

Operation Cyhawk
esakal
अलीकडे विविध नवतंत्रज्ञानाच्या वापरासोबतच, त्याचा गैरवापर वाढला असून, सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत; मात्र याच नवतंत्रज्ञानाच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी ‘ऑपरेशन सायहॉक’ राबवत सायबर गुन्हेगारांची पोलखोल केली. आतापर्यंतची ही देशातील सर्वात मोठी कारवाई असून, त्यातून तब्बल ९४४ कोटींचे संशयास्पद गैरव्यवहार उघडकीस आणले.
तंत्रज्ञानाचा ज्या पद्धतीने विस्तार होत आहे, त्याचा विविध क्षेत्रांत, विविध कामांसाठी जसा फायदा होत आहे, तसाच या तंत्रज्ञानाचा दुरुपयोगही केला जात आहे. सायबर विश्वात एखादे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते गुन्हेगारांपर्यंत पोहोचत आहे. त्याचा अभ्यास करून गैरप्रकार केले जातात. उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. देशात दररोज सरासरी सात हजारांहून अधिक सायबर गुन्हे घडतात. या माध्यमातून मागील वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी देशात तब्बल २२ हजार ८४५ कोटींवर डल्ला मारला. कॉल मर्जिंग, सिम स्वॅप, व्हॉट्सॲप हॅकिंग, बनावट लोन ॲप, पर्चेस ऑर्डर फसवणूक, डिजिटल अरेस्ट यासह विविध प्रकारे लोकांची फसवणूक केली जाते; परंतु अनेक व्यक्ती, संस्था बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. किरकोळ रकमेची फसवणूक असल्यास अनेकदा टाळाटाळ केली जाते. याशिवाय गेलेले पैसे परत मिळणार नाही, म्हणून झाले गेले विसरून जातात. तसेच काही प्रकरणात अनेकांना उशिरा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. तरीही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (एनसीआरपी) दाखल विविध तक्रारींच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी नुकतेच ‘ऑपरेशन सायहॉक’ राबवले. सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे खोदून एआयसह विविध तंत्रज्ञानाची मदत घेत, १० राज्यांमध्ये तब्बल दोन दिवस कारवाई केली. सुमारे पाच हजार पोलिस अधिकारी आणि सायबर गुप्तहेरांच्या मदतीने राबविलेल्या या मोहिमेतून जवळपास ९४४ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार शोधून काढले.