esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग- बुधवारः निज आश्विन कृष्ण 11, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 3.25, चंद्रास्त दुपारी 3.13, रमा एकादशी, भारतीय सौर कार्तिक 20 शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग-


बुधवारः निज आश्विन कृष्ण 11, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय 6.40, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय पहाटे 3.25, चंद्रास्त दुपारी 3.13, रमा एकादशी, भारतीय सौर कार्तिक 20 शके 1942.

दिनविशेष - 


1675 - शिखांचे नववे गुरू तेगबहादर यांचा औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात वध केला. त्यांचे वधस्थान सीसगंज गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र झाले आहे. त्यांनी विविध विषयांवर 116 पदे रचली होती.

1851 - विद्वान, समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. ज्ञानाच्या क्षेत्रात ते मोठे प्रज्ञावंत होते. शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी 1884 मध्ये बॉंबे हायस्कूल व पुढे स्वावलंबनाने मराठा हायस्कूल काढले. हिंदुधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. त्यांची चाळीसच्या वर पुस्तके त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाली.

ं1866 - रसाळ लावण्या लिहिणारे तमाशा क्षेत्रातील नामवंत शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. स्वतःचा फड उभा करून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव या नावाने ते म्हणू लागले. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायल्या जातात.

1872 - किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरू अब्दुल करीम खॉं यांचा जन्म.

1888 - थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म. त्यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

1924 - भारतीय अर्थकारणाचे शिल्पकार डॉ. इंद्रवदन गोवर्धनदास ऊर्फ आय. जी. पटेल यांचा बडोदा येथे जन्म. अर्थमंत्रालयात सचिव, सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाचे उपप्रशासक म्हणून आयजींची नियुक्ती झाली. 1977 मध्ये ते रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोठ्या रकमेच्या नोटा चलनातून काढल्या, तसेच रिझर्व्ह बॅंकेमार्फत सरकारी सोन्याचा लिलाव सुरू केला. सहा खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, प्राधान्य क्षेत्राला कर्ज, डिपॉझिट इन्शुरन्स व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे विलीनीकरण व रिझर्व्ह बॅंकेची पुनर्रचना हे सगळे त्यांचे निर्णय होते. 1984 मध्ये ते प्रख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सचे संचालक झाले. हे पद भूषविण्याचा मान मिळवणारे ते एकमेव भारतीय. सात वर्षे ते या पदावर होते ब्रिटिश साम्राज्याचा नाइटहूड हा मानाचा किताबही त्यांना मिळाला.ग्लिंप्सेस ऑफ इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी व ऍन एन्काउंटर विथ हायर एज्युकेशन ः माय इयर्स ऍट एल.एस.ई. ही त्यांची पुस्तके गाजली.

1947 - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले करण्यात आले.

1997 - चित्रपट व नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते यशवंत दत्त ऊर्फ यशवंत दत्तात्रय महाडिक यांचे निधन.

1999 - कोल्हापूर येथील ख्यातनाम चित्र-शिल्पकार आणि कला निकेतन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य अरविंद मेस्त्री यांचे निधन.

2002 - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक व "झील" गाणारे जी.मल्लेश यांचे निधन. "कसं काय पाटील बरं हाय का", "सोळावं वरीस धोक्‍याचं' यातील त्यांची झील विशेष गाजली.

2004 - पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्याचे प्रतीक ठरलेले ज्येष्ठ नेते आणि स्वायत्त पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत यांचे पॅरिसमध्ये निधन. त्यांना 1994 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरविले होते.

आजचे दिनमान


मेष - नवीन परिचय होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ - नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन - तुमची मते इतरांना पटवून द्याल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

कर्क - कौटुंबिक सौख्य लाभेल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.

सिंह - उत्साह व उमेद वाढेल. कुटुंबासाठी खर्च होईल.

कन्या - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

तुळ - नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

वृश्‍चिक - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनु - मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संधी मिळतील.

मकर - राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ - जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.