‘ॲन्टिना’वर बसलेला कावळा

काळ बदलला, माणसं बदलली आणि गावखेड्यांचं स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलत गेलं.
antenna
antennasakal
Updated on

काळ बदलला, माणसं बदलली आणि गावखेड्यांचं स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलत गेलं. एके काळी जिथं तांबडफुटीला गाई-बैलांच्या घुंगरांचे मंजुळ स्वर कानावर पडतच झोपेतून जाग यायची अन् त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचं झालं, तर एकदम ‘फ्रेश’ वाटायचं तिथे आता ट्रॅक्टरच्या आवाजाने जाग येते.

काही ठिकाणी धुळीने डांबरासोबतच स्वतःच्या अंगावर सिमेंटही ओतून घेतलं आहे, पण धुळीवर उमटलेल्या पावलांचे ठसे काळजाच्या गाभाऱ्यात नेहमीच उमटत राहतात. गाव बदलत आहे ह्याचा मला आनंद आहे. गावाने बदललंच पाहिजे.

काळासोबत चाललं पाहिजे अन् त्याचं हे बदलणं शहरी डोळ्यात खुपलं नाही पाहिजे. हां, फार फार तर ज्या गावात बालपण गेलं, त्या आठवणी जरूर जपाव्यात, पण स्वतः मात्र शहराच्या मिठीत राहून गाव फार बदललं म्हणून उगाच बोंब ठोकूत बसू नये.

नव्वदच्या दशकात मनोरंजनाची साधनं फार कमी होती, पण त्यातही फार मोठं समाधान असतं असं मानणारी माणसंही होती. मोठी माणसं रेडिओवर क्रिकेटचं ‘समालोचन’ ऐकत असत. अगदी सेल टाकून रेडिओ रानात घेऊन जाणारी हौशी मंडळीही होती.

आताच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब यामुळे प्रत्येकाच्या हातात मनोरंजन अगदी सहजतेने पोहोचलं असलं, तरी तो काळ असा होता की, घरात टीव्ही सोडा साधा रेडिओ असणंही फार मोठेपणाचं मानलं जात होतं. आमच्या गारखिंडी गावात सर्वांत आधी जो टीव्ही आला, तो ग्रामपंचायतीमध्ये. मग तो टीव्ही अशा पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये ठेवला होता की, बाहेरच्या बाजूने त्याचे तोंड केले होते अन् त्याला एक लाकडी दरवाजा बनवला होता. त्याला भलं मोठं कुलूप लावलेलं असायचं.

रविवारी सकाळी रामायण लागलं की, सगळ्या वाड्या-वस्त्यांतून लहान-थोर धावत पळत यायचे. पंचायतीच्या ओट्यावर सगळे शिपायची चातकासारखे वाट पहायचे. ‘तो साधा शिपाई असूनही त्याला फार ‘नुमुनुमू’ करावं लागतं,’ अशी गावातली माणसं म्हणायची. त्याला जर यायला उशीर झाला, तर तो जिथं कुठं असेल तिथून त्याला बोलवून आणायलासुद्धा जावं लागायचं.

सरपंचाएवढाच त्याला मान होता. एकतर ‘ब्ल्याक अँड व्हाईट’ टीव्ही अन् दिवसा जर तो पाहायचा म्हटलं, तर त्यातील चित्रे नीट दिसत नसत मग त्याचे तोंड पंचातीच्या खोलीच्या आतल्या बाजूने फिरवावे लागे तेव्हा त्यातील चित्रे नीट दिसत, पण तसे केल्याने छोट्याशा खोलीमध्ये सगळे इच्छुक गावकरी मात्र बसू शकत नसतं.

ज्याचा खूप दांडगा वशिला असेच लोक आत घेतले जायचे. बाकीच्या लोकांनी बाहेरच्या बाजूने कान देऊन फक्त संवाद ऐकायचे. त्या वेळी वाटायचं गावात अजून टीव्ही पाहिजे राव! पण तो फार उशिरा आला. गावातल्या काही श्रीमंत घरामध्ये टीव्ही आला, तेव्हा मात्र त्या घरापेक्षा आम्हाला जास्त आंनंद झाला होता.

त्या टीव्हीमुळे ते घरही आम्हाला खूप श्रीमंत वाटायचं. त्या टीव्ही वाल्याने आपल्याला टीव्ही पाहू द्यावा म्हणून कुणी टोमॅटो, कुणी आंबे, कुणी सीताफळे आणून त्या टीव्हीवाल्याला द्यायचे. त्याची घरातली पडेल ती कामे करायचे अन् हे केवळ फक्त टीव्ही बघता यावा म्हणूनच बरं का!

