संवादी देहबोलीचा ‘शब्देवीण संवाद’!

भारत जोडो पदयात्रा म्हणजे फक्त एक ‘राजकीय कृती’ नाही.
criticize bharat jodo yatra congress rahul gandhi india politics
criticize bharat jodo yatra congress rahul gandhi india politicssakal
Summary

भारत जोडो पदयात्रा म्हणजे फक्त एक ‘राजकीय कृती’ नाही.

भारत जोडो पदयात्रा म्हणजे फक्त एक ‘राजकीय कृती’ नाही. बुद्धाचा काळ आणि मध्ययुगीन संत कवींच्या काळाशी साधर्म्य सांगणारी ही एक संतत्वभाव प्रगट करणारी कृती आहे. राहुल गांधी यांच्याकडे अनेक लहान मुले आकर्षित होतात आणि कुणीही संवाद साधू शकतात. सहज संवादातून या पदयात्रेचा एक ‘शब्देवीण प्रेमसंदेश’ लोकांपर्यंत सहजपणे प्रक्षेपित होत आहे. शब्दबोलीपलीकडे जाणारे, देहबोलीच्या माध्यमातून जनसंवादाचे हे अभियान आहे. म्हणूनच ही पदयात्रा ऐतिहासिक प्रयोग ठरत आहे.

- डॉ. गणेश देवी

रोजच्या रोज भारताच्या मुख्य प्रसारमाध्यमांमध्ये दिसणाऱ्या भारतापेक्षा भारत जोडो यात्रेत आपल्याला भिडणारा भारत खूपच वेगळा आहे. लहान लहान गावे आणि खेड्यांतील समाजजीवन खूपच वेगळे आहे. ही माणसे आणि त्यांचे जीवन संपूर्णपणे आत्मनिर्भर आहे. या भारतीयांचे जीवन कधीही मुख्य प्रसारमाध्यमातील बातमीचा विषय बनत नाही. कळमनुरी नावाच्या गावाचे हे उदाहरण पाहा. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २४ हजार ७०० इतकी आहे.

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यात असलेले कळमनुरी बाहेर फारसे कुणाला माहीत नाही. या गावाला स्वतःचा एक मोठा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा आहे. या गावाचे नाव कळमनुरी हे प्रसिद्ध सुफी संतांच्या नावावरून पडले आहे. नुरी बाबा या नावाने लोकप्रिय असलेल्या या सुफी संतांचा दर्गा कळमनुरीमध्ये आहे. सुफी संप्रदायाच्या इतिहासामध्ये या महत्त्वाच्या सुफी संतांचे नाव ‘हजरत सरकार सय्यद नुरीद्दीन नूरी शाहिद चिस्ती कलमनुरी’ असे नोंदलेले आहे. गेली सहाशे वर्षं नूरी बाबांचा दर्गा कळमनुरी येथे आहे. या दर्ग्याला ऐतिहासिक महत्त्व आणि प्रतिष्ठा आहे. गेल्या सहाशे वर्षांच्या इतिहासात या प्रदेशात अनेक राजवटी येऊन गेल्या; मात्र तरीही कळमनुरी दर्गा आजही सुरक्षित आणि दिमाखात उभा आहे.

कळमनुरीमधील सामान्य माणसांनी या दर्ग्याची प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपले आहे. कळमनुरी गावात विविध धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. शीख धर्मीयांसाठी पवित्र मानले गेलेले नांदेड शहर कळमनुरीपासून अगदी जवळ आहे; हजार वर्षांपूर्वी बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिलेला प्रदेशही या गावाच्या अगदी जवळच आहे. म्हणजेच कळमनुरीमध्ये मुस्लिम, शीख, लिंगायत, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि हिंदू अशा सर्व धर्मांचे नागरिक परस्परविश्वासाने आणि सलोख्याने नांदत आहेत. कळमनुरीत वेगवेगळ्या धर्मांच्या समाजांनी चालवलेल्या विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा, बगिचे आणि अन्य नागरी संस्था गावातील सर्वधर्मीयांसाठी खुल्या आहेत. सांगण्याचा मुद्दा कळमनुरीत कोणत्याही प्रकारचा धार्मिक किंवा जातीय भेदभाव दिसत नाही. या गावातील नागरिकांच्या रोजच्या बोलण्यात वेगवेगळ्या सूफी आणि हिंदू संतांच्या वचनांचा सहज वापर असतो. हिंगोली आणि आसपासच्या जिल्ह्यांतील अनेक पुरोगामी लेखक आणि नाटककारांनी फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधींच्या विचारांचा सातत्याने पुरस्कार केला. या प्रदेशातील नागरिकांची एकूण वैचारिक बैठक आणि पिंड कायमच पुरोगामी राहिला आहे.

