खरी वाटत नाही... पण शतप्रतिशत खरी गोष्ट

‘आपण एवढे सिनिक झालोय का?’ माझा एक अगदी जवळचा मित्र ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी ’ हे शीर्षक वाचून म्हणाला, हे म्हणजे ‘एक होता गोरा निग्रो’ असं काहीसं झालं !
book
booksakal
Summary

‘आपण एवढे सिनिक झालोय का?’ माझा एक अगदी जवळचा मित्र ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी ’ हे शीर्षक वाचून म्हणाला, हे म्हणजे ‘एक होता गोरा निग्रो’ असं काहीसं झालं !

‘आपण एवढे सिनिक झालोय का?’ माझा एक अगदी जवळचा मित्र ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी ’ हे शीर्षक वाचून म्हणाला, हे म्हणजे ‘एक होता गोरा निग्रो’ असं काहीसं झालं ! खरंतर आपणही पूर्णपणे चुकीचे आहोत, असं म्हणता येणार नाही. ‘वाढता वाढता वाढे’ अशा गतीने भ्रष्टाचार आपल्याभोवती वाढतोय. आज भ्रष्टाचार आणि दंडुकेशाही यात आपण गटांगळ्या खातोय; आणि राजकीय पुढारी आणि वर्दीतले लोक यांची जी ‘मिलीभगत’ आहे, किंवा वर्दीतले लोक राजकीय पुढाऱ्यांच्या हातातील कठपुतळी बनल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, याबाबत आपली पूर्ण खात्री आहे.

पण नियम अपवादाने सिद्ध व्हावा, तसं सदानंद दाते हे नाव आपल्यासमोर मध्येच यायचं, नंतर क्षणभरात ते आपण विसरून जायचो. मात्र, या पुस्तकात आहेत आपण विस्मयचकित आणि अस्वस्थ व्हावं, अशा सदानंद दाते यांनी केलेल्या नोंदी आणि यातील प्रत्येक नोंद शतप्रतिशत खरी आहे. या पुस्तकाला माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची विस्तृत प्रस्तावना आहे. त्यांनी लिहिलंय, ‘सदानंद दाते म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या नभांगणातील तारा आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची कास सोडली नाही. राजकीय दबावाच्या अनेक अंधाऱ्या गल्ल्या त्यांनी पार केल्यात, त्या सत्यनिष्ठ संघर्षाची ही गाथा आहे.’

आज आपण दातेंना थोडंफार खरंतर फार थोडं ओळखतो ! हे पुस्तकही आपणाला फार काही माहिती देतं असं नव्हे; पण हे पुस्तक आहे ट्रेलरसारखं. आपण अस्वस्थ होऊन विचार करायला लागतो. त्यांच्याकडून त्यांचं जीवन, पोलिस यंत्रणा, माफिया, राजकारणी पुरुष यांच्याबद्दल खूप काही ऐकावंसं वाटतं; पण तूर्तास हे आहे कटोरी मे गंगा असं काहीसं. २६/११ च्या कसोटीत ते आघाडीवर होते, घायाळ झाले होते, हे आपण ऐकून आहोत. या पुस्तकात जी सतरा प्रकरणं आहेत, त्यांतील एक आहे २६/११चा थरार. त्यात जीवन आणि मरण यांच्या सीमारेषेवर उभं राहिलेल्या योद्ध्याने सांगितलेला तो चित्तथरारक अनुभव. मात्र, हा योद्धा हाडाचा पत्रकार आहे असं वाटावं, अशाप्रकारे त्यातील अनेक प्रसंग त्यांनी संयत शब्दांत सांगितलेले. त्यात त्यांनी त्यावेळच्या व त्यानंतरच्या व्यक्तिगत जीवनातील सांगितलेल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

