
गिरिजा दुधाट, dayadconsultancies@gmail.com
एकऽपि यत्र नगरे प्रसिद्ध: स्याध्दनुर्धर: ।
ततो यान्त्यरयो दूरान्मृगा: सिंहगृहादिब ।।
अर्थात, जशी अरण्यातली हरणे सिंहाच्या गुहेपासून दूर पळतात, तसे कुशल धनुर्धर असलेल्या नगरापासून शत्रू दूर राहतात. धनुष्यबाण... किमान तीस हजार वर्षांचा इतिहास असलेलं शस्त्रं! भारताच्या समृद्ध शस्त्रभूमीमध्ये या शस्त्रावर ‘वेदां’च्या तोडीचा ग्रंथ म्हणजेच-‘धनुर्वेद’ वेगवेगळ्या कालखंडात लिहिला गेला, तोही एक-दोन नव्हे, तर वसिष्ठ, जामदग्न्य, औशनस, विश्वामित्र अशा वेगवेगळ्या सात शाखांचा! भारतीय युद्धशास्त्राच्या व्यापक परिघात दीर्घ काळ व्यूहरचनेपासून ते अगदी मल्लयुद्धापर्यंतचे घटक ‘धनुर्वेदा’ची अंगे मानली गेली होती. थोडक्यात, धनुर्वेद ही केवळ धनुर्विद्येसंबंधी नाही, तर शस्त्रांसंबंधीच्या विविधांगी पैलूंना सामावून घेणारी शस्त्रशाखा होती.
भारतामध्ये प्राचीन ते मध्ययुगीन काळापर्यंत (अगदी अठराव्या शतकापर्यंत) धनुष्यबाण सैन्यामधल्या घोडदळ, गजदळ, पायदळ या सगळ्यांकडून वापरले जायचे, शिवाय धनुष्यबाण फक्त युद्धाचे नाही, तर खेळ, शिकार, स्पर्धा अशा माध्यमातून वापरले जाणारे मनोरंजनाचेही साधन होते. धनुष्यबाणाइतकं परस्परावलंबी शस्त्र शोधून सापडणार नाही! बाण चालवायचा, तर धनुष्य पाहिजे, धनुष्य वापरायचं तर बाण पाहिजे, दोन्ही वापरायचं तर प्रत्यंचा पाहिजे, चालवताना वारा नियंत्रित पाहिजे, जास्त काळ हे शस्त्र चालवायचं, तर मुबलक साठा पाहिजे! थोडक्यात काय... धनुष्यबाण हे अनेक घटकांच्या समन्वयाने चालणारं किंबहुना चालवावं लागणारं शस्त्र होतं. याशिवाय तुमचे कौशल्य, सराव, अनुभव या गोष्टी वेगळ्याच!