स्वामी विवेकानंद आणि हिंदुत्व

सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकवला. हे आपल्या मनावर वज्रलेप करण्यात आलंय आणि ते शतप्रतिशत खोटे आहे.
Swami Vivekanand
Swami VivekanandSakal

डॉ. अनिर्बान गांगुली यांच्या `नवा भारत’या सदरातील (१९ सप्टेंबर) ‘विवेकानंदाचे विचार आणि देशाची वाटचाल’ या लेखात विवेकानंदाच्या हिंदुत्वाविषयी काही विचार त्यांनी मांडले होते. त्यातल्या मुद्द्यांचा प्रतिवाद ...

सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकवला. हे आपल्या मनावर वज्रलेप करण्यात आलंय आणि ते शतप्रतिशत खोटे आहे. सर्वधर्म परिषद ही त्यावेळच्या अमेरिकेतील सर्वात मोठी घटना होती. तीन वर्षे त्याची तयारी सुरू होती. प्रत्येक धर्माला फार काटेकोरपणे आपापल्या धर्माचा प्रतिनिधी निवडण्यास सांगितले होते. निवडलेल्या प्रतिनिधीचा येण्याजाण्याचा खर्च, पंचतारांकित निवास आणि भोजन त्याशिवाय भरपूर मानधन अशी सारी रचना होती. - मात्र कोणत्याही शंकराचार्यानी संयोजकांच्या पत्राला साधे उत्तर सुद्धा पाठविले नव्हते. एकतर परिषद यवनी भाषेत होती. देवभाषेत नव्हती. त्याहूनही भयंकर म्हणजे वाटेत हिंदू धर्म बुडविणारा समुद्र प्रवास होता! हा हिंदूधर्म बुडविण्याचा डाव आहे हे साऱ्या शंकराचार्यांनी ओळखले होते. विवेकानंदांनी आमंत्रण नसताना, कसेबसे पैसे गोळा करून तेथे जाणे म्हणजे खेड्यातील जत्रेत चमकदार कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानाने परदेशात कोठेतरी ऑलिंपिक नावाचे सामने आहेत असे ऐकावे आणि तेथे जावे असे होते. - सर्वधर्म परिषदेच्या स्वागत कक्षातून खिल्ली उडवून विवेकानंदांना परत पाठविले होते. विवेकानंदांनी हे आमंत्रण कसे मिळविले हा एक विलक्षण प्रकार आहे.

ही सर्वधर्म परिषद ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी सुरू झाली. पहिल्या दिवशी तीस वक्ते बोलणार होते. म्हणजे, प्रत्येकाला दिलेला वेळ होता पाच मिनिटे ! त्या पाच मिनिटात मी कोणत्या धर्माचा प्रतिनिधी आहे व तो धर्म काय सांगतो येवढेच त्याने सांगावयाचे होते. आपणासमोर येते ते त्या पाच मिनिटात त्यांनी केलेले भाषण. ते सुद्धा विस्कळीत स्वरूपात ! मात्र ही सर्वधर्म परिषद एकूण सलग सतरा दिवस होती. या सतरा दिवसात विवेकानंद पुन: पुन्हा काय सांगत होते ते ''बोस्टन इव्हिनिंग ट्रान्स्क्रिप्ट''च्या ३० सप्टेंबरच्या अंकात आहे. ती बातमी त्यांच्या प्रतिनिधीने २३ सप्टेंबरला पाठविली आहे. ती अशी आहे ‘विवेकानंदांची भाषणे आकाशाएवढी व्यापक स्वरूपाची आहेत. सर्व धर्मातील सर्वोत्कृष्ट तत्त्वांचा ज्यात समावेश आहे अशा विश्वधर्माची त्यांच्या मनात कल्पना आहे. सर्वात महत्त्वाचे आहे ते २८ सप्टेंबर रोजी समारोपाच्या समारंभात त्यांनी केलेले भाषण. त्यात त्यांनी सांगितले ''सर्वधर्म एक आहेत. अध्यात्म म्हणजे पावित्र्य, चित्तशुद्धी, दया आणि हे सर्वधर्माचे मूलभूत आधार आहेत. माझा विश्वास आहे की सर्व धर्माच्या ध्वजावर लवकरच लिहिले जाईल-संघर्ष नको. परस्परांना सहाय्य करा. एकमेकांना आत्मसात करा. विनाश करू नका. कलह नको मैत्री हवी शांती हवी.'

