आयुर्विम्याच्या पारंपरिक योजना (दिलीप बार्शीकर)

दिलीप बार्शीकर dbarshikar@yahoo.co.in
रविवार, 29 एप्रिल 2018

आयुर्विम्याशी संबंधित अनेक योजना वेगवेगळ्या नावांनी आपल्यापुढं येत असतात. अनेकदा मूळ योजनांचं वेगवेगळ्या स्वरूपात मिश्रण करूनही वेगळ्या योजना तयार केल्या जातात. आयुर्विम्याशी संबंधित मूळ योजना काय, त्यांची वैशिष्ट्यं कोणती, त्यांचे फायदे-तोटे काय आदी गोष्टींवर एक नजर.

आयुर्विम्याशी संबंधित अनेक योजना वेगवेगळ्या नावांनी आपल्यापुढं येत असतात. अनेकदा मूळ योजनांचं वेगवेगळ्या स्वरूपात मिश्रण करूनही वेगळ्या योजना तयार केल्या जातात. आयुर्विम्याशी संबंधित मूळ योजना काय, त्यांची वैशिष्ट्यं कोणती, त्यांचे फायदे-तोटे काय आदी गोष्टींवर एक नजर.

आयुर्विमा कंपन्या त्यांच्या विविध योजना आकर्षक नावांनी मार्केटमध्ये आणत असतात. अर्थात "नावात काय आहे' या उक्तीप्रमाणं केवळ नावावरून आपल्याला ती योजना नक्कीच समजणार नाही. त्यासाठी त्या योजनेच्या अटी, मिळणारे फायदे आपल्याला तपासून पाहावे लागतील. आयुर्विम्याच्या शेकडो योजना बाजारात प्रचलित असल्या, तरी मूळ योजना मोजक्‍याच असतात आणि त्यांचंच वेगवेगळ्या स्वरूपात मिश्रण करून कंपन्या आपल्या विविध योजना तयार करत असतात. आज आपण अशा मूळ पारंपरिक योजनांची थोडक्‍यात माहिती घेऊ या.

टर्म इन्शुरन्स : ही आयुर्विम्याची मूळ योजना. या योजनेअंतर्गत पॉलिसीच्या कालावधीत दुर्दैवानं विमेदाराचा मृत्यू झाला, तर विम्याची संपूर्ण रक्कम वारसाला दिली जाते. मुदतपूर्तीच्या दिवशी विमेदार हयात असेल, तर मात्र कोणतीही रक्कम देय होत नाही. कारण विमेदाराचं अकाली निधन झालं, तर कुटुंबाला आर्थिक आधार देणं हाच एकमेव हेतू या योजनेचा असतो. अर्थातच त्यामुळं या योजनेचा प्रीमियम अत्यल्प असतो.

एंडॉमेंट अश्‍युरन्स (assurance) : टर्म इन्शुरन्समध्ये मुदतपूर्तीला काहीच रक्कम मिळत नाही, ही गोष्ट न रुचणाऱ्या लोकांना ही योजना जास्त भावते. यात विमासंरक्षण आणि मुदतपूर्तीचा लाभ असे दोन्ही फायदे उपलब्ध असतात. पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी विमेदाराचा मृत्यू झाला, तर विमा रक्कम वारसाला आणि मुदतपूर्तीच्या दिवशी तो जिवंत असेल, तर विमा रक्कम विमेदाराला दिली जाते. अशा निश्‍चित दुहेरी फायद्यामुळं या योजनेचा प्रीमियम टर्म इन्शुरन्सपेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो.

मनी बॅक योजना : यामध्ये एंडॉमेंटप्रमाणंच विमासंरक्षण आणि मुदतपूर्ती असे दोन्ही लाभ उपलब्ध असतात; पण या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यात विमा रकमेचा काही भाग पॉलिसी कालावधीत ठराविक अंतरानं विमेदाराला दिला जातो. ज्यामुळं पॉलिसी काळात उद्‌भवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी विमेदाराला पैसा उपलब्ध होतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं पाच लाख रुपये विमा रकमेची वीस वर्षं मुदतीची मनी बॅक पॉलिसी घेतली असेल, तर पॉलिसीमधल्या तरतुदींनुसार त्याला पॉलिसी सुरू झाल्यापासून पाच, दहा, पंधरा वर्षांनी (म्हणजे दर पाच वर्षांनी) विम्याच्या रकमेचा काही भाग (समजा वीस टक्के) म्हणजे एक-एक लाख रुपये अशा रकमा मिळतील आणि उर्वरित चाळीस टक्के रक्कम (दोन लाख रुपये) मुदतपूर्तीच्या दिवशी मिळेल. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ठराविक मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेचे काही हप्ते विमेदाराला दिल्यानंतर जर विमेदाराचा मृत्यू झाला, तर त्या हप्त्यांची कोणतीही वजावट न करता संपूर्ण विमा रक्कम वारसाला दिली जाते. अर्थातच अशा योजनांचा प्रीमियम एंडॉमेंटपेक्षाही अधिक असतो.

होल लाइफ (आजीवन) विमा : अशा पॉलिसीजना ठराविक मुदत नसते, तर विमेदार जिवंत असेपर्यंत त्या सुरूच राहतात आणि संबंधित विमेदाराचा मृत्यू होतो, तेव्हा वारसाला विमा रक्कम दिली जाते. अशा योजनांत प्रीमियम ठराविक काळापर्यंतच भरण्याचा पर्याय विमेदाराला उपलब्ध असतो.

या सगळ्या योजनांपैकी टर्म इन्शुरन्समध्ये फक्त विमासंरक्षणासाठी आवश्‍यक इतकाच प्रीमियम घेतलेला असल्यामुळं बोनस वगैरे देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. उर्वरित योजना बोनसविना किंवा बोनससह असू शकतात आणि त्यानुसार त्याचा प्रीमियमही कमी/जास्त असतो. या योजनांतून जमा होणारा प्रीमियम गुंतवताना विमेदारांच्या व्यापक हितातून सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळंच शेअर्ससारख्या ठिकाणी गुंतवणूक टाळली जाते. साहजिकच बोनसच्या रूपानं विमेदाराला मिळणारा परतावाही अल्पच (चार ते पाच टक्के) असतो.

Web Title: dilip barshikar write article in saptarang