दिस जातील, दिस येतील...

दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल दिवसभराच्या कामातल्या व्यग्रतेतून पती-पत्नी जेव्हा आपापसात हितगुज करतात तेव्हा ते एकदुसऱ्याच्या सुख-दु:खांची देवाण-घेवाण तर करतातच; पण सुखी संसाराचं स्वप्नही पाहतात.
Dis Jatil Dis Yetil maathi song by asha bhosle and auresh wadkar
Dis Jatil Dis Yetil maathi song by asha bhosle and auresh wadkaSakal
Updated on

- डॉ. कैलास कमोद

दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल दिवसभराच्या कामातल्या व्यग्रतेतून पती-पत्नी जेव्हा आपापसात हितगुज करतात तेव्हा ते एकदुसऱ्याच्या सुख-दु:खांची देवाण-घेवाण तर करतातच; पण सुखी संसाराचं स्वप्नही पाहतात. सुखी संसाराच्या संकल्पनेमध्ये ‘आपलं एखादं अपत्य असावं’ ही अपेक्षा अर्थातच असतेच असते.

अपत्यप्राप्ती झाली तर वैवाहिक जीवनाचं सार्थक झालं अशीच त्यांची मनोधारणा असते. आपण जगावं आणि आपल्यासारखी नवीन पेशी निर्माण करावी हा निसर्गनियमच आहे. पुनरुत्पादन या सृष्टीच्या नियमानुसार सृष्टीचं जीवचक्र युगानुयुगं फिरत आलं आहे.

यापुढंही ते फिरत राहणार आहे. वनस्पती आणि मनुष्यप्राणी यांच्यासह सर्व प्राणिमात्रांनी उदरभरण आणि पुनरुत्पादन ही दोनच कर्मे करण्याचं निसर्गत: अपेक्षित आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी हे जन्मापासून मृत्यूपर्यंत केवळ एवढीच दोन कर्मे पार पाडतात.

झाडावरच्या फळाचं बी जमिनीवर पडतं आणि त्यावर पाऊस पडताच त्या बीजाचा अंकुर जमिनीच्या वर येऊन त्याचं नवीन झाड निर्माण होतं. पक्षी सकाळपासून दाणा-पाण्याच्या शोधात उडत भटकत असतात आणि घरटं बांधून त्यात अंडी घालून पिलांना जन्म देत असता.

प्राणी भक्ष्याच्या शोधात फिरत असतात आणि विणीचा हंगाम आला की पिलांना जन्म देतात हे आपण पाहत असतो. मनुष्यजातीनं मात्र या दोन कर्मांव्यतिरिक्त इतर अनेक उद्योग स्वत:मागं लावून घेतले आहेत. तरीही मनुष्यजातीसाठीसुद्धा उदरभरण आणि पुनरुत्पादन या दोन कर्मांचं स्थान सर्वोच्च आहे.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. अर्थातच सामाजिक सौहार्दासाठी समाजानं पती-पत्नीचं नातं निर्माण करून नर-नारीला विवाहबंधनानं एकत्र आणलं आहे ते पुनरुत्पादनासाठी. त्यांचं नातं अधिक दृढ होऊ लागतं ते याच कारणास्तव. त्यातून सृजनातला आनंद मिळणार असतो.

झाडावर एखादं सुंदर फूल पाहिलं तरी जो आनंद मिळतो तो निसर्गाच्या निर्मितीचा आनंद असतो. विवाहानंतर पहिल्या संतानाच्या प्रतीक्षेत जोडपी असतात. त्यामुळंच ओटीपोटात अंकुर रुजतो कधी याची ते वाट पाहत असतात. विवाहानंतर पहिली मासिक पाळी चुकताच अंकुर रुजल्याची चाहूल लागली की स्त्रीला होणारा हर्ष, तिला वाटणारी हुरहूर, पतीच्या चेहऱ्यावरचं सुहास्य असा सगळा आनंद असतो.

‘किती सांगू मी सांगू कुणाला...आज आनंदीआनंद झाला...रास खेळू चला, रंग उधळू चला...आला आला गं कान्हा आला’ हे कृष्णजन्माचा आनंद व्यक्त करणारं गीत आपल्याला परिचित आहेच. मग येणाऱ्या ‘त्या’ तान्हुल्यासाठी स्वप्नांचे इमले रचणं पती-पत्नी अशा दोघांकडूनही सुरू होतं.

तुज्या-माज्या संसाराला आनि काय हवं

तुज्या-माज्या लेकराला घरकुल नवं

नव्या घरामंदी काय नवीन घडंऽऽल?

घरकुलासंगं समदं येगळं होईल

दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल

या गीतातले पती-पत्नी गरीब आहेत. पहिल्यावहिल्या गर्भारपणाची चाहूल तिला लागली आहे. ते दोघंही या वार्तेनं अगदी हरखून गेले आहेत. सुखाची परमोच्च अशी अनुभूती ते घेत आहेत, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवसुद्धा त्यांना होते आहे. दोघांनी ऊन्ह-पावसात दिवस कसेबसे काढलेले असले तरी लवकरच येणाऱ्या बाळासाठी ते राबून घरटं बांधत आहेत.