अलीकडे कळमनुरी गावाचे नाव अचानक प्रसारमाध्यमात झळकले. राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ या गावात आली. यात्रेचा एक मुक्काम कळमनुरीत होता. यात्रेच्या निमित्ताने प्रसिद्ध कवी, कादंबरीकार श्रीकांत देशमुख आणि ज्येष्ठ विचारवंत दत्ता भगत यांनी कळमनुरी येथे ‘साहित्य दिंडी’चा कार्यक्रम आयोजित केला होता. पंढरपूरकडे दरवर्षी जाणाऱ्या वारीतील दिंडीसारखीच ही साहित्य दिंडी! महाराष्ट्रातील अनेक लेखक, नाटककार, साहित्यकार सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेमधील नागरी संस्थांच्या सहभागासाठी समन्वयकाची भूमिका माझ्याकडे होती. मी या साहित्यिकांची राहुल गांधी यांच्याशी भेट घडवून आणावी अशी विनंती त्यांनी मला केली होती. भारत जोडो यात्रेसाठी मी जेव्हा कळमनुरी येथे पोहोचलो, तेथील केंब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये साहित्य दिंडीसाठी आलेले अनेक साहित्यिक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते जमले होते. या शाळेची स्थापना डॉ. संतोष कल्याणकर आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीने केली होती.

परिसरातील शेकडो गरीब कुटुंबांतील मुले या शाळेत मोफत शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये वसतिगृहाची सोयही आहे. डॉक्टर कल्याणकर पती-पत्नीने आपल्या कामाची कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी आजवर केलेली नाही. डॉ. संतोष यांना राहुल गांधींना भेटायला आवडेल का, असे मी त्यांना विचारले असता त्यांनी ते मान्य केले. पण ते म्हणाले, की ‘मला माझं काम शांतपणे करत राहायला आवडते. मी माझे काम करतो, पण त्याबद्दल बोलायला मला आवडत नाही. तो माझा स्वभाव नाही.’ मी त्यांना विचारलं, की नूर दर्ग्याच्या मुजावरांना या भेटीसाठी आमंत्रित करू शकतो का? त्यांनी ताबडतोब आपले वाहन पाठवून दर्ग्याच्या मुजावरांना बोलावून आणले.

राहुल गांधींशी अर्थपूर्ण संवाद!

राहुल गांधींबरोबर दुपारी दोन वाजता भेट ठरली होती. त्यापूर्वी एक तास नियोजित तंबूमध्ये पोहोचणे आवश्यक होते. साहित्यिक आणि कार्यकर्त्यांच्या आमच्या पंचवीस सदस्यांच्या गटाचे स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आलेल्या सर्व साहित्यिक आणि कार्यकर्त्यांशी राहुल गांधी येण्यापूर्वी अतिशय आपुलकीने मनमोकळा संवाद साधला, हा सर्वांसाठी सुखद धक्का होता. ठरल्याप्रमाणे दोन वाजता राहुल गांधी आले. सकाळी पंधरा किलोमीटर पदयात्रा करून आलेल्या राहुल गांधींच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा दिसत नव्हता. ते अतिशय उत्साही आणि आनंदी वाटत होते. मी आमच्या गटातील सर्वांची ओळख करून दिली. आमच्यापैकी तीन लेखकांनी प्रतिनिधी स्वरूपात आपले विचार थोडक्यात मांडले. राहुल गांधींनी पुढाकार घेत नम्रपणे विचारले, की ‘माझे काही प्रश्न आहेत. मी विचारू का?’ राहुल गांधींचा प्रश्न होता उत्पादक श्रमांचे काम करणाऱ्या लोकांना संबोधित करण्यासाठी एक असा शब्द कोणता वापरता येईल? तुम्ही सर्व साहित्यिक, विचारवंत आहात. उत्पादक श्रम करणाऱ्या माणसांचा अपमान होणार नाही, उलट त्यांचा सन्मान वाढेल अशा शब्दाच्या मी शोधात आहे.

