कुछ ख़ार कम तो कर गए...

मराठी-हिंदी-उर्दू-इंग्लिश अशा नाना भाषा त्या पसाऱ्यात सुखेनैव नांदत
संकल्प
संकल्प sakal

‘आता पुस्तकं आवरायचीच’ असा संकल्प केल्यानंतर नव्या-जुन्या पुस्तकांचा भलामोठा ढिगारा-पसारा माझ्यासमोर आहे आणि मी त्यात बुडून गेलोय. झाकला गेलोय. पुस्तकांच्या वर्गवारीला कुठून कशी सुरुवात करावी असा ‘गहन प्रश्न’ पडून गोंधळलेला-भांबावलेला-कावराबावरा असा मी...

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातलं (आणि गुढीपाडव्याच्या आदल्या आठवड्यातलंही बरं का! हो, हेही सांगायला हवं. नाहीतर...पुढं काही लिहायची आवश्यकता आहे?) हे माझ्या बाबतीतलं ‘हमखास दृश्य’ माझं मलाच आता इतकं सरावाचं झालंय की त्यात मला काहीच नावीन्य वाटत नाही.

मराठी-हिंदी-उर्दू-इंग्लिश अशा नाना भाषा त्या पसाऱ्यात सुखेनैव नांदत असतात (ही खरी सहिष्णुता!). ‘नकोच त्यांना वेगळं करायला,’ असा आळशी स्वभावाला सोईस्कर विचार करून व पसारा आवरण्याचा संकल्प रहीत करून त्या पसाऱ्यातच दांडामांडा घालून कुठलं तरी पुस्तक वाचण्यात मी गुंग होऊन जातो. नंतर वर्षभरात कधीतरी हुक्की आली की तीन-चार वेळा हा पसारा आवरतो म्हणा मी...(पण खरं सांगायचं तर, सगळी पुस्तकं अगदी लष्करी शिस्तीनं मांडणीत हारीनं लावून ठेवण्यापेक्षा ती बेशिस्त नागरिकांसारखी घरात इतस्ततः पडलेली असलेलीच बरी दिसतात, असंच कुठलाही सच्चा पुस्तकप्रेमी तुम्हाला सांगेल!).

तर सांगायचा मुद्दा हा की, असे कितीतरी डिसेंबर येतात आणि जातात; पण नववर्षाच्या मुहूर्तावर पुस्तकांची आवराआवरी काही कधी होत नाही.अशा वेळी मला हटकून आठवतं ते ओशोंचं एक सुवचन. ते म्हणतात : ‘साध्या साध्या गोष्टींबाबत नकारात्मक संकल्प कधीही करू नका; नाहीतर दुहेरी निराशा वाट्याला येईल.’ असे नकारात्मक संकल्प सिद्धीला जात नाहीत हे एक, आणि दुसरं म्हणजे, छोट्या छोट्या बाबतींतही आपण दृढनिश्चयी नाही, ठरवलेली गोष्ट आपण तडीस नेऊ शकत नाही ही अधिकची निराशा तुमचा जीव कुरतडत राहील.

खरं आहे ओशोंचं. ते मनोविज्ञान कोळून प्यायलेले, प्रत्येक बारीकसारीक भाव-भावना, विचार-विकार सूक्ष्मदर्शित्राखाली ठेवून त्यांचं विश्लेषण करणारे आध्यात्मिक गुरू. थोडक्यात, जे तडीस नेता येतील असेच संकल्प करा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, मनोबल वाढेल असा काहीसा संदेश ते देतात.

संकल्प आणि सिद्धी यांच्यात फक्त कृत्याचं अंतर असतं असं म्हटलं जातं. आणि, हे कृत्य करायलाच आपण जाणता-अजाणता उशीर लावत असतो. एक दिवस, एक आठवडा, एक वर्ष, कदाचित संपूर्ण जन्मही...! उशीर लावण्याचा हा कालावधी असा कितीही असू शकतो. 