या नवीन घरात सगळं काही नवीन होऊन आपले वाईट दिवस जातील, आपली आर्थिक परिस्थितीही सुधारेल अशी आशा करत आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या बाळालासुद्धा आपण परिस्थितीशी झुंजण्याचं बळ देऊ असा निर्धारसुद्धा ते करत आहेत. येणारं हे बाळ कन्या असेल की पुत्र, ते आई व बाप यांपैकी कुणासारखं दिसेल असे विचार त्यांच्या मनात सहजपणे आलेले आहेत.

ढगावानी बरसंल त्यो, वाऱ्यावानी हसवंल त्यो

फुलावानी सुखवील, काट्याला बी खेळवील

समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो

आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल

तुज्या-माज्या जिवाचा त्यो आरसा आसंल

त्याच्या आगमनानंतर घरात सुख कशा तऱ्हेनं नांदेल याचं वर्णन करताना कवी-गीतकार सुधीर मोघे यांनी ढग, वारा, फुलं अशा नैसर्गिक गोष्टींच्या उपमा वापरल्या आहेत व त्या अगदी समर्पक आहेत. कारण, निसर्गाव्यतिरिक्त त्या नवरा-बायकोला बंगला, गाडी अशा इतर भौतिक बाबींची अपेक्षा नाही. त्यांची अपेक्षा अगदी माफक आहे व ती म्हणजे ‘आपल्या होणाऱ्या बाळाला जगण्यासाठी आवश्यक असं बळ मिळू दे...आपल्यापेक्षा कमी काबाडकष्ट त्याच्या जीवनात असू दे...’

उडूनिया जाईल ही आसवांची रात,

अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट

पहाटच्या दवावानी तान्हं तुजं-माजं,

सोसंल गं कसं त्याला जिवापाड ओझं

इवल्याशा पणतीचा इवलासा जीव,

त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव

त्यांचा दुर्दम्य आशावाद प्रकट करताना कवी लिहितो : ‘इवल्याशा पणतीचा इवलासा जीव, त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव.’

लहानशी ज्योत जशी अंधाराला भेदत चहूकडं प्रकाश पसरते तद्वत् आपलं दु:ख, आपलं दारिद्र्य या लहानशा जिवाकडून नाहीसं केलं जाईल...फार छान उपमा कवीनं दिली आहे. ‘ढगावानी बरसंल त्यो, वाऱ्यावानी हसवल त्यो’ असा ग्रामीण बाज शब्दांना देत हृदयाला भिडणारा भावपूर्ण आशय मोघे यांनी या गीतातून मांडला आहे.

मराठी मनाचा अचूक ठाव जाणून असल्यानं संगीतकार सुधीर फडके ग्रामीण महाराष्ट्रातल्या मनातलंच संगीत जणू श्रोत्यांना ऐकवत आहेत असं वाटतं. गाणं कमालीचं आकर्षक केलं आहे ते आशा भोसले यांनी. त्यांनी गीतातल्या शब्दांचे केलेले ग्रामीण ढंगातले उच्चार आणि ‘दिस जातील...दिस येतील...भोग सरंल...सुख येईल’ असे दोन दोन शब्दांच्या मधून घेतलेले पॅाजेस हा गाण्याचा आकर्षक केंद्रबिंदू आहे. सुरेश वाडकर यांनी त्यांना चांगली साथ केली आहे.

चित्रपटातली आणि गीतातली प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या पत्नीला अभिनेत्री मधू कांबीकर यांनी न्याय दिला आहे. चेहऱ्यावर सतत स्मित ठेवून त्यांनी आनंद आणि आशावाद अभिनित केला आहे.

शेतात काम करताना पायाची जेमतेम पोटरी उघडी राहील अशा रीतीनं नेसलेलं नऊवारी लुगडं, दंडावर रुतणारी खणाची चोळी, गाठ मारून मानेवर बांधलेला केसांचा बुचडा, कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात काळ्या मण्यांची पोत, उन्हा-पावसात रापलेली त्वचा असा अस्सल शेतकरणीचा लहेजा त्यांनी मोठ्या झोकात दाखवला आहे.

शेतात जमीननांगरणीपासून पीक वर येईपर्यंत राबणाऱ्या जोडप्याचे कष्ट गीताच्या पार्श्वभूमीवर दिसतात. बांबूचा सांगाडा बांधून, त्यावर वाळक्या काटक्याकुटक्या टाकून, कुडाचं झोपडं बांधून पूर्ण झाल्यावर दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसतात. त्याच वेळी झोपडीच्या दारावर फुलांचं तोरण बांधलेलं दिसतं आणि शेतातसुद्धा पीक तरारून वर आलेलं दिसतं. दिग्दर्शनातले बारकावे टिपून दिग्दर्शक राजदत्त यांनी गाणं अगदी जिवंत केलं आहे. ‘शापीत’ हा १९८२ मधला चित्रपट काहीसा वेगळ्या धाटणीचा होता.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.