शिकण्याच्या पायवाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education

आमच्या भागातली मुलं फारच लवकर मोठ्यांपासून सुटी होतात. उपजीविकेच्या विवंचनेत अडकलेल्या मोठ्यांना मूल एकदा चालायला-धावायला लागलं की त्याच्या सततच्या वेळ घालवण्याच्या उद्योगांमध्ये अडकवावंसं वाटत नाही.

शिकण्याच्या पायवाटा

- दीपाली गोगटे medeepali@gmail.com

कोणती बी कशी उगवते, कोणतं गवत खाजतं आणि काय केल्यावर ते थांबतं, कोणता पक्षी कोणत्या झाडावर बसतो, जंगलात कुठं गेलं की उन्हाळ्यातसुद्धा हमखास पाणी मिळेल, रानात कुठल्या वाटेवर फार फळं खायला मिळतात... हे सर्व मुलांना ठावूक आहे. पण हे सगळं शिकणं वर्गाच्या बाहेर आहे. या बाहेरच्या जगाला आपण अजून शाळेच्या चार भिंतीत आणत नाहीये, ही अस्वस्थता आम्हाला खात होती. त्यातूनच या बाहेरच्या जगातल्या विषयांनाच ‘शिकण्याचे विषय’ करून पाहिलं, त्या प्रकल्पाची गोष्ट...

आमच्या भागातली मुलं फारच लवकर मोठ्यांपासून सुटी होतात. उपजीविकेच्या विवंचनेत अडकलेल्या मोठ्यांना मूल एकदा चालायला-धावायला लागलं की त्याच्या सततच्या वेळ घालवण्याच्या उद्योगांमध्ये अडकवावंसं वाटत नाही. मग मुलाचा ताबा पुढची तीन-चार वर्षं घरातली ताई-दादाकडे जातो. तोही टप्पा पार झाला की मूल गावातल्या लहान-मोठ्या सर्व मित्रांबरोबर अक्षरशः हुंदडत असतं. आमच्या भागात तर गावच नाही, तर गावाच्या आसपासचं रानसुद्धा गुरं चारण्याच्या निमित्तानं- आंबे करवंदं खाण्यासाठी पायाखालचं होतं.

सहाव्या वर्षी पोरांचा दिवस औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणात विभागला जातो. पाचवी-सहावीचा उंबरठा ओलांडेपर्यंत शाळेतलं शिकणं आणि शाळेबाहेरचं जगणं यात जमीन-अस्मानाचा फरक पडायला लागतो. शाळेबाहेरच्या सर्वच गोष्टी टाईमपासमध्ये मोडीत निघतात.

त्या जगात मुलांनी बरंच पाहिलेलं आहे. कोणती बी कशी उगवते त्यांना माहीत आहे. झाडांची नावं त्यांना माहीत आहेत. कोणतं गवत खाजतं आणि काय केल्यावर ते थांबतं, कोणता पाला-बिया-पानं कुटली की हात रंगवता येतात, कोणता पक्षी कोणत्या झाडावर बसतो, जंगलात कुठं गेलं की उन्हाळ्यातसुद्धा हमखास पाणी मिळेल, कोणत्या पिकावर कोणता रोग पडतो, कोणत्या बैलाची चाल कशी आहे, रानात कुठल्या वाटेवर फार फळं खायला मिळतात... हे सर्व काही डोक्यात साठवलं आहे; पण हे सगळं शिकणं वर्गाच्या बाहेर उभं आहे.

बाहेरच्या जगातलं चपळ आणि तल्लख मूल या चार भिंतीतल्या जगात- ‘दोन अंकी गुणाकार येत नाही. जोडाक्षरं येत नाही. आकलनासह वाचन जमत नाही’ असा शिक्का घेऊन वावरतं. त्या पोरानं ज्या वेळेत ही त्याच्या सभोवतालाविषयीची जाणीव कमावली आहे, ती वेळ त्याच्या शिक्षणाच्या दृष्टीनं निव्वळ वाया गेलेली वेळ आहे.

मुलांच्या या बाहेरच्या जगाला आपण अजून शाळेच्या चार भिंतीत आणत नाहीये, ही अस्वस्थता आम्हाला खात होती. त्यातूनच या बाहेरच्या जगातल्या विषयांनाच ‘शिकण्याचे विषय’ करून पाहिलं तर? असा किडा डोक्यात शिरला.

हा प्रयोग दीड वर्षं सहा शाळेतल्या मुलांसोबत करून पाहिला. या प्रयोगाला नाव दिलं उकल. आम्हाला उकलून पाहायचं होतं, की मुलांना माहीत असलेल्या वास्तव जगातल्या गोष्टींना औपचारिक शिक्षणाचं रूप देता येईल का? आम्हाला उकलून पहायचं होतं, अशा दोन जगांना जोडणाऱ्या कृती मुलांना कराव्याशा वाटतील का- आवडतील का? अनेक प्रश्न आणि गृहितकांच्या गुंत्यात काही गोष्टी जमेच्या होत्या.

आम्ही गेली काही वर्षं हे मुलांचं जग चळवळीच्या इतर कामाच्या निमित्तानं पाहत होतो. त्याचा एक भागही बनलो होतो. आम्ही या प्रश्नांना हात घालण्यात एक नैसर्गिक सहजता होती. हा चार भिंतीत टेबलावर जन्माला आलेला ‘प्रकल्प’ नव्हता. म्हणूनच नव्या अनुभवासाठीची उत्सुकता आणि जे हाताला येईल ते स्वीकारण्याची तयारी अशा दोन्ही जमेच्या बाजूला होत्या.

