esakal | सुमित्रा भावे - ‘माणूस’ शोधणारी ‘स्टोरीटेलर’

बोलून बातमी शोधा

Sumitra bhave

माहितीचा अधिकार, स्किझोफ्रेनिया, पांढरे डाग, तरुण वयातील नैराश्य, माणसाची घराविषयीची आस अशा कित्येक विषयांची मांडणी करताना त्या सतत ‘माणूस’ शोधत राहिल्या

सुमित्रा भावे - ‘माणूस’ शोधणारी ‘स्टोरीटेलर’
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य, आशय, शब्द, चित्र, कला, मूल्यं आणि माणूसपण या सर्व गोष्टींचा एकसंध विचार करून त्याला चित्रपटाचं रूप देणाऱ्या सुमित्रा भावे या बहुआयामी चित्रकर्मी. कथा, पटकथा, संवाद, वेशभूषा, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा अनेक भूमिका त्या अतिशय सहजपणाने करत राहिल्या. एकीकडे समाजशास्त्राचा अभ्यास, समाजातल्या सर्व घटकांविषयी कळकळ, चांगुलपणावर विश्वास आणि समूहभावनेने काम करण्याची सवय यांमुळे त्यांचे चित्रपट आणि कामाचे स्वरूपही वेगळे ठरले. माहितीचा अधिकार, स्किझोफ्रेनिया, पांढरे डाग, तरुण वयातील नैराश्य, माणसाची घराविषयीची आस अशा कित्येक विषयांची मांडणी करताना त्या सतत ‘माणूस’ शोधत राहिल्या आणि ‘स्टोरीटेलिंग’ची विलक्षण हातोटी असल्याने त्यांच्या चित्रपटांनी सर्वच पातळ्यांवर उंची गाठली.

हेही वाचा: 'अत्यंत हुशार दिग्दर्शक आम्ही गमावला'; सुमित्रा भावेंच्या निधनाने हळहळली चित्रपटसृष्टी

सुमित्रा भावे यांचा जन्म पुणे येथे १२ जानेवारी १९४३ ला झाला. त्यांनी आगरकर हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरू रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरून मराठी वृत्तनिवेदनही केले. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काही काळ काम केले. पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन केले. अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प-प्लान या झोपडपट्टी वस्त्यांमधील मुले व कुटुंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुखपदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्री यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्यापर्यंत पोचविण्याच्या भावनेतून त्या १९८५पासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या.

हेही वाचा: आठवणींना उजाळा; सिनेमाच्या माध्यमातून सुमित्रा भावेंचा कोल्हापूरशी शेवटपर्यंत स्नेह

मूळ पिंड समाजसेवेचा असल्याने समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिकणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनील सुकथनकर त्यांना सहकारी लाभला. त्यांचा ‘बाई’ हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. भावे व सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’ यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोचविले. या जोडीने चौदा चित्रपट, ५० हून अधिक लघुपट, ३ दूरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘१० वी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘हा भारत माझा’, ‘संहिता’, ‘अस्तु’, ‘दोघी’, ‘कासव’ असे त्यांचे अनेक चित्रपट त्यांनी दिले. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुरस्कार, तसेच अन्य पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवांत या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘अस्तु’, ‘देवराई’, ‘बाई’, ‘पाणी’, ‘कासव’ या चित्रपट व लघुपटांसाठी ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे कथा, पटकथा, संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असून संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कर्नाटकातील शाश्वटती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनू पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मूल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला होता. त्यांना केरळमधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी - बलराज सहानी प्रतिष्ठानचा के. ए. अब्बास स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भावे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

बाई, दिठी, दहावी फ, अस्तु, एक कप च्या, कासव, घो मला असला हवा, जिंदगी जिंदाबाद (हिंदी), देवराई, दोघी, नितळ, फिर जिंदगी (हिंदी लघुपट), बाधा, बेवक्त बारिश (हिंदी लघुपट). मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट), वास्तुपुरुष, संहिता, हा भारत माझा.