भोकरहट्टीचे मालकपण

भोकरहट्टी गावाची पाणीपुरवठ्याची विहीर ढासळली असल्याने दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. ग्रामसभेने वित्त आयोगाच्या निधीतून विहीर मंजूर करून घेतली.
Bhokarhatti Village Peoples
Bhokarhatti Village PeoplesSakal
Summary

भोकरहट्टी गावाची पाणीपुरवठ्याची विहीर ढासळली असल्याने दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. ग्रामसभेने वित्त आयोगाच्या निधीतून विहीर मंजूर करून घेतली.

गावांना मिटींग नवीन नव्हत्या. कधी स्वयंसेवी संस्था मिटींग घ्यायच्या. जे मिटींग लावतात तेच अर्थातच मिटींग चालवतात. मिटींगचा अजेंडा ठरवतात. लोक आपोआपच श्रोते होतात. कधी लोकं बोलतातही. पण दुसऱ्याच्या विषयावर जेवढे सुचेल आणि बोलण्याचा अधिकार वाटेल तितपतच. कधी शासनाचा माणूस ग्रामसेवक तर कधी लोकांचे प्रतिनिधी सरपंच मिटींग घ्यायचे. या वर्षातून चारदा होणाऱ्या मिटींगला म्हणतात ग्रामसभा. इथेही ही मिटींग लागते लावणाऱ्याच्या हिशेबाने. म्हणजे शासनाच्या वेळेने आणि शासनाच्या सोयीने. ही ग्रामसभा खरी; पण फक्त ‘गावात’ होणारी. ‘गावाची’ नाही. मिटींग कोणत्या दिशेने जाणार, हे ठरवतो मिटींगचा मालक. ग्रामसभेचा खरा गाभा असणाऱ्या ग्रामसभेच्या सदस्याला ‘आपण मालक नाही’ याची जाणीव होते का? ही जाणीव हाच प्रवासाचा आरंभबिंदू.

- दीपाली गोगटे medeepali@gmail.com

भोकरहट्टी गावाची पाणीपुरवठ्याची विहीर ढासळली असल्याने दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. ग्रामसभेने वित्त आयोगाच्या निधीतून विहीर मंजूर करून घेतली. काम बाहेरच्या ठेकेदाराला देण्याऐवजी गावच्याच तरुणांना दिले आणि गावाने आपले मालकपण अधोरेखित केले.

ग्रामसभेला येणारा आणि टेबलाच्या पलीकडे रिकामी जागा मिळेल तिथे बसणारा हा मालक ग्रामसभेला येतो ते फक्त काहीतरी मिळण्याच्या आशेवर. ‘मायबाप सरकार काही पदरात टाकेल का माझ्या? खुर्चीत बसणाऱ्या नि बोल बोल बोलणाऱ्या गावातल्या लोकांना तीन-तीन घरकुलं भेटली. माझ्या कुडाच्या भिंती होतील का औंदा तरी विटांच्या?’

असं काही ‘देण्याचं’ सामर्थ्य असणारी टेबलाच्या अलीकडे बसणारी माणसं त्याच्यासाठी मायबापच असतात. ग्रामसभा म्हणजे लाभार्थ्याची निवड करणारी सभा. पंचायतीवर नियंत्रण ठेवणारी सभा. विकासकामांना मान्यता देणारी सभा. हे सगळं घरकुलाच्या आशेवर आलेल्या माणसासाठी पूर्ण गैरलागू.

चळवळीत शिकत चाललेल्या गावांना हा मालक होण्याचा अवघड टप्पा पार करायचा होता. तो भाषण देऊन नव्हता जमणार. मालकपण हळूहळू अंगात भिनवायचं तर आधी जबाबदारी घ्यायला शिकायला हवं. ग्रामपंचायत नावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं अजूनही या पेसा गावांच्या ग्रामसभांना आपलं न म्हटल्यानं मीटिंगची नोटीस द्यायचं काम लोकंच करतात. चळवळीच्या आग्रहानं गावातली माणसं आलटून-पालटून तालुक्याला नोटीस द्यायला येऊ लागली. पंचायत समितीतल्या कोरड्या चेहऱ्यांना नोटीस देऊन पोच मागताना ‘ही आम्ही लावलेली गावातली मीटिंग आहे.’ हे लोकांच्या नकळत त्यांच्या तोंडी यायचं. कधी नाही आलं तोंडावर तरी कागद पुढं करताना आणि काळजीपूर्वक पोच घेताना डोळ्यात उमटायचं.

देवीच्या पाड्यातल्या पहिल्यावहिल्या काळातल्या ग्रामसभेच्या वेळची आठवण. आमच्या आग्रहानं मीटिंगला येऊन बसलेला ग्रामसेवक विषय आटपायला लागला. त्याला पुढे जायचे असल्याने घाई करू लागला. तेव्हा गाववाले बोलले, ‘‘आमचे विषय केल्याशिवाय आम्ही उठणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा. ग्रामसभा चालूच राहील.’

चळवळीच्या कार्यालयात आलेली काही नवखी माणसं चळवळीच्या दादाला फारच प्रश्न विचाराय लागले. ‘कशी आम्ही ग्रामसभा लावू?’, ‘आम्ही लावलेली चालते का?’, ‘ग्रामसेवक नाही म्हणाला तर?’ ग्रामसभेची नोटीस द्यायला तिथे आलेला भोकरहट्टीचा भरतदादा न राहवून मध्ये पडला.

