

Delhi Marathi Film Festival
esakal
वैभव डांगे
नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे नुकताच झालेला पहिला दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव हा तीन दिवसांचा चित्रपट महोत्सव नव्हता; तो दिल्लीतील मराठी समाजाच्या सांस्कृतिक जिद्दीचा, आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याच्या इच्छेचा आणि पुढच्या पिढीपर्यंत मराठी संस्कृती पोहोचवण्याच्या संकल्पाचा उत्सव होता.
दिल्लीच्या भूमीवर प्रथमच मराठी चित्रपटांना स्वतंत्र व व्यापक व्यासपीठ मिळाले, हीच या महोत्सवाची मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विशेषता आहे. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी समाजासाठी हा क्षण अभिमानाचा होता; तर इतर भाषिक रसिकांसाठी मराठी चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा अनुभवण्याची एक सुंदर संधी होती. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासापासून वेगळा करता येत नाही. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे व्ही. शांताराम यांनी सामाजिक आशय, कलात्मकता आणि तांत्रिक प्रयोग यांच्या माध्यमातून भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली. महाराष्ट्राने केवळ दिग्दर्शक आणि निर्मातेच दिले नाहीत, तर संगीत, अभिनय, लेखन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध केली.