात घेऊन आणि त्याचा हिरमोड होणार नाही, अशा पद्धतीत त्याची समजूत काढणे आणि आत्मविश्वास कायम ठेवणे हा महत्त्वाचा भाग असतो. यापैकी काय काय घडले हे करुण नायरलाच ठाऊक असावे.

करुणला लगेचच पुढच्या सामन्यांतून वगळले आणि नंतर बऱ्याच कालावधीनंतर त्याला पुन्हा संधी देण्यात आली; पण त्रिशतक केल्यानंतर वाढलेला आत्मविश्वास नंतर मिळालेल्या संधीच्या वेळी थोडीच कायम असणार? योग्य वेळी योग्य संधी मिळाली तरच कारकीर्द बहरत असते आणि एकदा का अस्तिस्त आणि प्रभुत्व सिद्ध केलं, की पुढचा मार्ग आपोआप तयार होतो.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या महान खेळाडूंनी अगोदर सिद्ध केलेले कर्तृत्व एवढं मोठं होतं, की मध्यांतराचा काळात अपयशाची मालिका लांबली तरी त्यांना वगळण्याचा विचार कोणी करत नव्हतं.

२०१६ मध्ये हा सर्वात मोठा चढ-उतार अनुभवल्यानंतर इतर कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत शस्त्र म्यान केली असती; पण त्या अनुभवातून कणखर झालेला करुण नायर लढत राहिला. मूळचा कर्नाटकमधला हा खेळाडू गुंडाप्पा विश्वनाथ आणि राहुला द्रविड यांसारख्या महान खेळाडूंना आदर्श मानून तयार झालेला.

त्याने देशांतर्गत क्रिकेट कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना गाजवलेही; पण नंतर तेथेही पुढचे भवितव्य निश्चित वाटत नसताना विदर्भ निवडला. विदर्भने प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपूर्वी दोन रणजी आणि एक इराणी करंडक जिंकला होता; पण आता पंडित नसतानाही गेल्या दोन वर्षांत उपविजेतेपद आणि यंदा विजेतेपद मिळवले आहे. यात अर्थात प्रत्येकाचा वाटा मोलाचा ठरला; पण करुण नायरचे योगदानही तेवढेच मौल्यवान आहे.

‘करुण इज बॅक’ ही केवळ शब्दाची कोटी म्हणून संबोधायचे नाही तर त्याने या देशांतर्गत मोसमात धावांचा रतीब घातलाय. रणजी क्रिकेट तर गाजवलेच; पण विजय हजारे या एकदिवसीय स्पर्धेत नाबाद ११२, ४४, १६३, १११, ११२ आणि १२२ अशा एकूण ६६४ धावा फटकावल्या. संपूर्ण स्पर्धेत नाबाद सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महान सर डॉन ब्रॅडमन यांच्याही नावावर नसावा.

जेथे भारतीय संघासाठी विचार होत नव्हता तेथे आयपीएलमध्ये कोण प्राधान्य देणार? गेल्या दोन आयपीएलमध्ये त्याला कोणीच आपल्या संघात घेतले नाही. या वेळी दिल्लीने त्याच्यासाठी अवघे ५० लाख मोजले; पण त्याच्यासाठी ही लाखमोलाची संधी होती. तीन वर्षांनंतर त्याला प्रत्यक्ष सामना खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच लढतीत त्याने बुमरावर प्रहार करून आता तरी आपल्यावर ‘करुणा’ दाखवा, असे आपल्या बॅटद्वारे खुणावले.

अशाच प्रकारचे दुसरे एक उदाहरण आहे ते म्हणजे न्यूझीलंडच्या एजाझ पटेलचे. त्याने तीन वर्षांपूर्वीच्या भारत दौऱ्यात मुंबईतील कसोटीत एका डावात १० पैकी १० विकेट मिळवण्याचा पराक्रम केला. ती मालिका तेथेच संपली होती. त्यानंतर न्यूझीलंड मायदेशात कसोटी मालिका खेळणार होते.

तेथे अर्थातच वेगवान गोलंदाजीसाठी पोषक वातावरण आणि खेळपट्ट्या. परिणामी, एजाझला मालिकेतूनच वगळण्यात आले; पण प्राधान्य मिळाले होते ते अष्टपैलू असलेल्या राचिन रवींद्र याला. योगायोग पाहा कसा असतो. काही महिन्यापूर्वी भारत-न्यूझीलंड मालिकेतील मुंबईत झालेल्या सामन्यात हाच एजाझ पटेल भारताच्या पराभवास कारणीभूत ठरला.

करुण नायरवर त्या वेळी झालेला अन्याय दूर करण्याची बीसीसीआयला आता संधी आहे. कारण आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात भारतावर दारुण पराभवाची नामुष्की आली ती फलंदाजांच्या अपयशामुळे.

सध्याची भारताची मधली फळी डळमळतेय. करुण नायरला त्रिशतकानंतर संधी मिळाली नाही कारण त्यावेळी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज होते. आता रहाणे आणि पुजारा वर्तुळाच्या बाहेर गेलेत. विराट कोहली आयपीएलमध्ये तोडफोड फलंदाजी करत असेल; पण कसोटी क्रिकेटमध्ये तो अपेक्षा पूर्ण करत नाहीये.

अशा वेळी करुण नायरचा दिलासा मिळू शकेल. मुळात रणजी क्रिकेट हा कसोटीचा पाया समजला जातो आणि या रणजीचे विजेतेपद मिळवणाऱ्या विदर्भाच्या यशात करुणचा वाटा सर्वाधिक असेल तर त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी प्राधान्याने संधी मिळायला हवी. अजित आगरकर यांची निवड समिती करुणा दाखवेल, ही अपेक्षा.

क्रिकेट विश्वातील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमरासमोर भल्याभल्या फलंदाजांचे पाय थरथरतात; पण आयपीएलमध्ये तीन वर्षांनी पुन्हा संधी मिळताच बुमराच्या गोलंदाजीची धुलाई करुण नायरने केली. आजवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरचे नाव चर्चेत राहिले, कारण त्याची ‘करुण’ कहाणी इतरांसारखी नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com