

Dattatreya's 24 Gurus: Nature's Lessons
esakal
नुकतीच दत्तजयंतीच्या निमित्ताने गावी गेले होते. निवांतपणा मिळाला तसं मंदिरातून समोर पाहिलं, तशी शेतजमीन दिसली. अनवाणी पायानेच काळ्या मातीवर पावलं टाकत पुढे पुढे चालत गेले. एकीकडे थंडीतली दुपार असल्याने त्या उन्हाचा स्पर्श सुखावत होता. आता नदीचं काठोकाठ भरलेलं पात्र दिसत होतं. झाडांचं प्रतिबिंब, उडणारे पक्षी, फुलपाखरं, वर असलेलं निरभ्र आकाश हे सगळं डोळ्यात भरून घेतलं. मातीतच चक्क मांडी घालून बसले आणि डोळे मिटून घेतले. कानांना ऐकू येणारी किलबिल, एखादी वाऱ्याची झुळूक आणि तीच उन्हाची ऊब पुन्हा सुखावू लागली. काही क्षणांसाठी सगळ्याचा विसर पडला. शांततेचा तो अनुभव साठवून घेतला. डोळे उघडले आणि थोड्या वेळाने परत निघाले. नेमकं कशाने छान वाटलं असेल? मनात विचार आला आणि लक्षात आलं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्त्वांशी जोडली गेले होते. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ जे आत तेच बाहेर. ते इतक्या सुंदर वातावरणात शांतपणे अनुभवता आलं होतं आणि अचानक पुन्हा दत्तगुरुंचंही स्मरण झालं! म्हटलं, हे तर दत्तगुरुंचे गुरू! दत्तात्रेयांचे २४ गुरू या विषयावर नुकतंच निरुपणही केलं होतं. हे २४ गुरू म्हणजे निसर्गातील सजीव-निर्जीव गोष्टी. काही गुरू काय करावं ते सांगतात आणि काही काय नाही करायचं ते शिकवतात. त्यातच या पंचमहाभूतांचाही समावेश होतो. खरंच, या विषयाशी जेव्हा तोंडओळख झाली, तशी ‘गुरू’ शब्दाकडे पहाण्याची दृष्टीच बदलून गेली.