राहुल गांधी यांच्या या प्रश्नावर चांगलीच चर्चा सुरू झाली. श्रम करणाऱ्या लोकांसाठी वापरल्या जाणा‍ऱ्या भाषिक, सामाजिक संज्ञा आणि त्यांना जोडलेले सांस्कृतिक संदर्भ याविषयी अनेक मुद्दे पुढे आले. त्यांना संबोधित करणारे ‘दलित’, ‘बहुजन लोक’, ‘कामगार’ आणि जनता अशा अनेक शब्दांचा विचार झाला. या शब्दांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक अशा नेहमी वापरल्या जाणाऱ्या अनेक संज्ञांचाही विचार झाला. श्रम करणाऱ्या, उत्पादक श्रम करणाऱ्या समूहांसाठी ऐतिहासिकदृष्ट्या ‘श्रमण’ अशा प्रकारच्या संज्ञा वापरल्या जात होत्या. या समूहाच्या व्यतिरिक्त अन्य नागरिक समूहांसाठी ‘ब्राह्मण’, ‘प्रजा’ आणि ‘राजा’ अशा संज्ञा वापरात होत्या.

राहुल गांधींचा प्रश्न होता, की ‘आपण भारतातील उत्पादक श्रमात सहभागी असलेल्या बहुसंख्य नागरिकांना नेमंक्या कोणत्या संज्ञेद्वारे संबोधित करू शकतो? संबोधन असे हवे, की त्यामुळे या समूहाला आजवर नाकारली गेलेली सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. ही चर्चा इतकी रंगली, की आमच्या गटातील सहभागी साहित्यिक आणि कार्यकर्त्यांना आपण एका राष्ट्रीय पातळीवरील नेत्याशी चर्चा करत आहोत याचाही विसर पडला. सुमारे तासभर सुरू असलेल्या या चर्चेत राहुल गांधी आमच्यापैकी एक होऊन सहभागी झाले होते. राहुल गांधी हे अतिशय अभ्यासू, विचारी आणि चौफेर वाचन असलेले नेते आहेत.

त्यामुळे साहित्यिक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात ते मनापासून रंगून गेले होते. साहित्यिकांना राहुल गांधींबरोबर चर्चेसाठी आजच्या भारतातील परिस्थितीबाबत स्वतःचे मुद्दे मांडायचे होते; परंतु राहुल गांधीबरोबरची चर्चा एका वेगळ्याच पातळीवर रंगत होती. गटातील सदस्यसुद्धा चर्चेत रंगून गेले आणि आपल्याला काय मांडायचे होते हे विसरून गेले. चर्चेच्या शेवटी राहुल गांधींनी सर्वांबरोबर एकत्र फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे फोटो काढला गेला. त्यानंतर राहुल गांधींनी या गटाचा निरोप घेऊन ते पुढील गटाला भेटण्यासाठी निघाले.

कित्येक दिवस दररोज राहुल गांधी अशा प्रकारे पदयात्रेत चालत आहेत. मधल्या वेळात अनेक गटांना भेटत आहेत. लोकांशी बोलत आहेत. लोकांचे रोजचे जगणे समजून घेत आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या आकांक्षा काय आहेत हे जाणून घेत आहेत. आपल्या समाजाविषयी लोकांचे काय स्वप्न आहे आणि आपल्या देशात शांतता, सद्भाव कसा टिकून राहील, हे ते समजून घेत आहेत.

अशी ही पदयात्रा प्रत्यक्षात पार पाडणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी जबरदस्त शारीरिक क्षमता आवश्यक आहे. रोज लोकांबरोबर गटचर्चा आणि जाहीर सभा घेत राहणे, यासाठी प्रचंड मोठी मानसिक व शारीरिक ताकद आवश्यक आहे. राहुल गांधी आणि त्यांच्याबरोबर असलेले सहयात्री अतिशय आनंदाने, उत्साहाने पदयात्रा पार पाडत आहेत.