वरचंच उदाहरण घ्या. पुस्तकांच्या अस्ताव्यस्त पसाऱ्यानं विरूप-कुरूप झालेली खोली म्हणा, हॉल म्हणा नीटनेटका आवरायला - जर मनावर घेतलं तर - असा कितीसा वेळ लागेल? सलग बसलं तर एक-दोन दिवस. आणि, टप्प्याटप्प्यानं आवरायचं ठरवलं तर फार फार तर एखादा आठवडा.

पुस्तकांच्या म्हणा वा अन्य वस्तूंच्या पसाऱ्यानं भरलेली खोली/हॉल आवरणं म्हणजे त्या खोलीचं स्वरूप सुंदरतेच्या दिशेनं नेणं. ती आपल्या मनातील अपेक्षित कल्पनाचित्रानुसार छानपैकी आवरली जाईल असं दरवेळी होईल असंही नाही; पण आवरल्यानंतर तिची आधीची विरूपता-कुरूपता-असुंदरता कमी तर नक्कीच होईल.  

जे घराचं, खोलीचं तेच आपल्या मनाचंही. आपल्याला कल्पनाही नसेल इतक्या विरूपता-कुरूपता आपल्या मनात दडून बसलेल्या असतात. कधी एखाद्या अप्रिय प्रसंगाचं निमित्त होऊन त्या बेंगरूळपणे उघड्यावर येतात (आणि आपल्यालाही उघडं पाडतात!); पण आपण त्या लगेचच आवरतो-सावरतो का? त्या ठीकठाक, नीटनेटक्या करतो का? किमान त्या दिशेनं विचार तरी करतो का? नाही करत. दुर्लक्ष करतो आपण त्यांच्याकडे.

आपण कोते असतो, संकुचित असतो, मानभावी असतो, दांभिक असतो, कृपण असतो, रागीट-तापट असतो, असहिष्णु असतो (व्यक्तिगत आयुष्यातही असतो आणि सार्वजनिक आयुष्यातही असतो. अलीकडच्या काही वर्षांत तर सार्वजनिक जीवनात असहिष्णुतेची ही लागण किती वेगानं पसरली आहे हे काही सांगायला नकोच).

तर, असे बरेच दुर्गुण-अवगुण आपल्यात वसत असतात. ते आपल्याला कळतातही; पण ते वेळच्या वेळी दूर करण्याचं काही आपण मनावर घेत नाही. तेवढी लवचिकता नसते आपल्यात. मनातला हा पसारा काही आपल्याला आवरावासा वाटत नाही आणि ही विरूपता-कुरूपता थोडीशी तरी दूर करून सुंदरतेच्या दिशेनं जाण्याविषयीची तत्परता काही आपण दाखवत नाही.  

आपल्यातल्या कार्पण्याविषयी, कृपणतेविषयी कविवर्य बा. सी. मर्ढेकर म्हणतात :

भंगु दे काठिन्य माझें । आम्ल जाऊं दे मनींचे; येउ दे वाणींत माझ्या । सूर तूझ्या आवडीचे

लोभ जीभेचा जळूं दे । दे थिजुं विद्वेष सारा; द्रौपदीचें सत्त्व माझ्या । लाभुं दे भाषा-शरीरा.

जाउं दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चें । दे धरूं सर्वांस पोटी; भावनेला येउ दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जें जें पहाणें;

वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणें

एखाद्या प्रार्थनेचं मोल लाभलेल्या या कवितेतून मर्ढेकर हेच सांगत आहे : ‘माझ्यातली विरूपता-कुरूपता नष्ट होऊ देत. असुंदरतेकडून सुंदरतेकडे होऊ दे माझा प्रवास...त्यासाठी लवचीक होऊ देत माझ्या वृत्ती-प्रवृत्ती. वाकू दे माझी बुद्धी तापलेल्या पोलादाप्रमाणे.’

