मृत्यूचं असंही आकर्षण...

राजेश खन्नालाही समुद्र आवडायचा. कुणाला आवडत नाही ? आम्हालाही आवडतो. पण समुद्राच्या जवळ राहणं परवडत नाही म्हणून आम्ही तिथे राहत नाही.
dimple bungalow rajendra kumar fortunes changed he became Jubilee Kumar 20-22 of his films became silver jubilee
dimple bungalow rajendra kumar fortunes changed he became Jubilee Kumar 20-22 of his films became silver jubileeSakal

राजेश खन्ना पहिला सुपरस्टार असला तरी ‘महान नट’ म्हणून त्याचं कौतुक झालं नाही. दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, संजीवकुमार, नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाच्या कौतुकाचं स्टेटस त्याला मिळालं नाही. तो रोमँटिक हीरो होता.

काही गंभीर भूमिका त्यानं चांगल्या केल्या. उदाहरणार्थ : आनंद, सफर, खामोशी वगैरे. भावनात्मक भूमिका तो चांगल्या करायचा. बावर्चीमध्ये काॅमेडीचा प्रयत्नही त्यानं चांगला केला; पण त्याच्यात विविधांगी भूमिका करण्याचं कसब नव्हतं.

मुंबईत कार्टर रोडवर ‘आशीर्वाद’ नावाचा एक बंगला होता. एके काळी तो शांत रस्ता होता. तिथं हा बंगला होता. त्याला भूत बंगला म्हणत. तो बंगला राजेंद्रकुमारच्या मनात भरला. राजेंद्रकुमार त्या वेळी बी.आर.चोप्रांच्या ''कानून''मध्ये काम करत होता.

त्यानं चोप्रांकडून ९० हजार रुपये ॲडव्हान्स घेतले आणि ६० हजारांत भूत बंगला विकत घेतला. मनोजकुमार त्याचा खास दोस्त. (साहजिक आहे. दोघंही गरिबांचे दिलीपकुमार.) राजेंद्रकुमार त्यातल्या त्यात श्रीमंतांचा दिलीपकुमार. मनोजकुमारनं राजेंद्रकुमारला सांगितलं पूजा कर, त्यानं केली. त्यामुळं भुतं पळाली. राजेंद्रकुमारनं त्या बंगल्याचं नाव ''डिंपल'' ठेवलं.

ती पूजा एवढी पाॅवरफूल होती, की फक्त भूत पळाली नाहीत तर राजेंद्रकुमारच्या नशिबानं करवट बदलली. तो ज्युबिलीकुमार झाला. त्याचे जवळपास २०-२२ सिनेमा सिल्व्हरज्युबिली झाले. मग त्याने पाली हिलला मोठी जागा घेऊन मोठा बंगला बांधला. त्याचंही नाव ''डिंपल'' ठेवलं.

राजेश खन्नालाही समुद्र आवडायचा. कुणाला आवडत नाही ? आम्हालाही आवडतो. पण समुद्राच्या जवळ राहणं परवडत नाही म्हणून आम्ही तिथे राहत नाही. राजेश खन्नाला ''डिंपल'' बंगला आवडला, पण त्यासाठी बरेच पैसे हवे होते. त्याचं नशीब जोरावर होतं.

''चिनप्पा देवर'' मद्रासहून मुंबईत आला. त्याला त्याच्या गाजलेल्या ''तामीळ'' सिनेमावरून हिंदी सिनेमा काढायचा होता. त्यासाठी त्याला मोठा स्टार हवा होता. राजेश खन्नाला बंगला हवा होता. त्यानं थेट सिनेमा साइन केला. आणि ॲडव्हान्स म्हणून पाच लाख रुपये घेतले.

त्यावेळी पाच लाख रक्कम डोळ्यातून बुब्बुळं बाहेर काढणारी होती. राजेश खन्नाही स्वतः एवढा खूश झाला, की ज्याला त्याला तो ती पाच लाख कॅश असलेली सुटकेस दाखवत सुटला. पण जेव्हा चिनप्पा देवरने त्याला पटकथा पाठवली, तेव्हा त्याचे डोळे पांढरे झाले. त्याची इमेज रोमँटिक हीरोची आणि सिनेमात हत्तीच हत्ती.

तो हतबुद्ध झाला. बरं पैसे परत करायचे तर बंगला गेला. राजेश खन्नाला त्या सिनेमाचे नऊ लाख मिळणार होते. त्यातले पाच लाख ॲडव्हान्स. त्या वेळी राजेश खन्ना सिनेमासाठी पाच लाख घ्यायचा. त्याने सलीम-जावेदला गाठलं आणि सांगितलं,

‘‘ पटकथा जेवढी इंटरेस्टिंग करता येईल तेवढी करून द्या.’’ त्यांचा परीसस्पर्श झाला. त्यांनी त्यात फक्त चार हत्ती ठेवले. बाकी सर्व बदललं. सिनेमाचं नाव ‘हाथी मेरे साथी’ ठेवलं. सिनेमा सुपरडुपर हिट झाला. पुढं ह्या हिंदी स्क्रिप्टवर तामीळ सिनेमा तयार झाला.