यासाठीचा वयोगट ठरवला सातवी आणि आठवीचा. हे प्रयोग मुद्दाम शाळांमध्येच घ्यायचे ठरवले. १३-१४ वर्षांची मुलं गावात मोठी आणि कळत्या वयातली मानली जातात. ती एकट्यानं अनेक गोष्टी करू शकतात. या मुलांसाठी लिहिणं, वाचणं, गिरवणं कंटाळवाणं आणि लाजिरवाणंही व्हायला लागतं. बुद्धीतर वाढली आहे; पण साक्षरतेपाशीच गाडी थांबल्यानं आता शाळेतलं जग कंटाळवाणं वाटू लागतं. आमचं उद्दिष्ट होतं, या वयोगटासाठी त्यांच्या अनुभव-माहितीच्या पायावर काही उच्च विचारकौशल्यांच्या प्राथमिक टप्प्यांवरील घडणीच्या वाटचालीला सुरुवात करता येईल का, याचा पडताळा घेण्याच्या कृती मुलांसोबत करून पाहणे. या कृती फुटकळ स्वरूपाच्या नव्हत्या. त्या विशिष्ट आशयसूत्रात बांधलेल्या होत्या. जसे की रानात मिळणाऱ्या खाद्य वनस्पती (रानभाज्या), शिकारीसाठी वापरली जाणारी साधनं, गावात पूर्वापार खेळले जाणारे खेळ, पक्षी इ. या सर्व कृतींना क्रमबद्धता होती. थोडक्यात या विषयांचा सात ते आठ सत्रात विभागलेला एक अभ्यासक्रम आम्ही तयार केला.

ही सत्रं माहितीचं संकलन- मांडणी- तुलना- त्यातून उभ्या होणाऱ्या चित्रातून निघणारे निष्कर्ष- त्यातून जाणीव झालेली समस्या सोडवणे अशा टप्प्यांनी पुढं जाणार होती. याचं प्रत्यक्षातलं रूप कसं असणार होतं? उदा.- पक्षी या आशयाला धरून कसं पुढं जाता येईल? मुलं पक्षी या सूत्राभोवती त्यांचे अनुभव, माहिती यांची सरमिसळ असणारा माईंड मॅप बनवतील. त्यातले त्यांचे अनुभव आधी तोंडी आणि मग लेखी मांडतील. त्यासाठी त्यांना त्यांच्या अनुभवकणांना एका जागी करावं लागेल. त्यानंतर त्यांना असणारी माहिती ते आधी सुचेल त्या क्रमाने लिहितील. मग पक्षी निरीक्षणाचे फील्डगाईड कसे वापरायचे, हे मुलं शिकतील.

त्यातील खाद्य, अधिवास अशा शब्दांचे अर्थ त्यांना पुढे जाण्यासाठी शोधावे लागतील. आता त्यांच्यापाशी असणारी माहिती त्यांना विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे क्रमाने मांडायची आहे. ही सर्व माहिती एका जागी विशिष्ट नमुन्यात आली, की त्याआधारे त्यांच्या सोबत गप्पा होतील. कोणता पक्षी कमी झालाय, कोणता पक्षी दिसेनासा झालाय, खाण्याच्या आधारे- राहण्याच्या ठिकाणांच्या आधारे काही वर्गीकरण करता येईल का? या आधारे तयार होणाऱ्या चित्राच्या आधारे मुलं आपल्या परिसरातील पक्ष्यांबाबत काही ‘निष्कर्ष’ काढू शकतील. कदाचित यातून नव्याने जाणवलेल्या काही समस्यांबाबत काय करता येईल, याचा विचार करतील. कदाचित समस्या सोडवण्यापर्यंत जातील.

किती पुढं जायचं आणि कुठं थांबायचं, याचा निर्णयही मुलांच्याच हाती होता. प्रत्येक गट त्याच्या वेगाने पुढं जाऊ शकणार होता. सर्व कृती सर्वांनी ठराविक वेळेत पूर्ण करण्याचा आमचा अट्टहास नव्हता.

हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना ‘शिक्षकाची’ गरज नव्हती. एक मोठ्या वयाचा जोडीदार मात्र लागणार होता. हा जोडीदार त्यांना हळूहळू त्या टप्यावर नेणार होता. हा जोडीदार त्यांना स्वतःलाच प्रश्न विचारायला लावणार होता. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मदतही करणार होता आणि कुठं रेंगाळलं तर थोडा धक्काही मारणार होता.

या सर्व कृती करण्यासाठी त्यांना पुस्तकं किंवा इंटरनेटचीही फारशी गरज नव्हती. त्यांना त्यासाठी जोडाक्षरांसह लेखन येण्याची गरज नव्हती. इथं भाषा आणि लिपी ही खऱ्या अर्थानं साधनं असणार होती. मुलांना जे काही सांगायचं आहे- त्यासाठी उपयुक्त असणारं महत्त्वाचं असणारं साधन. ते साध्य नसल्यानं त्यावर त्या कृतीची गुणवत्ता ठरणार नव्हती.

आधुनिक शिक्षणशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर आमच्या प्रयोगाला प्रकल्पाधारित शिक्षण (PBL) आणि वास्तविक संदर्भाधारित शिक्षण (CBL) म्हणता येईल. त्यात नेमकं काय हाताला लागलं हे पुढच्या भागात...

(पूवार्ध)

(लेखिका ‘वयम्‌’च्या कार्यकर्त्या आहेत.)

टॅग्स :educationsaptarang