गोष्ट सायकलची

आ मचे गाव तसे दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर; पण हा जुना जिल्हा मार्ग. अगदी अलीकडच्या काळातही सांगलीहून साताऱ्याला या रोडने कोणी जात नाही.
cycle history recent times bicycles have come back into limelight health
cycle history recent times bicycles have come back into limelight health sakal
Summary

आ मचे गाव तसे दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर; पण हा जुना जिल्हा मार्ग. अगदी अलीकडच्या काळातही सांगलीहून साताऱ्याला या रोडने कोणी जात नाही.

एकेकाळी गावात एक-दोघांकडे सायकल असणे, नंतर गावात प्रत्येक घरात सायकल असणे आणि हळूहळू लोकांच्या नियमित वापरातून सायकल जाऊन मोटरसायकल येणे ही स्थित्यंतरे आहेत. अलीकडच्या काळात सायकल पुन्हा चर्चेत आली आहे.

सायकलीवरून सकाळी व्यायाम करणारे अनेक जण आपापले अनुभव सांगत असतात. आता भारी किमतीच्या सायकलीसुद्धा आल्या आहेत. या सगळ्या सायकलीच्या गोष्टी ऐकून माझ्या आठवणीतील सायकल आठवली.

आ मचे गाव तसे दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर; पण हा जुना जिल्हा मार्ग. अगदी अलीकडच्या काळातही सांगलीहून साताऱ्याला या रोडने कोणी जात नाही. गेल्या तीस वर्षांपूर्वीही हा रस्ता तसा कमी वाहतुकीचाच.

आडवळणी असा. सकाळी साडेसहा वाजता येणाऱ्या पहिल्या गाडीने गावातून वाहतूक सुरू व्हायची. नंतर दिवसभर तास-दीड तासाने एसटी बस यायची. शेवटची गाडी रात्री आठ वाजता आली की पुन्हा हमखास सांगता येईल, असे कोणतेही वाहन गावाकडे यायचे नाही. ही परिस्थिती आम्ही महाविद्यालयात होतो तोवरची.

अशा गावात त्या काळात पर्यायी वाहतुकीचे साधन म्हणून सायकल आली. गावात आलेली पहिली सायकल बघायला लोक रस्त्यावर गर्दी करत असत. भारतभर प्रसिद्ध पावलेले आमच्या गावचे वयोवृद्ध सायकलस्वार गणपती बाळा यादव हे याबाबतची आठवण नेहमी सांगत.

गावात सायकलीसुद्धा फार कमी होत्या. अगदी संपूर्ण गावात मिळून दहा-बारा. ज्यांच्याकडे सायकली होत्या त्यांचा एक वेगळा रुबाब होता. गावात काही दुर्घटना घडली तर त्यांच्या सायकलीवरून जाऊन ती बातमी आसपासच्या खेड्यात पोहोचवली जाई.

लग्न पत्रिका पोहोचवायलासुद्धा सायकलस्वार लोक मदतीला येत असत. कोणी आजारी पडले तर शेजारच्या गावाला जाऊन डॉक्टरांना सांगावा देण्याचे कामही तेच लोक करत. या सगळ्या आम्ही ऐकलेल्या गोष्टी.

मी दहावीत असेपर्यंत सायकल असणे ही गोष्ट अगदी सांगण्याची गोष्ट होती. नंतर पुढे या सायकलीचा एक छंद लागला. आसपासच्या कुंडल, देवराष्ट्र, विटा पलूस गावांना जाणे व्हायचे. एसटीची वाट पाहात बसण्यापेक्षा सायकलीवरून जाणे सोयीचे वाटायचे.

थोडा उशीर झाला तर मग वाटेत पाहुण्यांच्या घरी जाऊन मुक्काम करण्यात आनंद होता. आजच्यासारखे अगोदर सांगून पाहुण्यांकडे जायची पद्धत नव्हती. अचानक दारात आलेला पाहुणा पाहून त्यांनाही आनंद व्हायचा. सकाळी लवकर उठून चहा घेतला, की पुन्हा गावाच्या दिशेने प्रवास सुरू.

आम्ही फारफार तर जिल्ह्यापर्यंत सायकलीने प्रवास केला; पण आमच्या पिढीच्या आधीचे लोक अगदी कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत प्रवास करत. काही कार्यक्रम असतील, कुस्त्या असतील तर गावातील सात-आठ लोक आपापल्या सायकली घेऊन बाहेर पडत.

दोन-तीन दिवसांनी परत येऊन गावातील लोकांना त्यांनी पाहिलेली गावे, बघितलेली माणसे, वेगळे अनुभव सांगत. गावातील लोकांपर्यंत बाहेरची माहिती अशी पोहोचत असे. आमच्या गावातील काही लोक दरवर्षी पंढरपूरला सायकलवरून जात असत.