त्याचा नाच मला कधी भावला नाही. मारामारी हा त्याचा प्रांत नव्हता. त्याला महान स्टार आहे पण महान नट नाही याचं शल्य नक्की होतं. त्याने ज्या इमोशनल भूमिका केल्या, त्या त्याच्या सुरवातीच्या काळात केल्या. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याने एखादा ''आनंद'' केला किंवा ''आविष्कार''.

देव आनंदप्रमाणे तो त्याच्या रोमँटिक प्रतिमेच्या प्रेमात पडला. पण त्याला चांगला किंवा महान अभिनेता म्हटलं गेलं नाही ह्याची खंत होती. एक किस्सा सांगतो जो राजेश खन्नावरच्या एका पुस्तकात सलीम खाननं लिहिलेला आहे.

एका फिल्म मॅगझिनमध्ये संजीवकुमारवर स्टोरी आली होती. एक मोठा नट, त्याचं अभिनयातलं वैविध्य, त्याची अभिनयातली मोठी रेंज हा विषय होता. सलीम खाननेही त्याचं कौतुक केलं होतं. ही स्टोरी राजेश खन्नाने वाचली. त्याने गाडी पाठवून ''सलीम खान''ला आपल्या घरी बोलावलं.

गाडी आल्यावर तो स्टायलिशली गाडीच्या बाॅनेटवर बसला आणि त्याने सलीम खानला विचारलं. "हे तू बोललास का ? " सलीम खान म्हणाला, "हो." "म्हणजे तुला संजीवकुमार खूप चांगला अभिनेता वाटतो ?" राजेशने विचारलं. सलीम खान म्हणाला, "हो."

"मग माझ्याबद्दल काय वाटतं ?" सलीम खानला धक्का बसला. पुन्हा राजेश खन्नानं त्याला विचारलं, "माझ्याबद्दल काय वाटतं ? मी चांगला नट आहे की नाही ? " सलीम खान म्हणाला, "मला तुमच्याबद्दल विचारलं असतं तर मी हेच सांगितलं असतं."

राजेश हसला. त्याला बाय सुद्धा न करता निघून गेला. तो सलीमला रोज भेटायचा पण त्या दिवसानंतर सहा महिने भेटला नाही. त्याला कुठल्याच बाबतीत देव्हाऱ्यात दुसरा देव नको होता. मग स्टारडम असो की अभिनय.

दिलीपकुमार हा हिंदी चित्रपटातला पहिला ट्रॅजेडी किंग.अनेक चित्रपटांचा शेवट त्याच्या मृत्यूने झालाय. उदा - मिलन, दाग, दीदार, देवदास, गंगा जमुना वगैरे. राजेश खन्नालाही मृत्यूचं आकर्षण होतं. आराधना यशस्वी झाल्यामुळे कदाचित त्याला त्याचं आकर्षण निर्माण झालं असेल. पुढे सफर, आनंद, अंदाज, नमकहराम ह्या सिनेमांत तो शेवटी मरतो. नमकहराममध्ये तर त्याने हक्काने आणि हट्टाने मृत्यू ओढवून घेतला.

हृषीदा आधी तयार नव्हते. हृषीदांना तयार करण्यासाठी त्यानं आपल्या फोटोला हार घातला. बरं... तेव्हा तो सुपरस्टार होता त्यामुळे हृषीदांचा नाइलाज झाला. सर्वसामान्यपणे लोकांना दुःखद शेवट आवडत नाही. ''आह'' सिनेमात सुरवातीला राज कपूर मरतो असं दाखवलं होतं, नंतर शेवट बदलून त्याला ठणठणीत केलं.

देव आनंदला ''गाईड''मध्ये मरायचं नव्हतं. पण त्याच्या मृत्यूमुळे इंपॅक्ट येईल हे विजय आनंदला त्याला पटवून द्यायला लागलं. दिलीपकुमारने वारंवार ट्रॅजेडी भूमिका केल्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले होते.

पण दिलीप आणि राजेश खन्नाच्या मृत्यूच्या प्रसंगात एक मूलभूत फरक होता. राजेशची व्यक्तिरेखा अशी असायची की तो मृत्यूची थेट थट्टामस्करी करायचा. मृत्यूला हसऱ्या चेहऱ्याने सामोरा जायचा. त्याला भय नव्हतं. दुःखाने ओथंबलेला त्याचा मृत्यू नसायचा.