‘अरे काय मगाधरनं काहीबाही विचारत बसलाय. ग्रामसभा आपली आहे. आपण म्हणू तसंच चालेल. तुम्ही बसाय सुरुवात तर करा. पाहा कोण आडवं येतं ते. पेसा कायदा माहीत आहे ना काय आहे ते?’ गावातल्या साध्याशा दिसणाऱ्या तरुणाकडून आलेलं जोरदार बोलणं कितीतरी भाषणांच्या तोडीचं होतं.

या भोकरहट्टीचं पाणीच वेगळं आहे. पेसा कायद्याचे महाराष्ट्र शासनाचे नियम सांगतात की, गावाने उपविभागीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र गावाचा ठराव दिल्यानंतर तीन महिन्यांत जर त्यांनी प्रस्तावाच्या पडताळणीची मीटिंग लावली नाही, तर जिल्हाधिकारी तो प्रस्ताव आपल्याकडे घेतील. त्यांनीही पंचेचाळीस दिवसांत त्यावर कार्यवाही केली नाही, तर त्या गावाला आपोआप मान्यता मिळेल, असे मानले जाईल. पेसा नियम ४ मधील हे परंतुक. भोकरहट्टी गावाने प्रस्ताव करून दोन वर्षे उलटली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गाव घोषित होण्याची प्रक्रिया रखडली. प्रशासनानं मागितलेला खरेतर प्रशासनानेच तयार करण्याचा पडताळणी मीटिंगच्या इतिवृत्तासह प्रत्येक कागद ग्रामसभेने पुरवला. चळवळीने आणि गावाने असंख्य वेळेला पाठपुरावा करूनही वाट पाहणं चुकलं नाही; पण ग्रामसभेला ताकद देणाऱ्या कायद्यावर नितांत श्रद्धा आणि चळवळीवर निष्ठा असणारे भोकरहट्टीतील भरतदादा, हरिदादा, गोरखसारखी तरुण मंडळी आणि त्यांच्या मागे खंबीर उभी राहणारी पूर्णाबाई, रुक्मिणीबाई, सगुणाबाई, तुळशीरामबाबा यांच्यासारखी ज्येष्ठ माणसं यांनी पेसाचा नियम ४ जगून दाखवला. ‘आम्ही तुमची ग्रामसभा मानत नाही’ असं ग्रामपंचायत-ग्रामसेवक यांनी सांगतानाही त्यांनी माघार घेतली नाही.

‘नियमानुसार आमचा गाव आता स्वतंत्र असून, आमची ग्रामसभा आमच्या पाड्यातच लागेल,’ अशा निर्धारानं गावातच ग्रामसभा चालू ठेवली. हळूहळू ग्रामपंचायतीचे सदस्य- सरपंचही त्यांना ‘बेकायदेशीर’ वाटणाऱ्या या ग्रामसभांना येऊन गेले.

ग्रामपंचायतीने भोकरहट्टीच्या माथी मारलेली गावाला नको असलेली कामे गावाने याच ग्रामसभेत परत फिरवली. पंचायतीने परस्पर आणून टाकलेले व्यायामशाळा साहित्य ग्रामसभेने परत न्यायला लावून त्या निधीतून अंगणवाडी दुरुस्ती करून घेतली. गावाची पाणीपुरवठ्याची विहीर ढासळली असल्याने दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. ग्रामसेवकाने पेसा निधीतून काय तो खर्च करा, असे सांगितल्यावर ग्रामसभेने गटविकास अधिकाऱ्यांना भेटायला माणसं निवडली. ‘आमचा पेसा निधी त्यासाठी पुरेसा नाही. तेव्हा आमचे बाकीचे निधी काय झाले ते सांगा,’ असा जाब लोकांनी विचारला आणि वित्त आयोगाच्या निधीतून विहीर मंजूर करून घेतली. विहिरीच्या दुरुस्तीचे काम बाहेरच्या ठेकेदाराने कशाला करायचे, असा रास्त सवाल विचारून ते काम गावच्याच तरुणांनी पार पाडले. काम करणाराच जेव्हा त्या विहिरीचे पाणी पिणार असतो, तेव्हा विहीर चांगली बांधली जाण्याच्या शक्यता कितीतरी वाढतात. भोकरहट्टीने आपले मालकपण असे वारंवार दाखवून दिले.

अर्थात सर्वच गावांना ही जबाबदारी निभावता आली नाही. आमची कामं करून द्या, असंच टेबलापलीकडच्यांना विचारण्याची सवय लागलेली काही गावं आता टेबलापलीकडे आपणच आहोत, हे समजूच शकली नाहीत. आपली कामं न होण्याला आपणच जबाबदार आहोत, ही कडू गोळी त्यांना अजूनही पचलेली नाही. ग्रामसभा लावणंही त्यांनी सोडून दिलं.

मोखाड्यातील पुलाची वाडी नावाचं गाव नुकतंच ग्रामसभेची मुळाक्षरं गिरवत आहे. मीटिंग आपलीच लोकं घेत आहेत, हे न समजलेल्या एका आजीने चळवळीच्या भास्करदादापुढे आमची कामे करून द्या, असे गाऱ्हाणे सुरू केले. जुन्या न शिकलेल्या गावांचा अनुभव गाठीला असणारा भास्करदादा काही सांगणार इतक्यात सभेचा अध्यक्ष असलेला गावचा विलासदादाच तिला म्हणाला, ‘‘तेनी नाही आपणच करायचा आता सगळा. ग्रामसेवकाकडूनही आपणच करून घ्यायचा. दादा फक्त अडचण आली, तर सांगतील कसं करायचा ते. समजलीस?”

भास्करदादाने हसून निःश्वास टाकला.

(लेखिका ‘वयम’च्या कार्यकर्त्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com