
डॅशकॅम
esakal
एकेकाळी परदेशात अत्याधुनिक वाहने पाहून अचंबित होणाऱ्या भारतीयांच्या दारातच आता एकाहून एक सरस तंत्रज्ञानयुक्त वाहने उभी राहत आहेत. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात भर पडत असून, प्रामुख्याने कंपन्यांकडून प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. अलीकडच्या काळात वाहनांना जोडले जाणारे डॅश आणि रिअर कॅम फीचर आपत्तिकाळात साह्यभूत ठरत आहे. ‘तिसरा डोळा’ म्हणून भूमिका वठविणारा डॅश कॅम वैयक्तिक पातळीवरच नाही, तर पोलिस, विमा कंपनी आदींसाठीही मोलाचा ठरत आहे.
पूर्वी गाडी पार्क करताना किंवा वाहनतळाबाहेर काढताना चालकाला मदतनिसाची गरज भासायची. आता चालक आरशात न पाहता रिअर कॅमच्या मदतीने आरामात गाडी पार्क करू शकतो. दुसरीकडे डॅश कॅमच्या मदतीने वाहनांची सुरक्षितता जोपासली जात आहे. अचानक समोर येणारे पादचारी, उलट्या दिशेने येणारे सायकलस्वार, लेन तोडून येणारे वाहन या स्थितीत चालकाला प्रसंगी गंभीर आव्हांनाना सामोरे जावे लागते. काहीवेळा अपघात होण्याचीदेखील शक्यता असते. अशावेळी डॅशकॅमचे फीचर चालकाला दुर्घटनेपासून किंवा नंतरच्या कटकटीपासून वाचविण्याचे काम करू शकते.