‘शेजारणीन बाई तुमचा टीव्ही आमच्या बाबूला पाहूद्या’ हे लग्नात सनईवर वाजणारं गाणं जणू काय माझ्यासाठीच लिहिलं होतं की काय, असं मला वाटायचं. मी ते गाणं म्हणत म्हणतच टीव्ही पाहायला जायचो. मला तर कधी कधी वाटायचं प्रदीप भिडेंसारखं आपल्यालाही टीव्हीत बातम्या सांगायला घेतलं पाहिजे.

माझा टीव्हीचा नाद पाहून ‘टीव्हीतल्या भवान्या आवा, मप्ल्या लेक्राला बिघडवीत्यात!’ असं आई नेहमी म्हणायची. तरीही मी जायचो. ज्यांच्या इथं टीव्ही पाहायला आम्ही पोरं पोरं बसायचो, त्या ठिकाणी फार अंग चोरून तोंडातून एकही शब्द न काढता गप बसून टीव्ही पाहावा लागे.

अगदी बसून बसून पाय अवघडून गेले, पायाला मुंग्या आल्या, तरी पाय पसरवण्याची आमची हिंमत होत नसे. एखादी म्याच पाहताना जोरदार षटकार मारला, तरी मोठ्यानं ओरडण्याची मुभा नव्हती. कारण एखादी छोटीशी चूक किंवा अगदी लहानसा ‘आगावपणा’ जरी एखाद्याकडून झाला, तरी त्याला संबधित टीव्हीवाला पुन्हा घरात घेत नसे मग तिथून पुढे दरवाजाच्या फटीतून एका डोळ्याने टीव्ही बघावा लागे.

त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर ‘मुंग्या’ आल्या अन् चित्रं दिसायचं बंद झाली तर कुणी तरी धावत जाऊन शिडी लावून माडीवर चढायचे. खरं तर ती शिडी तिथंच लावून ठेवलेली असायची. वर जाऊन ‘ॲन्टिना’ हलवायचा आणि बाकीच्यांनी ‘फिरव इकडं, फिरव तिकडं’ म्हणून खालून त्याला मार्गदर्शन करायचं.

अशा मुंग्या आल्या की, लोकं म्हणायची ‘ॲन्टिनावर कावळा बसला का काय?’ एवढे उद्योग करून टीव्ही नीट पाहता येत नसे, कारण त्या काळात विजेचा लपंडाव खूप जास्त चालत होता. छायागीत, चित्रहार, गोट्या, सुरभी, आमची माती आमची माणसं ह्या व इतरही मालिका बघितल्याच पाहिजेत असा काही नियम होता की काय माहीत, पण झाडून सारा गाव टीव्हीसमोर बसत असे. तेवढंच मनोरंजन, तेवढाच विरंगुळा असायचा रानात राबणाऱ्या लोकांना!

मग आदल्या दिवशी टीव्हीवर पाहिलेल्या त्या गाण्यांवर मुलं-मुली झाडाखाली बसून, गुरांकडे गेल्यावर त्या गाण्याच्या ओळी गुणगुणायची. टीव्हीवरील कार्यक्रमांव्यतिरिक्त गावात कधीतरी कुणाच्या तरी पोराच्या ‘पाचवीला’ किंवा एखाद्या जत्रेला रंगीत टीव्ही आणला जाई. त्यासोबत ‘व्हीसीआर’ असे. त्यावर मराठी, हिंदी सिनेमे दाखवले जात.

रात्र रात्र जागून असे सिनेमे पाहणे म्हणजे गावातल्या लोकांसाठी बोनस मिळाल्यासारखे असे. घरूनच पोतडी, जुन्या गोधड्या सोबत नेऊन त्यावर ठाण मांडून खूप आवडीने अन् तन्मयतेने लोकं सिनेमे पाहत. त्यानंतर त्यावर अनेक दिवस चर्चा चाले. ‘व्हीलन’ लोकांना खूप शिव्या दिल्या जात. विहिरीवर बायका पाणी भरताना हळहळत. माहेरची साडी पाहून अनेक बाया गळ्यात पडून रडत. असे ते दिवस होते.

गेल्या काही दशकांत गावंही बदलली. जिथं एखाद-दुसरा टीव्ही असायचा आता तिथं घराघरावर ‘डिश’ दिसते आहे. त्याचाच जोडीला प्रत्येकाच्या हातात ‘स्मार्ट फोन’ आहे. काळ कितीही बदलला, तरी गावखेड्यांची खरी ओळख कधीच बदलू शकत नाही - ती म्हणजे प्रेम, आपुलकी आणि मातीतली नाळ.

अजूनही गावच्या मातीत तीच ओल आहे. आता प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्ट फोनमध्ये टीव्ही आलाय तरीही ‘ॲन्टिनावर बसलेला कावळा’ हाकलून देऊन ‘ब्ल्याक अँड व्हाईट’ टीव्ही पाहण्यात जो आनंद होता तो कधीच विसरता येत नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com