विवेकानंदांच्या या अशा मांडणीमुळे हिंदू धर्माने विवेकानंदांना पूर्णपणे नाकारले होते. २० जून १८९४ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून त्यांनी आपली खंत व्यक्त केली. आपल्या पत्रात ते लिहितात. ''मी अमेरिकेत येऊन नऊ महिने पूर्ण झाले मात्र अजूनही मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे असे अमेरिकन लोकांना स्पष्टपणे सांगण्याचा शंकराचार्यांनी, मठाधिपतींनी, हिंदू संघटनांनी काहीही प्रयत्न केलेला नाही. उलटपक्षी हे लोक अमेरिकन लोकांना सांगत आहेत, की मी अमेरिकेत आल्यावर सन्याशाची वस्त्रे धारण केलेली आहेत आणि मी एक भोंदू माणूस आहे.''

मराठी माणसांना आवडेल अशा शब्दात सांगावयाचे तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक भेदक अशी हिंदू धर्माची चिरफाड करीत विवेकानंद उभे होते. ७ ऑगस्ट १८८९ रोजी पूज्यपादांना पत्र पाठवून त्यांनी कळविले ''आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जातीव्यवस्था वंशगत मानलेली आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तसेच स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांच्यावर आणि अमेरिकेतील लोकांनी तिथल्या निग्रोच्यावर जेवढे अत्याचार केलेले आहेत त्यापेक्षा अधिक अत्याचार आपण आपल्या देशातील शूद्रांच्यावर केलेले आहेत. आणि शूद्रांना वेदाध्यायनाचा आधार नाही याबद्दल वेदांचे प्रमाण शंकराचार्य कोठेच देऊ शकलेले नाहीत.

विवेकानंद अर्थातच सर्व धर्मांबाबत परखडपणे त्यांची मते मांडत होते. ७ जून १८९६ रोजी कुमारी मार्गारेट नोबल म्हणजे नंतरच्या भगिनी निवेदिता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले. ''आपल्या समोरची खरी अडचण समजावून घ्या. आज जगातील सर्वधर्म निर्जीव विडंबनाच्या रूपात उरलेले आहेत. सर्व धर्मांना आज जळजळीत शब्दांची आणि त्याहूनही जळजळीत अशा कृतीची गरज आहे. त्यापूर्वी २१ मार्च १८९५ रोजी श्रीमती सारा ओली बूल यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलंय, ''ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान ही धर्मांची नावे आज माणसामाणसात बंधूभाव निर्माण करण्याऐवजी शत्रूभावना निर्माण करताहेत. या शब्दांच्या मधील शुभ शक्ती आता पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. आज या शब्दांच्या प्रवाहामुळे चांगली चांगली माणसे सुद्धा सैतानाप्रमाणे वागतात. आटोकाट प्रयत्न करून आपल्याला यश मिळवायचंय.''

विवेकानंद सुरवात अर्थातच हिंदू धर्मापासून करतात. हे कसे करता येईल, कसे करावे याबाबत त्यांनी अनेक पत्रांमधून आपल्या शिष्यांना आणि गुरूबंधूंना मार्गदर्शन केलंय.

सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंदांनी आपल्या गुरू बंधूंना पाठविलेली पत्रे अधिक भेदक आणि दाहक आहेत. शशी हा त्यांचा वराहनगर मठातील गुरूबंधू. तो श्रीरामकृष्णांचा सर्वात आवडता होता. म्हणून त्यांना श्रीरामकृष्णानंद असेही म्हणतात. त्यांना १९ मार्च १८९४ रोजी अमेरिकेतून पत्र पाठवून त्यांनी कळविले. ‘ जो गरिबांचे दु:ख दूर करत नाही त्याला काय म्हणून धर्म म्हणावे? दक्षिण भारतात उच्च जातीच्या लोकांकडून खालच्या जातीच्या लोकांच्यावर होणारे भयावह अत्याचार मी पाहिलेत. त्यांच्या स्त्रियांना देवदासी म्हणून मंदिरात नाचवले जाते. आपल्या धर्मातील थोर थोर आचार्य गेली दोन हजार वर्षे अन्न डाव्या हाताने खावे की उजव्या? गंध उभे लावावे की आडवे? असल्या महान धार्मिक प्रमेयांची चर्चा करत बसलेत. कोटी-कोटी लोक अर्धनग्न आणि अर्धपोटी आहेत. आणि मंदिरात आणि मठात पंचपक्वानांचे आकंठ जेवण कायम सुरू आहे. - याला देश म्हणावे की नरक? हा काय धर्म आहे की हे आहे सैतानाचे तांडव?