सकाळी लवकर गावातून बाहेर पडत, रात्री उशिरा पंढरपूरला पोहोचत. पाच-सहा दिवस थांबून पुन्हा गावाकडे येत. गावातील अशी मोजकी माणसे सायकलवाली होती, नंतर गावात घरोघरी सायकली आल्या. सायकल हे सर्वांना परवडेल असे वाहन झाले. त्याच काळात माझ्याकडे सायकल आली.

आमच्या गावात दत्तजयंतीला सायकलीच्या शर्यती होत. पाच किलोमीटरवरून सायकली येत. जवळजवळ दहा वर्षे दरवर्षी सायकलीच्या शर्यती होत. आमच्या गावातील गोरखनाथ कुंभार यांचा दरवर्षी पहिला क्रमांक येई. आसपासच्या गावात आणि अगदी जिल्हास्तरावर जाऊन त्यांनी सायकलशर्यतीत बक्षिसे मिळवली होती.

त्यांच्याकडे असलेल्या सायकल चालवण्याच्या कौशल्याने त्यांचे सर्वत्र नाव झाले होते. नंतर त्यांनी सायकलीच्या शर्यतीत भाग घेणे बंद केले; पण सायकल चालवणे बंद केले नाही. आजही ते सायकलीवरून प्रवास करतात. त्याचदरम्यान आमच्या गावातील वसंत गवळी हा तरुण सायकलीवरून मुंबईला गेला होता.

त्या काळात जुन्या रोडने मुंबईला जाण्यासाठी बारा-पंधरा तास लागायचे. त्यामुळे मुंबई खूप दूर वाटत होती. त्याकाळी आपल्या गावातील एक तरुण मुंबईला सायकलीवरून जाऊन परत आला, या गोष्टीचे अप्रूप वाटत होते.

गावात एक दोघांकडे सायकल असणे, गावात प्रत्येक घरात सायकल असणे आणि हळूहळू लोकांच्या नियमित वापरातून सायकल जाऊन मोटरसायकल येणे ही स्थित्यंतरे आहेत. आमच्या पिढीने सायकलचे दिवस अनुभवले आहेत. ग्रामीण भागात बातमीदार म्हणून काम करताना मला सायकलीने खूप साथ दिली आहे.

बातम्यांच्या शोधात जाणे, आसपासच्या गावाचा इतिहास, भूगोल समजून घेणे. गावात घडलेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सायकल हेच प्रभावी वाहन होते. त्या काळात मीच नाही, तर अनेक ग्रामीण पत्रकार सायकल वापरत असत. तेव्हा मुख्य रस्तेच डांबरी होते. बाकी ओबडधोबड, खड्डे असलेले.

आमच्या गावाहून वीस किलोमीटर असलेल्या धनगाव या गावी साहित्य संमेलन होते. रा. रं. बोराडे अध्यक्ष होते. या संमेलनासाठी मी सायकलीवरून गेलो होतो. आम्हाला त्यांचा ‘धुणं’ हा धडा होता. ज्यांचा धडा आपल्याला आहे, त्या लेखकाला जवळून पहावे, त्यांचे भाषण ऐकावे म्हणून माझ्यासारखा एक शाळकरी मुलगा सायकलीवरून गेला होता.

पुढे काही वर्षांनी मी लिहायला लागलो. माझे लेख वाचून बोराडे सरांनी एक दिवस मला फोन केला. लिखाण आवडल्याचे कळवले. तेव्हा मी सरांना धनगाव साहित्य संमेलनाची आठवण सांगितली. ती ऐकून सरांना खुप आनंद झाला. पुढे एक दोन ठिकाणी बोलताना, ‘हा मुलगा सायकलीवरून संमेलनाला आला होता,’ असे त्यांनी सांगितले.

आता सगळेच दिवस बदलले आहेत. ज्या गावाला जायला दिवस दिवस लागायचा तिथे पोहोचायला अर्धा तास आणि परत यायला अर्धा तास. गतिमान वाहने आली आहेत. तीस किलोमीटरवर जर पाहुणा असेल तर एका दिवसात परत येणे तेव्हा शक्य नसायचे.

मग मुक्काम व्हायचा. या मुक्कामात गप्पागोष्टी व्हायच्या, सुखदुःख सांगितली जायची. आज मुक्काम करणारा पाहुणा येणे बंद झाले आहे. लोकांना वेळ नाही, सगळे व्यस्त झालेत. वेळ वाचवत आहेत; पण या वाचणाऱ्या वेळेचे आपण काय करतो हेही एकदा समजावून घेणे गरजेचे आहे.

आज सायकल गरज नाही तर फॅशन बनली आहे; पण हीच सायकल कधी काळी दुर्मिळ गोष्ट होती. नंतर ती आवश्यक बनली. या सायकलीने अनेक गावं जोडली. माणसं जोडली. नवी माहिती गावात आणली. सायकल आणि तिच्या गोष्टी, अनुभव सांगावे असेच आहेत.

सायकल ही गावाच्या विकासाचा एक अविभाज्य भाग बनली होती. आज नवनवीन सायकली येत आहेत; पण ती साधी सायकलच आपल्याला आठवत राहते आणि तिच्या गोष्टी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com