दिलीप चित्रे या मराठी लेखकाने इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. "राजेशच्या मृत्यूच्या प्रसंगात एक प्रकारचं नावीन्य होतं. तो छान उमदा, मस्त जीवन जगणारा, उत्साही, जिंदादिल तरुण असायचा. त्याचा मृत्यू हा अकाली आणि त्याच्यावरचा अन्याय वाटायचा. त्यामुळे थिएटरमधल्या तरुण मुली तो मृत्यू पाहू शकायच्या नाहीत. त्यांना दुःख अनावर व्हायचं. त्यामुळे त्याला फॅन्सची सिंपथी मिळायची."

राजेश खन्नाला वाटायचं आपल्यात ''देवदास'' आणि ''गुरुदत्त''चं मिश्रण आहे. ''सफर'' सिनेमात तो डाॅक्टर अशोककुमारला विचारतो, "माझं किती आयुष्य उरलंय ? " तो शाॅट त्याने चांगला केलाय.

''नमकहराम''मध्ये त्याला ट्रक उडवतो आणि तो जागच्याजागी मरतो. हा प्रसंग एवढ्या वेगात घडतो की प्रसंगातून होणारी अनुकंपा निर्माणच होत नाही. उलट अमिताभ त्याच्या मित्राच्या मृत्यूचा सूड म्हणून त्याच्या वडिलांचं पाप स्वतःवर घेऊन जन्मठेपेची शिक्षा स्वतः भोगतो. त्यामुळे सहानुभूती त्याच्याकडे जाते.

एका सिनेमात राजेश खन्नाला मरताना पाहून त्याच्या आईने एवढा धसका घेतला की तिला हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर तो ज्या सिनेमात तो मरतो तो सिनेमा राजेशने आईला दाखवला नाही. सफर सिनेमातला त्याचा मृत्यू मात्र फ्लोमध्ये येतो आणि चटका लावतो.

जून २०१२ मध्ये त्याच्या मृत्यूच्या वावड्या उठल्या. त्याच्या आशीर्वाद बंगल्यावर गर्दी उसळली. गर्दी हे त्याचं टाॅनिक होतं. जी गर्दी त्याच्यापासून दूर गेली होती ती त्याच्या मृत्यूच्या वावडीमुळे ''आशीर्वाद'' बंगल्यावर परत लोटली होती.

डिंपल व अक्षयकुमारनं त्याला त्याच्या सुप्रसिद्ध गच्चीवर आणलं. ज्या गच्चीवर अपयशाच्या वेळी उभं राहून देवाला म्हटलं होतं, "की देवा इतका अन्याय करू नकोस की मला तुझ्या अस्तित्वाबद्दल शंका येईल."

त्या गच्चीवरून तो लोटलेला जनसागर त्याने डोळ्यात साठवून घेतला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. ज्या स्मितासाठी तरुणी जीव टाकत. त्याने जनसागराला V for victory ची खूण दाखवली. जणू त्याने मृत्यूला हरवलं होतं. पण मृत्यूला आजपर्यंत कुणी हरवलंय ? माणसाचा जन्म घेतलेला परमेश्वरही मृत्यूला हरवू शकलेला नाही. हा तर माणसांनी बनवलेला परमेश्वर होता.

हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरूच होत्या. शेवटी त्यानं ठरवलं, की स्वतःच्या बेडरूममध्ये शेवटचा श्वास घ्यायचा. मृत्युपत्र लिहिताना त्यानं डिंपलकडं पाहिलं. तिनं सांगितलं, "जे काही द्यायचं ते तुझ्या मुलींना दे." बरेचदा तो बेशुद्ध असायचा.

तो मध्येच शुद्धीवर आला त्यानं एक हात डिंपलचा हातात घेतला आणि दुसऱ्या हातात ''अंजू महेंद्रू''चा हात होता. एक अग्नीच्या साक्षीनं झालेल्या बायकोचा आणि दुसरा प्रदीर्घ काळ सर्व दुःख, अपमान पचवून साथ न सोडणाऱ्या मैत्रिणीचा हात.

तो हळू आवाजात पुटपुटला, "टाइम अप हो गया है. पॅक अप." त्याचं शरीर अचेतन झालं, नवं शरीर परिधान करायला. त्यानं कारकीर्दीत मृत्यूचे अनेक प्रसंग रंगवलेले होते, त्या मृत्यूनं त्याला प्रचंड यशस्वी चित्रपट दिले होते. त्याच्या प्रत्यक्ष मृत्यूच्या वेळी दहा लाख लोकं जमली. मृत्यूचा खराखुरा सिनेमा यशस्वी झाला. आकाशात दूर ताऱ्यांच्या जवळ जाऊन त्यानं आपली शेवटची यात्रा पाहिली असेल. हा सीनही यशस्वी झाल्याची त्याची खात्री पटली असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com