१९ नोव्हेंबर १८९४ रोजी मद्रासमधील आपल्या सर्व शिष्यांना उद्देशून त्यांनी जे पत्र पाठवले त्यात त्यांनी लिहिले ''जो देव गरीबांना माझ्या देशात अन्न देऊ शकत नाही तो स्वर्गात मला अनंत सुखात ठेवेल यावर विश्वास ठेवू नका. भारताचा उद्धार करावयास हवा. गरिबांना पोटभर अन्न आणि शिक्षण द्यावयास हवे. पुरोहितगिरी नष्ट करावयास हवी. पुरोहितांचा अत्याचार नको. सामाजिक जुलूम नको. प्रत्येकाला पोटभर अन्न आणि जीवनात पुढे जाण्याची समानसंधी मिळावयास हवी.''

जानेवारी १८९५ मध्ये आपले गुरूबंधू राखाल यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले ‘सगळ्या तपांचे, व्रतवैकल्यांचे व आध्यात्मिक साधनेचे थोडक्यात सार असे आहे की, मी पवित्र आहे आणि बाकी सारे जग अपवित्र आहे! हा शुद्ध पाशवी, सैतानी, नरकवत् धर्म होय. ''जर बटाट्याचा वांग्याला स्पर्श झाला तर किती वर्षांनी ब्रह्मंड रसातळाला जाईल?'' ''हात स्वच्छ करण्यासाठी दहा बारा वेळा जर माती हातांना चोळली नाही तर पूर्वजांच्या चौदा पिड्या नरकात जातील की चोवीस?'' असल्या गहन शास्त्रीय प्रश्नांची उत्तरे शोधत शास्त्री पंडीत मग्न आहेत. आणि या देशातील एकचतुर्थांश माणसे भुकेने तडफडून मरताहेत. आठ वर्षाच्या कोवळ्या मुलीचा तीस वर्षाच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. आणि या विवाहाबाबत आईवडिलांना आनंद होतोय. आणि आम्ही याला विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवताय असे म्हणतात- अरे, मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजात कसला आलाय धर्म?''

मात्र धर्म सुधारणेचे आपले हे प्रयत्न अजिबात उपयोगाचे नाहीत याची वेदनादायी जाणीव त्यांना झाली असावी. म्हणून १८९६ मध्ये त्यांनी २७ एप्रिलला लंडन येथून आपल्या अलमबझार मठातील गुरूबंधूंना पत्र पाठवून त्यांनी कळविले ''आपले देव आता जुने झालेत. आता आपल्याला नवे देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे कारण आपणाला नवाभारत घडवावयाचा आहे. आणि बेलूर मठ स्थापन करत असतांना ५ मे १८९७ रोजी धीरामाता यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले आजचा हिंदूधर्म जो अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे, तो दुसरे तिसरे काही नसून अवकळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे, हे आपण हिंदूना समजावून देऊ शकलो, तर तो न कुरकुरता टाकून देणे त्यांना सोपे जाईल.''

विवेकानंदांनी भारतात परत आल्यावर त्यांच्या स्वप्नातला बेलूर मठ स्थापन केला. त्यावेळी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकाने फुटक्या कवडीचीही मदत केली नाही. सारे पैसे हेनरिटा मुल्लर या त्यांच्या इंग्लंडमधील मैत्रीणीने दिले बेलूर मठाचे सभासद होतांना धर्म, पंथ, जात, लिंग, राष्ट्रीयत्व यातील कोणतीही गोष्ट विचारात घेतली जाणार नव्हती. सर्व धर्मातील धर्मग्रंथांच्या बरोबरच विदेशातील तत्त्वचिंतकांची तत्त्वज्ञानावरील पुस्तके तेथे होती. महत्त्वाचे म्हणजे ''एनसायक्लोपिडिया ब्रिटानीका''चे सर्व नवे खंड तेथे नियमितपणे येत होते. ''वाचाल तर वाचाल'' आणि ''ज्ञान हा जीवनाचा पाया आहे'' असे सांगत बेलूर मठ आकार घेत होता. - त्यामुळे हा मठ नाही, असा मठ असूच शकत नाही. हे विवेकानंदांचे आरामगृह आहे म्हणून त्याच्यावर भला मोठा कर बसविला. हा कर रद्द व्हावा म्हणून विवेकानंदांना कोर्टाची पायरी चढावयास लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com