सूफींच्या परिभाषेत आपण म्हणू शकतो, की हे पदयात्री एक ‘नशा’ अनुभवत आहेत किंवा हिंदू संतांच्या भाषेत म्हणायचे तर ही पदयात्रा म्हणजे त्यांच्यासाठी एक ‘ब्रह्मानंद’ देणारा अनुभव आहे. राहुल गांधी यांच्या सहवासात एक प्रकारच्या आनंददायी अनुभुती लोक अनुभवत आहेत. ही पदयात्रा म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील परिवर्तन नाही! ‘भारत जोडो पदयात्रा’ म्हणजे भारतीय समाजात परस्परआदर, प्रतिष्ठा, समानता आणि सर्वांप्रती प्रेम या मूल्यांची पुनर्स्थापना करणारा महत्त्वाचा प्रयोग ठरत आहे. ही मानवी अभिनव मोहीम आहे.

भारत जोडो यात्रेचा आरंभ ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे झाला. त्या ठिकाणी मी स्वत: उपस्थित होतो. या कार्यक्रमात भारताचे संविधान आणि तिरंगा ध्वज मी ‘नागरी संस्थां’च्या वतीने राहुल गांधी यांना भेट दिला होता. कर्नाटकातील नागरी संस्थांच्या प्रतिनिधींची राहुल गांधी यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी मी समन्वयकाची भूमिका पार पाडली होती. तीच भूमिका मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातही पार पाडली. पदयात्रेच्या मार्गावरील महाराष्ट्र अवघड प्रदेशांपैकी एक होता. राहुल गांधींसह या पदयात्रेत चालणाऱ्या लोकांबरोबर माझे अनेक संवाद झाले.

पदयात्रेत आतापर्यंत मी खूप काही पाहिले. लोकांकडून खूप ऐकले. समाजमाध्यमांवर आलेल्या हजारो पोस्ट पहिल्या. राहुल गांधी पदयात्रेच्या मार्गावरील गावखेड्यांतील हजारो लोकांशी बोलले. हे सर्व मी प्रत्यक्ष बघितले आहे. या अनुभवावरून माझे ठाम मत झाले आहे, की भारत जोडो पदयात्रा म्हणजे फक्त एक ‘राजकीय कृती’ नाही. बुद्धाचा काळ आणि मध्ययुगीन संत कवींच्या काळाशी साधर्म्य सांगणारी ही एक संतत्वभाव प्रगट करणारी कृती आहे. राहुल गांधी केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत संवाद साधतात. अन्य कोणतीही भारतीय भाषा ते बोलत नाहीत. राहुल हे काही कवी नाहीत. अनेक लहान मुले त्यांच्याकडे आकर्षित होतात, कोणत्याही वयाच्या स्त्रिया राहुलबरोबर सहजपणे नाते जोडू शकतात आणि संवाद साधू शकतात. त्यांची ही विलक्षण देहबोली आहे, अचंबित करणारी क्षमता आहे. राहुल यांच्या वागण्याबोलण्यात कोणत्याही प्रकारचा सत्तेचा दर्प नाही. उलट राहुलबरोबरच्या सहज संवादातून या पदयात्रेचा एक ‘शब्देवीण प्रेमसंदेश’ लोकांपर्यंत सहजपणे प्रक्षेपित होत आहे. आजवर अशा प्रकारचे शब्दबोलीपलीकडे जाणारे, देहबोलीच्या माध्यमातून जनसंवाद संपर्क साधण्याचे उदाहरण समोर आले नव्हते. म्हणूनच ही पदयात्रा म्हणजे राहुल गांधींचा हा एक अनोखा ऐतिहासिक प्रयोग ठरत आहे.

भारत जोडो यात्रेतील भाषणे आणि शाब्दिक संदेश यामुळे ही पदयात्रा कोट्यवधी लोकांना स्पर्श करत नाही, तर पदयात्रेतील अशा शब्दातीत देहबोलीतून साधल्या जाणाऱ्या संवादामुळेच भारत जोडो पदयात्रेने देशातील कोट्यवधी जनतेच्या मनावर गारुड घातले आहे. कळमनुरीतील विविध धार्मिक समूहांनी गेली शतकानुशतके आपल्याला जो सामाजिक सलोख्याचा संदेश त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणाने दिला आहे, त्याच भाषेत भारत जोडो पदयात्रेचे मर्म सांगायचे, तर ही पदयात्रा भारताला जणू असे सांगत आहे, की ‘तुम्ही माना अथवा न माना, परंतु काळाच्या पटलावरील अक्षुण्ण भारत हाच आहे!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com