

Global Literary Festival
esakal
राजदूत जेव्हा लेखणी हातात घेतात, तेव्हा त्या लेखणीत केवळ राष्ट्रांची अधिकृत भाषा राहत नाही; अशाच साहित्यिक राजदूतांना एकाच व्यासपीठावर आणणारे अभूतपूर्व जागतिक साहित्य संमेलन राजस्थानात भरणार आहे, त्यानिमित्त...
एखादा राजदूत म्हणजे आपल्या देशाचा परदेशातील अधिकृत प्रतिनिधी. त्याचे जग म्हणजे परराष्ट्र धोरण, द्विपक्षीय संबंध, राजकीय वाटाघाटी, करार, संघर्ष आणि शांततेचे प्रयत्न; पण या अधिकृत भूमिकेच्या मागे एक संवेदनशील माणूसही असतो. तो जगभर फिरताना विविध संस्कृती अनुभवतो, असंख्य व्यक्तींना भेटतो, इतिहास घडताना पाहतो आणि मानवी जीवनाचे अनेक रंग जवळून अनुभवतो. या अनुभवांना जेव्हा साहित्याची भाषा मिळते, तेव्हा जन्म घेतो एक वेगळाच ‘मुत्सद्दी लेखक’.
जगभरात दरवर्षी शेकडो साहित्य महोत्सव भरतात. लेखक, कवी, प्रकाशक, समीक्षक आणि वाचक एकत्र येतात. मात्र, विविध देशांचे माजी आणि विद्यमान राजदूत, उच्चायुक्त, कॉन्सुल जनरल, परराष्ट्र सचिव आणि मुत्सद्दी अधिकारी जे स्वतः साहित्यिकही आहेत, अशा व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणणारा साहित्य महोत्सव जगात दुर्मीळ आहे. अशीच एक अनोखी आणि ऐतिहासिक घटना भारतात घडणार आहे.