अर्थात्, असं असलं तरीही, आपल्यातले हे दुर्गुण-अवगुण एका झटक्यात हटणारही नाहीत...वृत्ती-प्रवृत्ती अशा काही एका रात्रीत बदलत नसतात. आपण सर्वसामान्य माणसं तेवढी ‘साक्षात्कारी’ नसतो. मात्र, आपल्यात काहीतरी खटकणारं (स्वतःला व इतरांनाही) आहे ही जाणीव आपल्याला अधूनमधून होऊ शकते. होत असतेच. अशी जाणीव होणं हेच सकारात्मक बदलाच्या दिशेनं जाण्यासाठीचं, कुरूपतेकडून सुंदरतेकडे जाण्याचं पहिलं सुचिन्ह असतं. हे लक्षात घेऊन, उशीर न करता जायला हवं त्या दिशेनं, हळूहळू का होईना. 

विख्यात पाकिस्तानी कवी मुनीर नियाज़ी यांची एक फार सुंदर कविता आहे : हमेशा देर कर देता हूँ मैं...

हमेशा देर कर देता हूँ मैं

ज़रूरी बात कहनी हो,

कोई वादा निभाना हो

उसे आवाज़ देनी हो,

उसे वापस बुलाना हो

हमेशा देर कर देता हूँ मैं

 मदद करनी हो उस की...

यार की, ढाढ़स बँधाना हो

बहुत देरीना रस्तों पर किसी से मिलने जाना हो

हमेशा देर कर देता हूँ मैं

बदलते मौसमों की सैर में दिल को लगाना हो

किसी को याद रखना हो,

किसी को भूल जाना हो

हमेशा देर कर देता हूँ मैं

किसी को मौत से पहले,

किसी ग़म से बचाना हो

हक़ीक़त और थी कुछ,

उस को जा के ये बताना हो

हमेशा देर कर देता हूँ मैं

तर, आपण ही जी अशी सगळ्याच बाबतींत देर-दिरंगाई करत असतो नेहमी, ती सहज टाळता

येण्याजोगी असते आणि असा उशीर करत जाण्याच्या वृत्तीमुळे येऊ शकणारा अपराधगंड व पस्ताव्याची भावनाही त्यामुळे आपोआपच टळू शकेल. 

(ही रचना नियाज़ी यांच्या आवाजात YouTube वर ऐकायला मिळेल. जिज्ञासूंनी जरूर ऐकावी.)

असुंदरतेकडून सुंदरतेकडे जाण्याचा मूलमंत्र देताना ‘साहिर’ लुधियानवीसुद्धा हेच सांगतात :

माना कि इस ज़मीं को न गुलज़ार कर सके

कुछ ख़ार कम तो कर गए गुज़रे जिधर से हम

या सगळ्या भूमीचं बहरलेल्या बाग-बगिच्यात/उद्यानात (गुलज़ार) रूपांतर नाही करू शकलो आम्ही; मान्य आहे. मात्र, आम्ही जिथं आम्ही वावरलो, तिथले तिथले काटे (ख़ार) - थोड्या प्रमाणात का होईना - आम्ही दूर केले आहेत.)

तेव्हा, सगळं जग सुंदर करणं, सगळी माणसं सत्प्रवृत्त करणं आपल्या हातात नसतं. आवाक्यात नसतं. मात्र, कुण्या खट्याळाच्या-नाठाळाच्या (आणि स्वतःच्याही!) चित्ताची कुरूपता, वृत्तीचं वाकुडपण होता होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो. आणि वर म्हटल्यानुसार, कुरूपता, कार्पण्य (कृपणता), संकुचितता होता होईल तेवढी कमी करत नेणं म्हणजेच दुसऱ्या अर्थानं सुंदरता वाढीस लावणं. सुंदरतेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणं.

‘हजारो मैलांचा प्रवास एका (पहिल्या) पावलानं सुरू होतो,’ अशी प्राचीन चिनी म्हण आहे. हेच सुवचन विख्यात चिनी तत्त्वज्ञ, आध्यात्मिक गुरू लाओ त्सू याचं असल्याचंही सांगितलं जातं. लाओ त्सू यानं त्याच्या तत्त्वज्ञानात या सूत्रावर बराच भर दिलेला आढळतो.  

आज नवं वर्ष सुरू झालं आहे. तेव्हा, आपणही टाकू या आज हे पहिलं पाऊल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com