आपण विपश्यना शिकलो होतो, त्याचा फायदा त्यांनी मोकळेपणाने वाचकांना सांगितलाय. ‘दहशतवादी गेल्यावर व मदत येईपर्यंत साधारण तासाभराचा अवधी गेला. या दरम्यान मला रक्तस्राव आणि वेदना यांच्याबरोबरच ग्लानीशी सामना करायचा होता. विपश्यना पद्धतीत तुमच्या संवेदना आणि वेदनांकडे तटस्थपणे कसं पाहायचं ते शिकवतात. वेदनांकडे तटस्थपणे पाहण्यामुळेच मी ग्लानी रोखू शकलो. मला ग्लानी आली असती, तर मला मदत करायला येणाऱ्यांना माझ्यापर्यंत पोचण्यासाठी मी माहिती देऊ शकलो नसतो. मला केईएमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेईपर्यंत मी शुद्धीवर राहिलो आणि त्याचा उपयोग माझ्या जखमा डॉक्टरांना सांगण्यासाठी झाला.’ दुसरी गोष्ट तर फारच व्यक्तिगत आणि म्हणूनच नकळत वैश्वि‍क आहे. दातेंच्यातील माणूस आपल्याला पुस्तकातील अनेक प्रकरणांमधील विविध अनेक प्रसंगांतून पुढे येतो आणि त्याचवेळी शासन, पोलिस यंत्रणा, राजकीय नेते आपण समजतो तेवढे वाईट नाहीत, उदासीन नाहीत, हे अनेकदा दाते सहजपणे आपल्या लक्षात आणून देतात. २६/११च्या कसोटीनंतर लगेच येणारं ‘फोर्स-वनची जडणघडण’ हे प्रकरण त्यादृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ते मुळातच वाचावयास हवं.

आपण रहस्यकथा वाचतोय असं वाटावं, असं प्रकरण म्हणजे ‘गुन्हे, गुन्हेगार आणि पोलिस’. मात्र, या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपणाला सजग करणाऱ्या चार महत्त्वाच्या ओळी दाते यांनी लिहिल्यात, ‘माझ्या तीस वर्षांच्या नोकरीत गुन्हेगारीची विविध रूपं मला बघायला मिळाली. सी.बी.आय.मध्ये असताना वरिष्ठ पातळीवरील साटंलोटं, कुंपणानेच शेत खाणं, हे प्रकार बघायला मिळाले; तर जातीय दंगली हाताळताना माणसाचा पशू कसा होतो, हेही पहावयास मिळालं. मुंबई पोलिस आयुक्तालयात काम करताना अनेक थरारक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर मुंबई गुन्हे शाखेचा प्रमुख म्हणून काम करताना गीतेमधील विश्‍वरूपदर्शनाप्रमाणेच जगरहाटीचं आणि व्यवस्थेचं रौद्र भीषण आणि अक्राळविक्राळ रूपही पहावयास मिळालं.’’

या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात नव्हे, तर प्रत्येक पानावर आपण अस्वस्थ होऊन विचार करावा, अशा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक प्रकरणात दातेंनी प्रामाणिक माणसाच्या मनात उठणारी वादळं, त्यांची तगमग अगदी तरल शब्दांत सांगितली आहे. त्यातील काही प्रकरणांची शीर्षकं पाहिली तरी हे आपल्या लक्षात येतं. जसं - १) झेड सिक्युरिटीच्या अंतरंगात, २) विरोधाभासाच्या राजधानीत, ३) पोलिसांची परीक्षा - उत्सवी गर्दी, ४) कनिष्ठ कर्मचारी पोलिस दलाची ताकद, ५) माध्यमांशी जुळवून घेताना, ६) व्यवस्थेच्या अंतरंगातील सहप्रवास.

दातेंनी संशोधन क्षेत्रात मारलेली डुबकी यात येते. ‘फुलब्राइट स्कॉलरशिप मिळवून परदेशात केलेलं संशोधन, तेथील यंत्रणेचं अवलोकन हे सारंच आपल्याही मनाला उभारी देतं. मात्र, त्याचवेळी पुस्तकात खऱ्याअर्थाने आपल्या समोर येते, ती प्रामाणिक, कर्तव्यदक्ष माणसाची होणारी कोंडी. फक्त एक उदाहरण देतो - जुगार, सट्टा आणि हातभट्ट्या यांनी चिपळूण पोखरलं होतं, दहशतीखाली होतं. सदानंद दातेंनी धडक कारवाई सुरू केली. वरिष्ठ आणि नेते मंडळी यांनी असं काही करू नका म्हणून सांगितलं. दातेंनी तिकडं दुर्लक्ष केलं. बरोबर सहाव्या दिवशी त्यांची चिपळूणहून गडचिरोलीला बदली झाली ! अशा अनेक घटना आहेत, नवीन माहिती देणाऱ्या, अस्वस्थ करत विचाराला प्रवृत्त करणाऱ्या. ‘अंधार फार आहे, पणती जपून ठेवा’ असं म्हणत वाटचाल करणारे सदानंद दाते या पुस्तकातून आपल्या समोर येतात, आपल्या मनाला आधार देत. आपणाला हे पुस्तक वाचल्यावर सुरेश भटांच्या दोन ओळी आठवतात -

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची

रणात आहेत झुंजणारे अजून काही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com